बांगलादेशी दलालांच्या रॅकेटचा खुलासा : १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार; वेश्याव्यवसायासाठी जबरदस्ती; हार्मोनल इंजेक्शनद्वारे वय वाढवल्याचा आरोप
बांगलादेशी दलालांच्या रॅकेटचा खुलासा : १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार;
वेश्याव्यवसायासाठी जबरदस्ती; हार्मोनल इंजेक्शनद्वारे वय वाढवल्याचा आरोप
हा केवळ १२ वर्षाच्या मुलीचा हा प्रश्न नाही,ही बाब केवळ गुन्हेगारी नाही, तर मानवी मूल्यांना हादरवणारी आहे. या दलालांच्या मुसक्या आवळून संपूर्ण रॅकेट उघड करण्याची गरज आता अत्यंत तातडीची व अनिवार्य आहे.
ठाणे / काशीगाव :-प्रतिनिधी
काल उघडकीस आलेल्या बांगलादेशी दलाल व अल्पवयीन मुलींच्या वेश्याव्यवसाय रॅकेट प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. एफआयआर प्रक्रियेदरम्यान, वेश्याव्यवसायासाठी पळवून आणलेली मुलगी केवळ १२ वर्षांची असून तिचा जन्म २०१३ सालचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेले बांगलादेशी दलाल याआधीही अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी राहिले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाने ठाणे सेंट्रल जेलमध्ये POCSO (बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा) अंतर्गत ८ वर्षे शिक्षा भोगली आहे, तर दुसऱ्याने अंमली पदार्थ प्रकरणात ४ वर्षे कारावास भोगले असल्याचे उघड झाले आहे.
तपासादरम्यान आणखी एक संतापजनक बाब पुढे आली. या अल्पवयीन मुलींना अधिक वयस्कर दिसण्यासाठी ₹७०,००० किंमतीचे हार्मोनल इंजेक्शन्स दिले जात होते, अशी माहिती खुद्द दलालांनी तपास यंत्रणेला दिली आहे.
प्राथमिक तपासातून असेही समजते की या दलालांच्या संपर्कात अजून अनेक बांगलादेशी मुली आहेत, ज्यांचा वापर अशाच रॅकेटमध्ये केला जातो.
डॉ. बिनू वर्गीस, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार, यांनी या गंभीर प्रकरणात एमबीव्हीव्ही पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांना विनंती केली आहे की, संबंधित AHTC (Anti Human Trafficking Cell) क्राईम ब्रँचच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना तपास सखोल करण्याचे आदेश द्यावेत.
ते म्हणाले की, अनेक वेळा रेड, रेस्क्यू आणि एफआयआरनंतर प्रकरण स्थानिक पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात येते, जिथे सामान्य तपासी अधिकारी तपास करतात परिणामी प्रकरणाच्या मुळाशी न जाता तपास अर्धवट राहतो.
“मी स्वतः काल रात्री २:४० वाजेपर्यंत काशीगाव AHTC क्राईम ब्रँचमध्ये उपस्थित होतो,” अशी माहिती डॉ. बिनू वर्गीस यांनी दिली.
ही बाब केवळ गुन्हेगारी नाही, तर मानवी मूल्यांना हादरवणारी आहे. या दलालांच्या मुसक्या आवळून संपूर्ण रॅकेट उघड करण्याची गरज आता अत्यंत तातडीची व अनिवार्य आहे.



