क्राईम

“मी बांगलादेशी, रोहिंग्या की अतिरेकी?” – माजी नगराध्यक्ष दीपक भोसले यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे धक्कादायक अर्ज


“मी बांगलादेशी, रोहिंग्या की अतिरेकी?” – माजी नगराध्यक्ष दीपक भोसले यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे धक्कादायक अर्ज

 

मालेगाव | प्रतिनिधी

मालेगावचे माजी नगराध्यक्ष दीपक श्रीराम भोसले यांनी आपल्याला बांगलादेशी, रोहिंग्या व अतिरेकी असल्याचे संबोधून बदनामी केल्याचा आरोप करत नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडे सविस्तर अर्ज सादर केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आपण भारतीय नागरिक असल्याचे स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली असून न्याय न मिळाल्यास मुख्यमंत्री दालनात आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

भोसले यांनी दिलेल्या अर्जात नमूद केले आहे की, ते गेल्या सुमारे ६३ वर्षांपासून मालेगाव शहरात वास्तव्यास असून त्यांचा जन्मही मालेगावमध्येच झाला आहे. त्यांच्या कुटुंबाचा स्थानिक राजकारणात सुमारे सहा दशकांचा इतिहास आहे. त्यांचे वडील कै. श्रीराम वेडू पाटील (भोसले) तसेच काका कै. लक्ष्मण वेडू भोसले हे मालेगाव नगरपालिकेत नगरसेवक होते. लक्ष्मण भोसले यांनी आरोग्य समिती सभापती म्हणूनही काम पाहिले होते.

दीपक भोसले हे १९८५ साली मालेगाव नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राज्यातील सर्वात कमी वयाचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर ६ मार्च १९८८ रोजी ते मालेगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष झाले. १९९१ पर्यंत त्यांनी नगराध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली. मालेगावसारख्या मुस्लिम बहुल शहरात हिंदू नगराध्यक्ष म्हणून काम केल्याचा उल्लेखही त्यांनी अर्जात केला आहे.

Advertisement

भोसले कुटुंबातील इतर सदस्यांचाही स्थानिक राजकारणात मोठा सहभाग राहिल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यांचे बंधू राजेंद्र भोसले हे दहा वर्षे नगरसेवक होते. तर त्यांच्या पत्नी अॅड. ज्योती भोसले या चार टर्म म्हणजेच सुमारे वीस वर्षे नगरसेवक राहिल्या असून त्या मालेगाव महानगरपालिकेच्या पहिल्या महिला उपमहापौरही होत्या.

भोसले यांनी अर्जात आरोप केला आहे की, मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त रविंद्र जाधव यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांना चुकीची माहिती दिल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. त्या माहितीच्या आधारावर पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी आपल्याला बांगलादेशी, रोहिंग्या व अतिरेकी असे संबोधल्याने संपूर्ण राज्यात आपली मानहानी झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या प्रकरणामुळे सार्वजनिक जीवनात वावरताना लोक संशयाने पाहू लागल्याचेही त्यांनी अर्जात नमूद केले आहे. आपल्या जन्मदाखल्याबाबत शंका उपस्थित करून आपले राजकीय व सामाजिक आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर मालेगाव महानगरपालिकेने माजी खासदारांना नेमकी कोणती माहिती दिली होती, हे सार्वजनिक करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच या प्रकरणात सत्य बाहेर येण्यासाठी महानगरपालिका आयुक्तांची ब्रेन मॅपिंग, लाई डिटेक्टर आणि नार्को टेस्ट करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणाची तातडीने चौकशी करून आपण बांगलादेशी, रोहिंग्या किंवा अतिरेकी नसल्याचे अधिकृतपणे जाहीर करावे, अन्यथा मुख्यमंत्री दालनात आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी अर्जात दिला आहे. या इशाऱ्यामुळे मालेगावच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *