क्राईम

भक्ती, निसर्ग आणि नात्यांचा उत्सव”


भक्ती, निसर्ग आणि नात्यांचा उत्सव “

पावसात चिंब होऊ देत मन, हसरा नवा आरंभ होऊ दे,  

श्रावणाचा पहिला दिवस, नव्या आशेचा दीप उजळू दे…

मनाला नितळ, निर्मळ बनवूया. राग, मत्सर, हेवा बाजूला ठेवून, भक्ती, प्रेम, आणि एकतेचा सुगंध दरवळू दे,

 

श्रावण… म्हणजे फक्त ऋतू नव्हे, ती एक अनुभूती आहे. वर्षभर निसर्गाच्या विविध रूपांचा अनुभव घेत आपण या पावसाळ्याच्या सौंदर्यात हरवतो. पण श्रावणात काही तरी वेगळं असतं,ते म्हणजे मनाच्या गाभाऱ्यात निर्माण होणारी भक्तीची लहर.

आज श्रावण महिन्याचा पहिला दिवस.

पहाटेपासूनच सृष्टीत एक अनोखा गंध दरवळतो. मंद वाऱ्याची झुळूक, रिमझिम सरी, आणि भोवतालच्या हिरवाईतून झिरपणारी शांतता… मनाला विचारात हरवून टाकते.घराघरांत शिवाची पूजा, अभिषेक, तुळशीचं पूजन, फुलांची रांगोळी… सगळीकडे एक सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळते.तेंव्हा जाणीव होते,श्रावण सुरू झाल्याची. श्रावण,सणांचा, उपवासांचा आणि आत्मशुद्धीचा कालखंड.

श्रावण हा केवळ धार्मिकता किंवा परंपरेचा भाग नाही, तर ती आहे,नात्यांची नव्याने जुळवणूक. आईच्या हातचं उपवासाचं जेवण, वडिलांचा गाभाऱ्यातील घंटानाद, आजीच्या ओव्या, आणि भावंडांसोबतचा फराळ.ही सगळीच क्षणचित्रं हृदयात जपून ठेवावी अशी असतात.

Advertisement

आजच्या या पहिल्या दिवशी, आपण आपल्या मनालाही श्रावणासारखं नितळ, निर्मळ बनवूया. राग, मत्सर, हेवा बाजूला ठेवून, भक्ती, प्रेम, आणि एकतेचा सुगंध दरवळू दे

श्रावणसरी मनावरी!

रिमझिम पाऊस सरी, वाऱ्याचा मंद गारवा,  

शिवशंभूला वाहतो, भक्तीचा श्रद्धेय धागा…

मातीचा सुगंध दरवळे, फुलांनी सजले दार,  

श्रावणाच्या पहिल्या दिवसाला, लाभो नवजीवनाचा भार.

ओवाळणीतून ओसंडे प्रेम, रांगोळीतून रंग उमलती,  

आईच्या हातची चव, आठवणींची परतफेड करती…

शिवाला बेल, तुळशीला पाणी, मनात भाव जागे,  

श्रावणासारखं निर्मळ होऊ दे, जीवन सदा मागे…

रोजची धावपळ थांबवू, थोडं स्वतःसाठी जगू,  

श्रावणात मनं जोडू, भक्तीने जग जिंकू…

पावसात चिंब होऊ देत मन, हसरा नवा आरंभ होऊ दे,  

श्रावणाचा पहिला दिवस, नव्या आशेचं दीप उजळू दे…

-कुमार कडलग

     -नाशिक-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *