✍️ संपादकीय:भाग :२ हनी ट्रॅप :तपास, माईंड गेम की ट्रॅप?
✍️ संपादकीय:भाग :२
हनी ट्रॅप :तपास, माईंड गेम की ट्रॅप?
‘आग लागली रामेश्वरी… बंब धावला सोमेश्वरी!’ही म्हण नाशिकच्या वासना कांड की हनी ट्रॅपच्या तपासाने अक्षरशः हायजॅक केले आहे.एक गंभीर, स्पष्ट आणि लोकांना हादरवणाऱ्या प्रकरणाच्या चौकशीला, आज दुसऱ्याच दिशेने भरकटत नेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहे.या प्रकरणातील खरे मास्टर माईंड हातात हात घालून फिरत आहेत, निर्दोषांच्या किंवा नाशिकच्या हनी ट्रॅप प्रकरणाशी ज्यांचा दूर दूर पर्यंत संबंध नाही त्यांना हनी ट्रॅपच्या प्रकरणात गोवून त्यांच्या गळ्याला फास लावण्याची छुपी स्पर्धा चालू आहे.प्रसार माध्यमांची भूमिकाही नेहमी प्रमाणेच बेजबाबदार दिसत असल्याचे खेदाने म्हणावे लागत आहे. काही मान्यवर अपवाद सोडले तर स्थानिक यू ट्यूबर पासून तर प्रादेशिक, राष्ट्रीय पातळीवरचे पत्रकार देखील असंबंध मुद्दे जोडून सनसनी निर्माण करून टी आर पी मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न करतांना दिसतात. तेंव्हा तपास यंत्रणांचा माईंड गेम अधिकच खुलत आहे.कुणाला वाचवण्यासाठी ही धडपड चालली आहे, आणि कुणाला जबरदस्तीने अडकवण्यासाठी हे “हनी ट्रॅप”चे हे मुखवटे वापरले जात आहे याच्या खोलात जाण्याची खरी गरज आहे.
नाशिकमधील पूर्वाश्रमीच्या एका युवा राजकारण्याच्या अलिशान हॉटेलपासून सुरु झालेले हे प्रकरण तपास यंत्रणांनी ठाणे शहरातील एक होम गार्ड आणि पहूर जामनेर मार्गे पुणे, अंधेरी, साकीनाका पोलिस ठाण्यात नेऊन ठेवले. खरोखर या दोन्ही प्रकरणांचा नाशिकच्या सॉलिटियर प्रकरणाशी संबंध आहे का? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक जाणकाराला ठाऊक आहे.योग म्हणा की कल्पकता, पण नाशिकचे हे प्रकरण उघडकीस आले ते ठाण्यातून. नाशिकमध्ये महसूल विभागात जबाबदारीच्या पदावर असलेल्या एका अधिकाऱ्याच्या माध्यमातून खरे तर या प्रकरणाला वाचा फुटली. या अधिकाऱ्याची नाशिकच्या या वर्तुळाशी संबंध होते. केवळ तो अधिकारीच नाही तर राजकीय नेते, पदाधिकारी, संविधानिक पदावर असलेले अनेक चेहऱ्यांची ब्लॅक कॉफीच्या वाफेतून पाझरणाऱ्या हॉट हनीची चव घेण्यासाठी वारंवार उठबस होती.हे आता सर्वश्रुत झाले आहे. अर्थात इथेही सन्माननीय अपवाद आहेतच. या ठिकाणी येणारा प्रत्येक चेहरा यात गुंतला आहे, असा दावा संस्कारक्षम कुणीही करणार नाही. अनेक कर्तव्यदक्ष आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहिले आहेत. हेही विसरता येणार नाही.मात्र या प्रकरणाला ठाण्यातून वाचा फुटली, तेंव्हाच ठाण्यातील एक दबलेलं किंवा दाबून ठेवलेलं अत्याचाराचं प्रकरण डोकं वर काढू पाहत होतं.
