४० किलो गांजाची तस्करी: दोन आरोपींना १० वर्षे सश्रम कारावास, ४ लाखांचा दंड
४० किलो गांजाची तस्करी: दोन आरोपींना १० वर्षे सश्रम कारावास, ४ लाखांचा दंड
नाशिक | प्रतिनिधी
वडाळा-पाथर्डी रोड परिसरात ४० किलोहून अधिक गांजाची वाहतूक करून विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना अखेर न्यायालयाने कडक शिक्षा सुनावली आहे. सुमारे सहा वर्षे चाललेल्या खटल्याच्या सुनावणीनंतर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने दोघांनाही १० वर्षे सश्रम कारावास आणि एकूण ४ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीत १८ जून २०२० रोजी पहाटे १.१५ वाजता आयशा नगर परिसरातील कुरेशी यांच्या तबेल्याजवळ ही कारवाई करण्यात आली होती. पोलिसांनी टाटा इंडिगो (एमएच-०२-सीडी-१५४४) या वाहनातून ४० किलो ५०० ग्रॅम वजनाचा गांजासदृश्य अंमली पदार्थ जप्त केला होता. या अंमली पदार्थासह इतर मुद्देमाल मिळून सुमारे ११ लाख ३२ हजार ४०० रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला होता.
या प्रकरणी शफिक सत्तार शहा (वय ३०, रा. वडाळागाव) आणि गयाशोद्दीन नियाजुद्दीन शेख (वय ३४, रा. इंदिरानगर, नाशिक) यांच्याविरोधात एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत कलम ८, २०, २२ आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोघांनी संगनमत करून अंमली पदार्थाची वाहतूक व विक्री करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज बांगर यांनी केला. त्यांनी आरोपींविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून दोषारोपपत्र जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय क्रमांक ४, नाशिक येथे दाखल केले होते.
आज (९ मार्च २०२६) जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. भंसाली यांनी फिर्यादी, साक्षीदार व पंच यांच्या साक्षी तसेच तपासातील परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरत दोन्ही आरोपींना दोषी ठरवले. न्यायालयाने एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(सी) व २०(बी) तसेच कलम २९ अंतर्गत प्रत्येकी १० वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी २ लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त एक वर्ष सश्रम कारावास भोगावा लागणार आहे.
या खटल्यात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता अॅड. रविंद्र निकम यांनी बाजू मांडली. तसेच अभियोग कक्षाचे प्रभारी अधिकारी प्रदीप गायकवाड, कोर्ट अंमलदार तल्लीम खान आणि कोर्ट पैरवी अधिकारी कविता महाले यांनीही या प्रकरणात सातत्याने पाठपुरावा केला.
दरम्यान, आरोपींना शिक्षा होण्यासाठी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके, सुधाकर सुरडकर तसेच मुंबईनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

