TCS धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरणाची सूत्रधार निदा खानच्या मुसक्या बांधल्या* *छत्रपती संभाजीनगरमधून ताब्यात*
*TCS धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरणाची सूत्रधार निदा खानच्या मुसक्या बांधल्या*
*छत्रपती संभाजीनगरमधून ताब्यात*
नाशिक :
महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या TCS धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरणात नाशिक शहर गुन्हे शाखेने आणखी एक महत्त्वाची कारवाई करत फरार महिला आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील विविध गुन्ह्यांच्या तपासादरम्यान ही कारवाई करण्यात आली.
देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक १५६/२०२६ अन्वये आरोपी निदा खान हिचा शोध सुरू होता. अखेर छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्तालय आणि शहर गुन्हे शाखेच्या मदतीने संयुक्त ऑपरेशन राबवत पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, धर्मांतराच्या नावाखाली मानसिक दबाव, लैंगिक छळ आणि संघटित पद्धतीने जाळे कार्यरत असल्याच्या आरोपांमुळे या प्रकरणाचा तपास अधिक संवेदनशील बनला आहे. यापूर्वीही या प्रकरणात अनेक आरोपींना अटक करण्यात आली असून विविध पोलीस ठाण्यांमध्ये स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत.
मुंबई नाका पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक १६६/२०२६ मध्ये तौसिफ बिलाल अत्तार, दानिश एजाज शेख, शाहरुख हुसेन शौकत कुरेशी आणि रझा रफीक मेमन या आरोपींची पोलीस कोठडी ५ मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्याचवेळी ही कारवाई तपासासाठी महत्त्वाची मानली जात आहे.
तपास यंत्रणेकडून पीडितांचे जबाब, मोबाईल डेटा, सोशल मीडिया संपर्क, आर्थिक व्यवहार आणि संभाव्य नेटवर्कचा सखोल तपास सुरू असून, या प्रकरणात आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे नाशिक शहरात मोठी खळबळ उडाली असून, धर्मांतर आणि लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे.



