बोगस ‘व्हाट्स ऍप लेटर बॉम्बने मुंबई पोलिस दल हादरले आठ महिला अंमलदारांकडून लैंगिक अत्याचारराचा इन्कार
बोगस ‘व्हाट्स ऍप लेटर बॉम्बने मुंबई पोलिस दल हादरले
आठ महिला अंमलदारांकडून लैंगिक अत्याचारराचा इन्कार
वास्तव गुलदस्त्यात,महिला पोलिसांसह खात्याची मात्र नाहक बदनामी
दुनियादारी /मुंबई
पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या हाती आलेल्या एका व्हाट्स ऍप पत्राने मुंबई पोलिस दलातच नव्हे तर एकूण महाराष्ट्र पोलिस दलात संतापजनक खळबळ उडाली आहे. व्हाट्स ऍपवर आलेले हे पत्र पोलिस दलासाठी लेटर बॉम्ब ठरले असून यातून पोलिस दलाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. खरे तर हे लेटर बॉम्ब म्हणून संभावना होत असलेले पत्र किंवा या पत्रातील मजकूर किती खरा किती खोटा यावर शंका उपस्थित होत असतांना सुरु असलेल्या चर्चेने पोलिस दल मात्र आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहेच शिवाय पोलिस दलात काम करणाऱ्या महिला अंमलदारांनाही शरमेने मान खाली घालावी लागत आहे.
मुंबई स्थित काही इंग्रजी वृत्तपत्र, तसेच वृत्त वाहिन्यांनी याबाबत तपशीलात बातमी प्रसिद्ध केली असून यात या पत्राचा हवाला देत वरिष्ठ अधिकार्यांनी सहकारी आठ महिला अंमलदारांवर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार केल्याचा उहापोह केला आहे.
मोटार ट्रान्सपोर्ट युनिटमधील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इतर युनिटमध्ये बदली होण्यापूर्वी आठ महिला कॉन्स्टेबलचे लैंगिक शोषण आणि अत्याचार केल्याचा दावा या पत्रात करण्यात आल्याचे या वृत्तपत्राने बातमीत म्हटले आहे.या वृत्तपत्राकडे अंमलदारांच्या सह्या असलेल्या या बोगस पत्राची एक प्रत असल्याचाही दावा करण्यात आला असून एका अंमलदाराने वरिष्ठांपासून गर्भधारणा झाल्याचे तसेच त्यांना अश्लील फोटो आणि व्हिडिओंसह धमकावले आणि ब्लॅकमेल केले.असाही दावा केला आहे.या पत्राची प्रत मुख्यमंत्री, मुंबईचे पोलीस आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांसह वरिष्ठ राजकारणी आणि पोलीस अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली होती.
माटुंगा उपायुक्तांसह स्थानीक पोलिस ठाण्यालाही या पत्राची प्रत पाठवण्यात आल्याचे या वृत्तांत म्हटले आहे..
अर्थात या पत्रातच विरोधाभास दिसत असून पत्राच्या पहिल्या ओळीत नाव असलेल्या एका हवालदाराने “हे खूप लाजिरवाणे आणि अपमानास्पद आहे.अशी प्रतिक्रिया व्यक्त करून
बोगस व्हॉट्सअॅप लेटरमध्ये बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या महिला कॉन्स्टेबलची नावे पाठवणाऱ्यावर कारवाईची मागणी केल्याचे हे इंग्रजी वृत्तपत्र म्हणते.
आणखी एका महिला अंमलदाराची प्रतिक्रिया देखील दिल्याचा दावा या वृत्त पत्राने केला असून, “आमच्यापैकी काहींनी आत्महत्येचा प्रयत्न केला कारण आमच्या कुटुंबीयांनी आम्हाला पत्रातील मजकुराबद्दल विचारणा केली. अशा बातम्या आल्यावर समाज स्त्रीकडे कसा पाहतो हे तुम्हाला माहीत आहे?”ही प्रतिक्रियाही छापली आहे.
पत्रात नावाचा उल्लेख असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले: “माझ्या पत्नीला हे पत्र व्हॉट्सअॅपवर मिळाले आहे. माझे कुटुंब मला प्रश्न विचारत आहे परंतु मी शांत आहे कारण मला माहित आहे की मी पत्रात जे काही सांगितले आहे ते मी केले नाही.”असेही या वृत्तात नमूद आहे.
एकूणच हा प्रकार अतिशय गंभीर असून यातील वास्तव आणि षडयंत्र शोधून पोलिस खात्याची प्रतिमा डागळण्याचा कुणी प्रयत्न करीत असेल तर त्याच्या मुसक्या बांधणे आवश्यक आहे. तर दुसऱ्या बाजूला पुरुष प्रधान संस्कृती नारी शक्तीचे शोषण करीत असेल तर या नराधम प्रवृत्ती ठेचायला हव्यात. महाराष्ट्र समाजातील मराठी नारी ताठ मानेने पोलिस दलात कायद्याचे रक्षण करू शकेल असे निरोगी वातावरण पोलिस दलात निर्माण व्हावे यासाठी कुणाचाही मुलाहिजा न बाळगता या प्रकरणाची खोलवर निष्पक्ष चौकशी होऊन सदरक्षणाय हे ब्रीद सार्थ ठरवावे, एव्हढीच अपेक्षा.
ताजी घडामोड:
चौकशी व्हावीच!
आठही महिला पोलीस शिपायांनी त्यांच्यासोबत कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचे तसेच अशी कोणतीही तक्रार न केल्याची स्पष्टोक्ती दिली आहे. आपल्या नावाचा गैरवापर केल्याचा आरोपही महिला पोलीस शिपायांनी केला आहे. मोटर परिवहन विभागातील पोलीस उपायुक्त तसेच दोन पोलीस निरीक्षकांनी आणि त्यांच्या हाताखालील कर्मचाऱ्यांनी बलात्कार तसेच गर्भपात करवल्याचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच मुंबई पोलीस आयुक्तांना हे पत्र पाठवण्यात आलं होतं. मुंबई पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली होती. महिला पोलीस शिपायांच्या नावाचा गैरवापर करून बनावट पत्र नेमकं कोणी पाठवलं आणि त्या मागच्या उद्देशाची चौकशी सूरू करण्यात आली आहे.