नरेंद्र मोदींची छत्रपतींशी तुलना करण्याचा खटाटोप महाराष्ट्राला अमान्य, गुरु गोविंद गिरी महाराजांनी दिला इतिहासाचा खोटा दाखला
नरेंद्र मोदींची छत्रपतींशी तुलना करण्याचा खटाटोप महाराष्ट्राला अमान्य,
गुरु गोविंद गिरी महाराजांनी दिला इतिहासाचा खोटा दाखला
रश्मी मारवाडी /सिन्नर
अयोध्या येथील प्रभु रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात गुरू गोविंद गिरी महाराजांनी इतिहासाचा खोटा दाखला देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी केलेली तुलना निषेधार्ह आहे. गुरु गोविंद गिरी महाराजांनी केलेले विधान हे आक्षेपार्ह असुन त्यांनी हे विधान मागे घ्यावे.अशा आशयाची मागणी तालुक्यातील विविध पुरोगामी सामाजिक संघटनांनी केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी सिन्नर तहसिलदार व पोलीस निरीक्षकांना भेटून दिले आहे. अयोध्येतील प्रतिष्ठेच्या व महत्वाच्या कार्यक्रमात अनेक मान्यवरांसमोर नरेंद्र मोदींची तुलना ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर करण्याचा प्रकार हा निव्वळ दुर्दैवीच नाही तर महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेचा अवमान करणारा आहे. या विश्वात छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना फक्त छत्रपती शिवाजी महाराजांशीच होऊ शकते, असे असतांना इतिहासाचा विपर्यास करून राजकीय लाभासाठी वर्तमान स्थितीतील राजकीय गोष्टीची सांगड घालण्याचा प्रकार हा चुकीचे पायंडे निर्माण करणारा आहे. यातुन इतिहासाची हवी तशी मोडतोड करून सोयीचा इतिहास निर्माण करण्याचा प्रयत्न अलिकडे सर्रास होत आहे. गुरू गोविंद गिरी यांनी केलेल्या कथीत वादग्रस्त विधानामुळे देशभरातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून गुरू गोविंदगिरी महाराजांनी देशवासियांची माफी मागावी , नाही तर राज्य सरकारने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे . दरम्यान सिन्नर येथील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीतही गुरू गोविंद गिरी महाराजांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्यात आला. निवेदनावर महामित्र दत्ता वायचळे, शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष पांडुरंग वारूंगसे, राष्ट्रवादीचे नामदेव कोतवाल, राजाराम मुरकुटे, रिपब्लिकन पक्षाचे मंगेश जाधव, शेतकरी संघटनेचे डॉ आर टी जाधव , सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब आढाव, भीम आर्मीचे जगन्नाथ कटारनवरे, कामगार फाउंडेशनचे अनिल सरवार, सिटुचे हरिभाऊ तांबे, अंनिसचे डॉ.शामसुंदर झळके,बहुजन वंचित आघाडीचे बळवंत जाधव, विजय जाधव समता परिषदेचे भाऊसाहेब पवार संदीप भालेराव , राष्ट्र सेवा दलाचे अजय शिंदे, बार असोसिएशनचे अॅड. देवेंद्र खरात सामाजिक कार्यकर्ते अनिल थोरात,रविंद्र मोगल, हिंदु खाटीक महासंघाचे किरण कोथमिरे, मराठा सेवा संघाचे राजाराम मुंगसे , प्रा.रावसाहेब गायकवाड, डॉ.जी.एल.पवार, नामदेव मचकुले आदिंच्या सह्या आहेत.