एक होम गार्ड गेल्या काही महिन्यांपासून दोन एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या अत्याचाराविरुद्ध संघर्ष करीत आहे . या दोन्ही प्रकरणांची गुंतागुंत करून नाशिकच्या मूळ हनी ट्रॅपच्या तपासाची दिशाभूल करण्याचा डाव पहिल्यांदा खेळला गेला. आणि या चालीला कुठलीही शहनिशा न करता माध्यमांनी श्रेय लाटण्याच्या चढाओढीत, तपास यंत्रणा किंवा त्यांचे राजकीय मास्टर माईंड सांगतील तेच ब्रम्ह सत्य समजून प्रेक्षकांसमोर, वाचकांसमोर ठेवले. जनतेचा बुद्धिभ्रंश करण्याच्या या खेळात माध्यमांनी जाणते अजाणते पणे षडयंत्र कर्त्यांची साथ दिली.
दुसरी खेळी केली, ती प्रफुल्ल लोढाच्या अटकेने. वास्तविक प्रफुल्ल लोढा हे प्रकरण जुने आहे. प्रफुल्ल लोढाशी संबंधित असलेल्या जळगावच्या दोन्ही महारथीना प्रफुल्ल लोढा चांगलाच परिचित आहे.मग त्याचे कारनामे त्यांना माहित नसतील असे म्हणण्याचे धाडस कुणी का करावे? बरं पुणे किंवा अंधेरी, साकीनाका हद्दीत लोढाने घातलेला हैदोस काल परवाची घटना आहे का? नाशिकच्या प्रकरणावर चर्चा सुरु झाल्यानंतर लोढाने हे काळे कृत्य केले का? या प्रश्नाचे उत्तर नाही असेल तर नाशिकचे हनी ट्रॅप प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर प्रफुल्ल लोढाचे पुरलेले पाप का उकरण्यात आले असेल? याचे उत्तर घेण्यासाठी कुण्या तज्ज्ञाची गरज भासावी का?
नाशिकमधील एका गंभीर प्रकरणाला ठाण्याच्या जुन्या प्रकरणाच्या फाईलशी जोडणे किंवा ऐनवेळी प्रफुल्ल लोढाचं नावं खेचून गुंतवणे हा सारा प्रकार तपास नव्हे तर माईंड गेम आहे.आज तपास ‘तथ्यांवर’ केला जात नाही , ‘कथानकांवर’ सुरु आहे.सत्य सापडू नये म्हणून खोट्या वळणांचं विणकाम केलं जात आहे.हे प्रकरण राजकीय-प्रशासकीय आणि माध्यमांच्या संदर्भात संवेदनशील आहे.
हनी ट्रॅप हे एक मनोवैज्ञानिक आणि सामाजिक फसवणूक तंत्र आहे, ज्यात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या भावना, आकर्षण किंवा लैंगिक इच्छांचा गैरवापर करून त्याला जाळ्यात अडकवते.तपास यंत्रणा आणि काही सन्माननीय अपवाद वगळले तर झाडून सारी प्रसार माध्यमं समाजालाही अशाच मनोवैज्ञानिक ट्रॅप मध्ये अडकवून त्याच्या भावनांवर अत्याचार सुरु आहे. त्याचा विश्वासघात केला जात आहे.
पुरावे आणि प्राथमिक माहिती बाजूला ठेवली जात आहे.
एका ठराविक दिशेनेच ठरवून तपास चालवला जातोय
हे खूप काही सूचित करतं.तपासयंत्रणा “हनी ट्रॅप”चा संदर्भ देत भलतेच मढे उकरत आहे. प्रत्यक्षात हा प्रेक्षकांचा,समाजाचा, आणि संभाव्य साक्षीदारांचा ‘माइंड ट्रॅप’ आहे.जनतेने सजग राहायला हवं.कारण जेव्हा तपासच संशयाच्या धुक्यात सापडतो तेंव्हा, लोकशाहीचं भवितव्य धूसर होतं. एखाद्या प्रकरणात दोषी आहेत, तर त्यांनी शिक्षा भोगावी.पण, चौकशीची दिशा आधीच ठरवून, निवडक नावं अडकवणं, हा तपास नव्हे तर ‘पूर्वनियोजित प्रतिशोध’ ठरतो. म्हणून आग लागते तिथेच पाणी शिंपडले जावे. न्याय प्रक्रियेचा बाजार मांडला जाऊ नये.
-कुमार कडलग
-नाशिक



