भाग २० : ‘माल’ की गुटखा? डीसीआरमधील मौन नेमके कशासाठी? भाग २०:कुमार कडलग / नाशिक
भाग २० : *‘माल’ की गुटखा?* *डीसीआरमधील मौन नेमके कशासाठी?*
भाग २०:कुमार कडलग / नाशिक
देवळा तालुक्यात घडलेली जब्बार चांद तांबोळी यांच्या मृत्यूची घटना अनेक प्रश्न उपस्थित करून गेली आहे. रस्त्यात गाडी अडवणे, स्वतःला पोलीस असल्याचे सांगून अपहरण करणे, खंडणीची मागणी करणे आणि झटापटीदरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू होणे या सर्व बाबी अत्यंत गंभीर असून त्या संदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे. गुन्हेगारांना अटक होणे आणि त्यांच्यावर कायदेशीर प्रक्रिया सुरू होणे हे निश्चितच स्वागतार्ह आहे. अशा प्रकारच्या गुन्हेगारी कृत्याला कोणत्याही परिस्थितीत समर्थन देता येणार नाही.
मात्र या घटनेतून समोर आलेला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मालवाहू पिकअप गाडीत असलेला माल नेमका कोणता होता? फिर्यादीत गाडीत गुटखा असल्याचा उल्लेख झाल्याचे समोर येते. इतकेच नव्हे तर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रभारी पोलीस निरीक्षकांनीही गाडीत गुटखा असल्याचे सांगितल्याची माहिती आहे. तरीही दैनंदिन गुन्हे अहवालात (डीसीआर) त्या मालाचा उल्लेख फक्त “माल” असा करण्यात आल्याने संशयाची नवी किनार निर्माण झाली आहे.
प्रश्न असा आहे की जर गाडीत खरोखर गुटखा होता, तर डीसीआरमध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख का टाळण्यात आला? आणि जर गुटखा नव्हताच, तर फिर्यादीत व पोलिसांच्या प्राथमिक वक्तव्यात त्याचा उल्लेख कसा आला? या विसंगतीमुळे या प्रकरणाबाबत अधिक स्पष्टता आवश्यक असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
गुटखा बंदी असलेल्या राज्यात मोठ्या प्रमाणावर गुटखा वाहतूक होत असल्याचे आरोप यापूर्वीही वारंवार होत आले आहेत. त्यामुळेच या घटनेतून उभा राहणारा दुसरा प्रश्न अधिक गंभीर आहे. जर गुटखा वाहतूक होत होती, तर त्या संदर्भात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला का? कारण बंदी असलेल्या पदार्थाची वाहतूक ही स्वतःमध्येच गुन्हा आहे.
याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा पुढे येतो. गुटखा वाहतूक करणारी गाडी ही कोणासाठी माल घेऊन जात होती? त्या मागे कोणते नेटवर्क कार्यरत होते? आणि त्या साखळीपर्यंत पोलीस तपास पोहोचणार का? कारण अनेकदा अशा घटनांमध्ये चालक किंवा छोट्या स्तरावरील व्यक्ती पुढे येतात; पण मालाच्या मागील मोठे जाळे मात्र तपासाच्या कक्षेबाहेर राहते.
या घटनेतून जिल्ह्यात गुटखा तस्करी अद्याप सुरू असल्याच्या चर्चांना नव्याने खतपाणी मिळाल्याचेही दिसून येते. जर खरोखर गुटखा वाहतूक होत असल्याचे समोर आले, तर त्या संपूर्ण साखळीचा तपास करून जबाबदारांवर कारवाई करणे आवश्यक ठरेल.
म्हणूनच आता अपेक्षा आहे ती पोलिसांकडून स्पष्ट उत्तराची. गाडीत नेमका कोणता माल होता? गुटखा असल्यास त्यासंदर्भात स्वतंत्र गुन्हा दाखल होणार का? आणि त्या मालाच्या मागील जाळ्यापर्यंत तपास पोहोचणार का?
कारण एका मृत्यूच्या घटनेपलीकडे जाऊन या प्रकरणाने आणखी एक गंभीर प्रश्न समोर आणला आहे.
जिल्ह्यात गुटखा तस्करी खरंच थांबली आहे का, की ती अजूनही सुरूच आहे?
(क्रमशः)



