“नात्याचा मुखवटा, फसवणुकीचा अभिषेक!”
“नात्याचा मुखवटा, फसवणुकीचा अभिषेक!”
मंत्र्यांचा पुतण्या आहे, मुख्यमंत्री ओळखीचे आहेत, आमदार जवळचे आहेत…
समाजावर इंप्रेशन मारायला, प्रशासनाची दिशाभूल करायला, समाजाला लुटायला, इतकं पुरेसं आहे का?
सायखेडा पोलिसात दाखल झालेलं प्रकरण एखाद्या गुन्हेगारी सिनेमासारखं नाही,
आपल्या लोकशाहीच्या शैलीवर उठलेला गंभीर सवाल आहे.
अभिषेक पाटील नावाचा तरुण,
स्वतःला मंत्री गिरीश महाजन यांचा पुतण्या म्हणवतो…
मुख्यमंत्र्यांच्या नावाचा धाक दाखवतो…
पत्रकारांनाही धमकी देतो –
“माझ्या डॉक्टर बहिणीविरोधात सुरु असलेली बातमीदारी थांबव, मी गिरीश भाऊंचा भाचा आहे.
कधी सायखेड्याला पुतण्या सांगतो, नाशिकच्या पत्रकाराला भाचा म्हणून धमकावतो आणि समाज? समाजच नाही तर प्रशासन देखील या भूल थापांसमोर शरण जाते.
सायखेड्यात मात्र त्या १९ वर्षाच्या तरुणीने धाडस केले. आणि या धाडसाला सायखेडा पोलिस ठाण्याचे प्रभारी ए पी आय ढोकरे यांनी देखील मंत्री संत्री अशा भुलथापांना बळी न पडता त्या तरुणीला न्याय देण्यासाठी पहिले पाऊल टाकले.
सायखेडा तालुक्यातील प्रकरण हे केवळ एका १९ वर्षीय तरुणीच्या फसवणुकीचं नव्हे, तर एका संपूर्ण समाजाच्या सत्तालोलुप गुलामगिरीचं निदर्शक आहे.
अभिषेक पाटील, एक नाव, एक चेहरा, एक अभिनय.
तो मंत्री गिरीश महाजन यांचा पुतण्या असल्याचा दावा करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खासदार श्रीकांत शिंदे हे आपले ‘खास’ असल्याचं सांगतो.
तो पोलिस नोकरीचं आमिष दाखवतो.
आणि एका युवतीकडून तब्बल चार लाख रुपये उकळतो. पण हे प्रकरण इथेच थांबत नाही. हा अभिषेक नावाचा कथित पुतण्या, भाचा पत्रकारांचेही तोंड दाबण्याचा कुटील प्रयत्न करतो.शासकीय योजनेचा रुग्ण लाभार्थ्यांना फायदा नाकारून रुग्णाच्या नातेवाईकांकडून उपचाराचे पैसे लाटणारे एक हॉस्पिटल, त्याच रुग्णाच्या नावावर शासकीय योजनेचाही निधी लाटते. याची बातमी करणे कुठला गुन्हा? ती बातमी पत्रकाराने थांबवावी म्हणून याच अभिषेकने गिरीश महाजन यांचा भाचा असल्याचे सांगून धमकी दिली होती.अभिषेकने केवळ आर्थिक फसवणूक केली नाही, तर एक पत्रकारालाही धमकावलं.अशाच षडयंत्राचा वापर करून संबंधित पत्रकारविरुद्ध न केलेला गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस प्रशासनानेही अधिक खोलात जाण्याची तसदी न घेता पत्रकार आयता सापडला म्हणून की काय गुन्हा दाखल करून घेतला. वास्तविक सदविवेक वापरून तक्रार वास्तव की खोडीची याची शहनिशा पोलिसांना करणे शक्य होते. मात्र हा विवेक पुण्यासारख्या निवडक प्रकरणातच वापरला जातो, आणि त्याचा फायदा सत्तेचे खरे खोटे नातेवाईक घेतात.
अभिषेकची मोडस ऑपरेंडी हा संवाद नाही,
ही एक धमकीची भाषा आहे,जी राजकीय ओळखीतून जन्मते,
आणि जिथे माध्यमांची निर्भयता विकत घेण्याचा प्रयत्न केला जातो.
