क्राईम

द्वारका सर्कल वाहतुकीसाठी ३ महिने बंद;  वाहतूक पर्यायी मार्गावरून करण्याची अधिसूचना जारी 


द्वारका सर्कल वाहतुकीसाठी ३ महिने बंद;  वाहतूक पर्यायी मार्गावरून करण्याची अधिसूचना जारी 

नाशिक (प्रतिनिधी) – सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर शहरातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने द्वारका सर्कल येथील भुयारी मार्ग प्रकल्पाला वेग देण्यात आला आहे. या कामासाठी दि. १९ एप्रिल ते १८ जुलै २०२६ या कालावधीत द्वारका सर्कल परिसर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय पोलीस आयुक्तालयाने घेतला आहे. या काळात २४ तास वाहतूक बंद राहणार असून, सर्व वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहेत.

प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, उड्डाणपुलाखाली सुरू असलेल्या भुयारी मार्गाच्या कामामुळे द्वारका सर्कल येथे मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील वाहतुकीचा मुख्य केंद्रबिंदू असलेल्या या सर्कलच्या बंदमुळे वाहतुकीवर मोठा ताण येण्याची शक्यता असून, पोलीस व महापालिका यंत्रणेकडून पर्यायी मार्गांची आखणी करण्यात आली आहे.

हलकी वाहने, सिटी लिंक बसेस, एस.टी. बसेस तसेच अवजड वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. पुणे रोडवरून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना सिन्नर फाटा, पाथर्डी फाटा मार्गे वळविण्यात येणार आहे. त्र्यंबकेश्वरकडे जाणारी वाहने विहीतगाव व अंबड मार्गे जातील. मुंबईहून नाशिक रोडकडे येणाऱ्या वाहनांसाठी भाभानगर, नागजी सिग्नल मार्गाचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Advertisement

सिटी लिंक बसेसना तपोवन बस टर्मिनसवरूनच सेवा देण्यात येणार असून, शालीमार व नाशिक रोडदरम्यानच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. एस.टी. बसेसना वडाळा, इंदिरानगर व महामार्ग मार्गे वळविण्यात आले आहे. पुणे व सिन्नरकडे जाणाऱ्या बसेसना ठक्कर बाजार मार्गाचा वापर करावा लागणार आहे. निमाणी बसस्थानकावरून सुटणाऱ्या बसेससाठीही स्वतंत्र मार्ग आखण्यात आले आहेत.

दरम्यान, अवजड वाहनांसाठी विशेष निर्बंध लागू करण्यात आले असून, नाशिक रोडवरून मुंबईकडे जाणारी वाहने फक्त रात्री १० ते सकाळी ८ या वेळेतच सोडण्यात येणार आहेत. या वाहनांना सिन्नर फाटा, गरवारे पॉईंटमार्गे राष्ट्रीय महामार्गावर वळविण्यात येणार आहे.

वाहतुकीचे नियमन करण्यासाठी काठे गल्ली, फेम सिग्नल, ट्रॅक्टर हाऊस, मुंबई नाका आदी ठिकाणी बॅरिकेड्स व डायव्हर्जन पॉईंट्स उभारण्यात येणार आहेत. तसेच वाहतूक पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

या अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन अधिनियम १९८८ अंतर्गत कलम ११९/१७७, १२२/१७७, २०७ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

दरम्यान, द्वारका सर्कल बंद राहिल्यामुळे शहरातील वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून, नागरिकांनी प्रवासापूर्वी पर्यायी मार्गांची माहिती घेऊनच नियोजन करावे, तसेच प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्तालयाने केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *