क्राईम

अस्थिविसर्जनासाठी आलेल्या कुटुंबाला जातीची विचारणा; पुजाऱ्यांना समज, अनिष्ट प्रथेला चाप


अस्थिविसर्जनासाठी आलेल्या कुटुंबाला जातीची विचारणा; पुजाऱ्यांना समज, अनिष्ट प्रथेला चाप

 

पंचवटी प्रतिनिधी

पंचवटी येथील रामतीर्थ परिसरात अस्थिविसर्जनासाठी आलेल्या पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथील कुटुंबाला पुजाऱ्यांनी पूजा विधी दरम्यान जातीची विचारणा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सामाजिक कार्यकर्ते संतोष खलसे यांनी याबाबत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत संबंधित पुजाऱ्याला समज दिली आहे.

संतोष खलसे यांचे वडील लक्ष्मण खलसे यांच्या अस्थिविसर्जन विधीसाठी खलसे कुटुंब बुधवार, २३ जुलै रोजी रामतीर्थ येथे आले होते. यावेळी पूजा करताना पुजाऱ्यांनी त्यांच्या जातीची विचारणा केली. यामुळे खलसे कुटुंबाने तीव्र नाराजी व्यक्त करत पंचवटी पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि सर्व प्रकार कथन केला.घटनेची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी तत्काळ कारवाई करत संबंधित ब्राह्मण पुजाऱ्याला पोलिस ठाण्यात बोलावले. कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी समज देण्यात आली. यासोबतच पुरोहित ब्राह्मण संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, मुख्य पुजारी सतीश शुक्ला यांनाही बोलावून घेण्यात आले.

या बैठकीत यापुढे रामतीर्थ परिसरात कोणत्याही यजमानाची जात विचारली जाणार नाही, अशी ग्वाही देण्यात आली.अस्थिविसर्जनासारख्या धार्मिक विधीमध्ये जात विचारणे ही अनिष्ट प्रथा असून ती थांबवावी, अशी मागणी खलसे यांनी आपल्या अर्जात केली होती.

 

“अर्जदार समाधानी”

Advertisement

संपूर्ण प्रकारात पोलिसांनी केलेल्या तत्पर हस्तक्षेपामुळे अर्जदार संतोष खलसे यांनी समाधान व्यक्त केले आहे. तक्रारीची नोंद घेत यावर त्वरित कृती करण्यात आली, तसेच यापुढे अशी घटना घडू नये यासाठी पुरोहित वर्गास समज देण्यात आली आहे.

………..

“आज एकविसाव्या शतकात वावरताना देखील, नाशिकसारख्या शहरात बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांना जात विचारली जाते, ही गोष्ट नाशिक शहरासाठी लज्जास्पद आणि दुर्दैवी आहे.

समाजात आजही जातपातचं भिंती उभ्या राहत असतील, तर आपण प्रगतीचा केवळ देखावा करत आहोत.जातीव्यवस्थेचे उच्चाटन व्हायलाच हवे. जर ही प्रकारची मानसिकता थांबली नाही, तर मी तीव्र आंदोलन छेडणार आहे.”

-संतोष खलसे

(सामाजिक कार्यकर्ता)

रा. चिंचवड, पुणे

……………..”धार्मिकतेच्या नावाखाली चातुर्वर्ण्य व्यवस्था जिवंत ठेवण्याचा पुरोहितांचा हा प्रकार अतिशय निंदनीय तर आहेच शिवाय असंविधानिकही आहे. म्हणून पोलिसांनी खलसेंच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितावर कडक कायदेशीर कारवाई करावी.शिवाय पंचवटी परिसरामध्ये,” येथे जातीनिहाय धार्मिक विधी केले जात नाहीत“,असे ठळक अक्षरातील कायमस्वरूपी फलक लावण्यासाठी संबंधितांना बांधील करावे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आम्ही तमाम भाविक, श्रद्धाळूंना आवाहन करतो की जेथे जेथे धार्मिकतेच्या नावाखाली जात विचारून पूजाविधी केले जात असतील, भेदभाव केला जात असेल तेथे जाऊ नये.त्याऐवजी समाजातील गोरगरीब, गरजूंना यथाशक्ती साहाय्य ,मदत करावी .तेच खरे धार्मिक विधी आणि अध्यात्म आहे.”

-डॉ. ठकसेन गोराणे,

 राज्य प्रधान सचिव,

 महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *