मालेगाव महापालिकेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार? फाईल्स गायब; SIT चौकशीची मागणी
मालेगाव महापालिकेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार? फाईल्स गायब; SIT चौकशीची मागणी
मालेगाव :गोकुळ निकम
मालेगाव महानगरपालिकेत कोट्यवधी रुपयांच्या निधीचा गैरव्यवहार, बनावट कागदपत्रांच्या आधारे बिले काढणे आणि महत्त्वाच्या फाईल्स गायब केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते कलीम युसूफ अब्दुल्लाह (ग्रीन मालेगाव ड्राइव्ह) यांनी केंद्र व राज्य सरकारसह विविध तपास यंत्रणांकडे लेखी तक्रार दाखल करून सखोल चौकशीची मागणी केली आहे.
तक्रारीत नमूद केल्यानुसार, मालेगाव महापालिकेचे माजी आयुक्त भालचंद्र गोसावी यांच्या कार्यकाळाशी संबंधित अनेक आर्थिक व्यवहार संशयास्पद असल्याचा आरोप करण्यात आला आहे. गोसावी यांना निलंबित करून बदली करण्यात आल्यानंतरही त्यांच्या बॅकडेटेड (मागील तारखेतील) स्वाक्षरीचा वापर करून कोट्यवधी रुपयांची बिले काढण्यात आल्याचा खळबळजनक दावा तक्रारीत करण्यात आला आहे. या व्यवहारांमुळे महापालिकेच्या निधीचा मोठ्या प्रमाणावर अपहार झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
तक्रारीत आणखी एक गंभीर बाब समोर आली असून शहरातील स्वच्छता कंत्राटाशी (Swachhata Theka) संबंधित अत्यंत महत्त्वाची प्रशासकीय फाईल महापालिकेतून जाणीवपूर्वक गहाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित फाईल गायब होणे हा पुरावे नष्ट करण्याचा प्रकार असल्याचे सांगत, यामागील जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारीत असेही नमूद करण्यात आले आहे की, माजी आयुक्तांच्या नियुक्तीबाबत लोकायुक्तांनी संशय व्यक्त केला होता. मात्र त्यानंतरही त्यांच्या कार्यकाळात झालेल्या कथित गैरव्यवहारांकडे दुर्लक्ष करण्यात आले, असा आरोप तक्रारदारांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचा दावा करत संपूर्ण प्रकरणाचा स्वतंत्र तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे.
SIT चौकशीसह फॉरेन्सिक ऑडिटची मागणी
या पार्श्वभूमीवर तक्रारदारांनी काही महत्त्वाच्या मागण्या पुढे केल्या आहेत. त्यानुसार संपूर्ण प्रकरणाची राज्यस्तरीय विशेष तपास पथक (SIT) मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच महापालिकेच्या ‘इनवर्ड-आउटवर्ड’ रजिस्टरसह डिजिटल रेकॉर्डची फॉरेन्सिक तपासणी करण्यात यावी, जेणेकरून संबंधित स्वाक्षऱ्यांची सत्यता आणि आर्थिक व्यवहारांची पडताळणी होऊ शकेल.
याशिवाय महत्त्वाची फाईल गहाळ झाल्याबाबत संबंधित विभागाचे प्रमुख आणि लिपीकांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या अधिकारी, कंत्राटदार आणि संबंधित राजकीय व्यक्तींविरुद्ध कारवाई करून त्यांच्या मालमत्तांवर टाच आणावी व संबंधित रक्कम वसूल करावी, अशीही मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
हायकोर्टात जाण्याचा इशारा
तक्रारदार कलीम युसूफ अब्दुल्लाह यांनी स्पष्ट केले आहे की, पुढील १५ ते २० दिवसांत या प्रकरणात ठोस कारवाई झाली नाही, तर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल. त्या याचिकेद्वारे अँटी करप्शन ब्युरो (ACB), आर्थिक गुन्हे शाखा (EOW), अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) यांच्या संयुक्त चौकशीची मागणी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, ही तक्रार राष्ट्रपती सचिवालय, पंतप्रधान कार्यालय, सीबीआय, अंमलबजावणी संचालनालय, महाराष्ट्र मुख्यमंत्री कार्यालय तसेच मालेगाव महापालिका आयुक्तांसह सुमारे १६ महत्त्वाच्या विभागांना पाठवण्यात आली असल्याची माहिती तक्रारदारांनी दिली आहे.
या गंभीर आरोपांमुळे मालेगाव महापालिकेतील प्रशासन आणि आर्थिक व्यवहारांबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या प्रकरणात संबंधित यंत्रणा काय भूमिका घेतात, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.



