कर्तव्यात कसूरचा ठपका; धुळेचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्ता देगांवकर निलंबित विभागीय चौकशीचे आदेश ; नंदुरबार मुख्यालयात मुक्काम डॉ. रवींद्र सोनवणे यांच्याकडे तात्पुरता कार्यभार
कर्तव्यात कसूरचा ठपका; धुळेचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्ता देगांवकर निलंबित
विभागीय चौकशीचे आदेश ; नंदुरबार मुख्यालयात मुक्काम डॉ. रवींद्र सोनवणे यांच्याकडे तात्पुरता कार्यभार
धुळे / प्रतिनिधी :
कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून धुळे जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्ता नागोराव देगांवकर यांना राज्य शासनाने निलंबित केले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने त्यांच्या विरोधात विभागीय चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेतला असून निलंबनाचा आदेश १० मार्चपासून तात्काळ लागू करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील नियम ४ (१) (अ) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत डॉ. देगांवकर निलंबित राहणार असून निलंबन काळात त्यांचे मुख्यालय नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात निश्चित करण्यात आले आहे. सक्षम अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच निलंबन कालावधीत महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ नुसार डॉ. देगांवकर यांना कोणतीही खाजगी नोकरी स्वीकारता येणार नाही किंवा व्यापार-उद्योगात सहभाग घेता येणार नाही. नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यास गंभीर गैरवर्तन मानून पुढील कारवाई केली जाईल, असेही शासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, निलंबन काळात महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८१ नुसार त्यांना निर्वाह भत्ता व पूरक भत्ते देण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद आहे.
या घडामोडीनंतर धुळे जिल्हा रुग्णालयातील प्रशासकीय कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी आरोग्य सेवा उपसंचालक, नाशिक मंडळ यांनी स्वतंत्र आदेश काढला आहे. त्यानुसार धुळे जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी (बधिरीकरणतज्ञ) वर्ग-१ डॉ. रवींद्र प्रकाश सोनवणे यांच्याकडे जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा अतिरिक्त कार्यभार पुढील आदेशापर्यंत सोपविण्यात आला आहे.
डॉ. सोनवणे यांनी तात्काळ कार्यभार स्वीकारून त्याबाबतचा अहवाल संबंधित कार्यालयांना सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील कामकाजाबाबत नेमकी कोणती त्रुटी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली याबाबत आरोग्य विभागाकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली, तरी या प्रकरणामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.