हे एक गुन्हेगारी प्रकरण नाही. हे आपल्याच विश्वासावर झालेला बलात्कार आहे.
आपण मंत्र्यांच्या नावाने चहा पितो.
त्यांच्या फोटोखाली मान वाकवतो.
कोणी त्यांचा भाचा, चुलता, मेहुणा, नातू म्हणाला, की आपल्याला वाटतं ‘हा काहीतरी करून दाखवेल’.
आणि तिथेच सुरू होते गुलामीची पायरी.
एकतर आम्ही सत्तेच्या नावाने फसवले जातो,
किंवा सत्तेच्या नावावर आमचं मौन विकलं जातं.
कुणाचं ‘नातं’ हीच पात्रता ठरत असेल, तर इतर पात्रतेला काय अर्थ उरतो? मंत्र्यांचा पुतण्या, भाचा असणं ही नोकरी लावण्याची हमी असेल, तर अभ्यास का करायचा ?
जर पत्रकारांनाही “नात्याच्या” धाकाने गप्प केलं जात असेल, तर बातम्या कुणाच्या सांगण्यावर लिहायला हव्यात. असे अभिषेक पावलो पावली भेटतील.
जोपर्यंत आपण त्यांच्या तोंडावर चपराक मारणार नाही.
आज एक युवती गंडली,
उद्या तिच्या जागी तुम्ही असाल, तुमचा मुलगा, तुमची मुलगी, तुमचा मित्र.अन् त्यांच्या भावनांवरही एखादं “राजकीय नात्याचं” पांघरून असाच एखादा ‘अभिषेक’ घालेल –
धोका, फसवणूक आणि मौनाच्या पिंडीवर सत्तेच्या नात्याचा हा अभिषेक.
“लोकशाहीत सत्ताधाऱ्यांचं नातं ही जबाबदारी असते, अधिकार नव्हे!
अन्यथा, समाज नात्यांच्या नावावर फसवला जातो –
अन त्याचा अर्थ
गुन्हेगार काहीही करू शकतो, फक्त ‘नावं’ मोठं असलं की पुरे.”एव्हढाच उरतो.
मंत्र्यांचा पुतण्या…
मुख्यमंत्र्यांचा ‘खास’…
आमदारांचा ‘घरचा’…
हे ऐकूनच आपली मती गहाण पडते, विवेक सुटतो आणि आपण स्वतःहून फसवणुकीच्या गुहेत प्रवेश करतो.सायखेडा तालुक्यातील प्रकरण हे केवळ एका १९ वर्षीय तरुणीच्या फसवणुकीचं नव्हे, तर एका संपूर्ण समाजाच्या सत्तालोलुप गुलामगिरीचं निदर्शक आहे.काय अवस्था झालीये आपली.
आपण लोकशाहीचे नागरिक आहोत की सत्ता नावाच्या पिंड्याभोवती फेर धरणारी गर्दी?
एखाद्याचं कुणाशी नातं आहे, हेच सत्य मानणं – ही तर आधुनिक गुलामगिरीच आहे.
फसवणूक झालेल्या मुलीला सहानुभूती हवीच, पण समाजाला आरसा दाखवण्याची गरज याहीपेक्षा मोठी आहे.
कारण एकटा अभिषेक दोषी नाही,दोषी आहे एक संपूर्ण मानसिकता,जी राजकारण्यांची नावे ऐकली की डोळसपणे आंधळी होते, आणि”पद, पावर आणि पुतण्याची ओळख” म्हणजेच सर्व काही समजते.
आज एक अभिषेक फसवतोय,
उद्या अनेक अभिषेक जन्म घेतील –
जोपर्यंत आपण ‘ओळखीच्या धर्मा’तून बाहेर पडत नाही.
“जेव्हा लोक सत्यापेक्षा नाव, दिसणाऱ्या चेहऱ्यावर विश्वास ठेवतात,
तेव्हा गुन्हेगार फसवणूक करत नाही, तर तेव्हा समाज स्वतःला लुटून घेतो!”