सकल मराठा समाजाची मनमाड बंदची हाक ; कसोटीचा बुधवार :समाज माध्यमांवर प्रचार सुरु
सकल मराठा समाजाची मनमाड बंदची हाक
कसोटीचा बुधवार :समाज माध्यमांवर प्रचार सुरु
मनमाड प्रतिनिधी
सगे सोयरे या अध्यादेशाच्या मुद्यावरून सकल मराठा समाज शासन प्रशासनाच्या विरोधात उभा ठाकला असून मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे १० फेब्रुवारी पासून पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाला चौथा दिवस उलटून गेल्यानंतर देखील शासन प्रशासन पातळीवर कुठलाच सकारात्मक संकेत मिळण्याचे चिन्ह दिसत नाहीत, तर दुसरीकडे चौथ्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळल्याने समाजात तीव्र असंतोष पसरला आहे.
जरांगे पाटील यांच्या प्रकृतीला जरा जरी त्रास झाला तर तुमचे काही खरं नाही, असे संदेश समाज माध्यमात प्रसारित करून सरकारला इशारा दिला जात आहे. काही ठिकाणी बुधवार दिनांक १४ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंद ठेवला जाणार असल्याचीही चर्चा आहे.या चर्चेला मराठा क्रांती मोर्चाकडून अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरी, नाशिक शहरातील शिव तीर्थावर बुधवारी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण आणि मनमाड शहर बंद ठेवले जाणार असल्याचा अधिकृत संदेश मात्र समाज माध्यमावर फिरत आहे. एकूणच १५ फेब्रुवारी रोजी सरकार या मुद्यावर विधी मंडळाचे विशेष अधिवेशन बोलविणार असल्याचे वृत्त असले तरी जरांगे यांची ढासळलेली तब्येत्व, लाक्षणिक उपोषण आणि बंद या बाबींच्या अनुषंगाने बुधवारचा दिवस सरकारसाठी कसोटीचा ठरणार आहे.