‘सच की पुकार’ : पत्रकारांच्या मुक्या वेदनांना मिळाला आवाज, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा प्रवास आला गाण्यामध्ये..! राज्यपालांच्या हस्ते १५ मार्चला होणार जागतिक लोकार्पण सोहळा
‘सच की पुकार’ : पत्रकारांच्या मुक्या वेदनांना मिळाला आवाज,
‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा प्रवास आला गाण्यामध्ये..!
राज्यपालांच्या हस्ते १५ मार्चला होणार जागतिक लोकार्पण सोहळा
मुंबई : समाजात सत्याचा आवाज उठवणाऱ्या पत्रकारांच्या आयुष्यात अनेक संघर्ष, दबाव आणि वेदना दडलेल्या असतात. बाहेरून पाहताना पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्याची प्रक्रिया वाटत असली, तरी वास्तवात ती सत्यासाठी आणि सामान्य माणसाच्या हक्कांसाठी लढली जाणारी एक सततची लढाई आहे. याच संघर्षाला शब्दबद्ध करणारे आणि पत्रकारांच्या मनातील दडपलेल्या भावनांना वाट करून देणारे “सच की पुकार” हे पत्रकारांची देशातील सर्वात मोठी संघटना असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’ चे गीत येत्या १५ मार्च २०२६ रोजी जगभरातील पत्रकारितेला समर्पित केले जाणार आहे.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित विशेष सोहळ्यात राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते आणि अमृता फडणवीस यांच्यासह विविध मंत्री व मान्यवरांच्या उपस्थितीत या गीताचे प्रकाशन होणार आहे. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’ चे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी हे गीत लिहिले असून, सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी आपल्या भावस्पर्शी सुरांनी ते सजवले आहे. पत्रकारितेच्या जगात काम करणाऱ्या अनेकांसाठी हे गाणे केवळ एक संगीत रचना नसून त्यांच्या आयुष्याचे प्रतिबिंब ठरणार आहे.
“सन्नाटों में जो फुसफुसाहट थी वो आवाज बन गयी” या ओळीने सुरू होणारे हे गीत समाजातील शांततेत दडलेल्या सत्याचा वेध घेते. अनेकदा दबाव किंवा भीतीमुळे सत्य मांडणे धोक्याचे असते, तरीही ते कधीतरी मोठ्या स्वरात समोर येतेच, हे या गीताचे वैशिष्ट्य आहे. “एक दीप जला सच की राह में, हर पत्रकार की आँखों में उम्मीद जगी” या ओळीतून पत्रकारितेची मूलभूत भूमिका स्पष्ट होते. अंधार कितीही गडद असला तरी सत्याचा दीप लावण्याचे काम पत्रकार करतात, हा संदेश गीतकार संदीप काळे यांनी प्रभावीपणे मांडला आहे.
या गीताचा सर्वात प्रभावी भाग म्हणजे “दीवारें डर की टूटे आज, सवालों के पुल हमने बनाये अभी” ही ओळ. पत्रकारितेचे मूळ तत्त्व म्हणजे प्रश्न विचारणे आणि याच प्रश्नांच्या जोरावर लोकशाही जिवंत राहते. हा प्रवास धोकादायक असला तरी भीतीच्या भिंती मोडून समाजासाठी प्रश्नांचे पूल बांधण्याची जबाबदारी पत्रकार पार पाडतात, याचा गौरव या गीतात केला आहे. तसेच, “घर-द्वार शिक्षा बने पहचान, पत्रकारिता में बचता हर इंसान” या ओळींतून पत्रकारितेचा मानवी चेहरा आणि अन्यायाविरुद्ध उभी असलेली शक्ती दिसून येते.
या गीतामागे संदीप काळे यांची चार वर्षांची मेहनत आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील अनुभवांचे संचित आहे. व्हॉईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून त्यांनी मांडलेली ही संकल्पना सोनू निगम यांच्या संवेदनशील आवाजा मुळे अधिक उंचावली आहे. त्यांच्या आवाजातील जादूमुळे या गीतातील वेदना, आशा आणि संघर्ष थेट श्रोत्यांच्या काळजाला भिडतो. आजच्या डिजिटल युगात, जिथे अफवांचे पेव फुटले आहे, तिथे जबाबदार पत्रकारितेची आठवण करून देणारे हे गीत अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल. “सच की पुकार” हे गीत केवळ एक गाणे नसून पत्रकारितेच्या इतिहासातील एक वेगळा आणि अर्थपूर्ण प्रयत्न ठरणार आहे.
सर्व ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’ चे सर्व पदाधिकारी हे गाणे एकूण भावून झाले आहेत. https://www.youtube.com/watch?v=P2o3-lY7DfI या लिंकवर गाणे ऐकता येईल.
______________________________________________________



