क्राईम

“बालेकिल्ला”चे मूळ नायक


मा.डॉ. धोंडोपंत तथा डी. एस स्वामी 

 पोलीस अधीक्षक 

नाशिक

सप्रेम जय हिंद!

सर, नाशिक जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे स्वीकारल्याबद्दल आपले मनःपूर्वक स्वागत.

 

आम्ही याची देहा, याची डोळा आपली कामगिरी पाहिली आहे. नाशिक शहराचे परिमंडळ दोनचे पोलीस उप आयुक्त म्हणून आपल्या कार्यकाळात आपण नाशिकरोडसारख्या तत्कालीन गुन्हेगारीच्या बालेकिल्ल्याला ज्या पद्धतीने उध्वस्त केले, ते आजही नागरिक विसरलेले नाहीत. त्या काळात दादा, भाऊ, आण्णा, नाना अशी स्थानिक पातळीवर दहशत निर्माण करणारी नावे आपण सुतासारखी सरळ केलीत. आज नाशिक शहर कायद्याचा बालेकिल्ला म्हणून चर्चेत असला, तरी त्या बालेकिल्ल्याची मुहूर्तमेढ आपणच रोवली होती, हे निर्विवाद सत्य आहे.

आपल्या नेतृत्वशैलीत कठोरता आणि न्याय या दोन्हींचा समतोल आहे. गुन्हेगारीवर वचक बसवतानाच सामान्य नागरिकाला न्याय मिळवून देण्याची आपली भूमिका नेहमीच ठाम राहिली आहे. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, पोलिस दलातील शिस्त आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करणे, तसेच नागरिकांशी विश्वासाचे नाते निर्माण करणे या सर्व बाबी आपल्या कामगिरीत स्पष्टपणे दिसून आल्या.

आता आपण संपूर्ण जिल्ह्याच्या कायदा-सुव्यवस्थेची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. वरकरणी हा जिल्हा शांत, नाकाच्या शेंड्यासमोर चालणारा वाटत असला, तरी गावागावात आणि गल्लोगल्लीत असलेली गावगुंडी राजकीय व्यवस्था हे वास्तव नाकारता येणार नाही. कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे लयास गेली नसली , तरी काही ठिकाणी जाणीवपूर्वक निर्माण केलेली अशांतता, अंतर्गत ताणतणाव आणि स्थानिक पातळीवरील दबावगट आणि विशेष म्हणजे पोलीस दलातील काही मंडळींच्या मनात दबा धरून बसलेली अन्यायाची भावना, सुरुवातीच्या काळात आपल्यासाठी आव्हान ठरू शकतात. मात्र आपल्या अनुभवाच्या बळावर,आपण ही आव्हाने लिलया मोडून काढाल, याविषयी आम्हाला पूर्ण विश्वास आहे.

Advertisement

गेल्या आठ-दहा महिन्यांत काही घटनांमुळे नाशिक पोलीस दलावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. गोवंश तस्करी, गुटखा माफियांचा वाढता प्रभाव, तसेच भोंदूगिरीच्या घटनांनी कायदा-सुव्यवस्थेला धक्का बसला. याशिवाय इगतपुरी कॉल सेंटर प्रकरण आणि घोटी कंटेनर प्रकरणासारख्या घटनांनी नाशिक पोलीस दलाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावरही मलिन झाली. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाला पुन्हा सन्मान आणि विश्वास प्राप्त करून देण्याची मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे.

आपल्या आतापर्यंतच्या कार्यकाळाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे.आपण आव्हानांपासून पळ काढत नाही, तर त्यांना सामोरे जात निर्णायक पावले उचलता. त्यामुळेच नाशिक जिल्ह्यालाही आपल्या नेतृत्वाखाली नवी दिशा मिळेल, कायद्याचा धाक पुन्हा निर्माण होईल आणि पोलीस दलाबद्दलचा विश्वास अधिक दृढ होईल, अशी खात्री आहे.

नाशिक जिल्हा सुरक्षित, सक्षम आणि आदर्श ठरावा, हीच सर्व नागरिकांची अपेक्षा आहे. त्या दिशेने आपल्या नेतृत्वाखाली निश्चितच प्रभावी कामगिरी होईल, असा आमचा ठाम विश्वास आहे.

आपल्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!

आपले विश्वासू,

नाशिककर नागरिक

शब्दांकन : कुमार कडलग, नाशिक

दुनियादारी won’t lie 

……


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *