महाराष्ट्र पोलीस दलासाठी सुवर्ण क्षण; सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश ग. हिरे यांना वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्स 2025 मध्ये सुवर्णपदक
महाराष्ट्र पोलीस दलासाठी सुवर्ण क्षण;
सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश ग. हिरे यांना वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्स 2025 मध्ये सुवर्णपदक
नाशिक प्रतिनिधी
महाराष्ट्र पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी अभिमानास्पद कामगिरी – नाशिक शहर पोलिस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश ग. हिरे यांनी केली आहे.अमेरिकेतील बर्मिंगहॅम येथे पार पडलेल्या “वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्स 2025” या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पिस्तूल नेमबाजी प्रकारात ए पी आय हिरे सुवर्णपदक पटकावून नाशिकसह महाराष्ट्र पोलिस दलाचे नाव जगाच्या नकाशावर झळकावले.
ही स्पर्धा जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या पोलीस व अग्निशमन दलांतील अत्यंत कुशल अधिकाऱ्यांसाठी आयोजित केली जाते. या स्पर्धेत महेश हिरे हे भारताकडून पिस्तूल नेमबाजी प्रकारात सहभागी झालेले एकमेव पोलीस अधिकारी ठरले आहेत.हे सुवर्णपदक मिळवणारे ते महाराष्ट्र पोलीस दलातील पहिलेच अधिकारी आहेत.
कर्तृत्वाची झेप : भारतासाठी अभिमानाचा क्षण
महेश हिरे यांनी आपल्या कौशल्य, सातत्यपूर्ण सराव आणि अपार जिद्द यांच्या जोरावर ही यशस्वी झेप घेतली आहे. त्यांनी केवळ महाराष्ट्र नव्हे, तर संपूर्ण भारताचे नाव आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उज्वल केले आहे.
स्पर्धेतील यशाबाबत बोलताना महेश हिरे म्हणाले,
“ही कामगिरी माझ्या महाराष्ट्र पोलीस दलाला समर्पित आहे. माझे प्रशिक्षण, वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि सहकाऱ्यांचे प्रोत्साहन – हेच माझ्या यशामागील खरे कारण आहे.”
पोलीस खात्याचे अभिनंदन:
महेश हिरे यांच्या यशाबद्दल संपूर्ण पोलीस दलात आनंदाचे वातावरण आहे. राज्याचे पोलीस महासंचालक, वरिष्ठ अधिकारी, आणि सहकारी अधिकारी यांच्याकडून त्यांना अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राज्याचे गृह खाते आणि केंद्रीय गृहमंत्रालयाकडूनही त्यांना सन्मानित करण्यात येणार असल्याचे संकेत आहेत.
खऱ्या अर्थाने “खाकी”चा सन्मान:
या विजयामुळे केवळ महाराष्ट्र पोलीस दलाचेच नव्हे, तर संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचावली आहे.
महेश हिरे यांच्या रूपात “खाकी” नेमबाजीच्या मैदानातही तितकीच सक्षम, शिस्तबद्ध आणि अचूक असल्याचे सिद्ध झाले आहे.
हा क्षण केवळ ऐतिहासिक नसून, येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे.

