सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक कॅन्सर विभाग सुरू उत्तर महाराष्ट्रातील पहिले TrueBeam LINAC with SGRT; स्थानिक पातळीवर जागतिक दर्जाचे कॅन्सर उपचार उपलब्ध_
सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक कॅन्सर विभाग सुरू
उत्तर महाराष्ट्रातील पहिले TrueBeam LINAC with SGRT; स्थानिक पातळीवर जागतिक दर्जाचे कॅन्सर उपचार उपलब्ध
नाशिक | प्रतिनिधी
उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांसाठी दिलासादायक ठरणारी मोठी वैद्यकीय सुविधा नाशिकमध्ये उपलब्ध झाली असून, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल (मणिपाल हॉस्पिटल्स नेटवर्क) येथे अत्याधुनिक कॅन्सर विभाग सुरू करण्यात आला आहे. या विभागात उत्तर महाराष्ट्रातील पहिले TrueBeam Linear Accelerator (LINAC) with Surface Guided Radiation Therapy (SGRT) तंत्रज्ञान उपलब्ध करण्यात आले असून, कॅन्सर रुग्णांना अधिक सुरक्षित, जलद आणि अचूक उपचार मिळणार आहेत. या विभागाचे उद्घाटन अभिनेते सचिन खेडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
मणिपाल हॉस्पिटल्सचे वेस्ट रिजनल डायरेक्टर साघिर सिद्दीकी यांनी सांगितले की, नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना जागतिक दर्जाच्या ऑन्कोलॉजी सेवा स्थानिक पातळीवर देण्याच्या उद्देशाने हा विभाग सुरू करण्यात आला आहे. अत्याधुनिक TrueBeam LINAC with SGRT तंत्रज्ञानामुळे उपचारांची अचूकता आणि सुरक्षितता अधिक वाढणार असून, रुग्णांना यासाठी मुंबई-पुण्यासारख्या महानगरांकडे जाण्याची गरज उरणार नाही.
हॉस्पिटल डायरेक्टर संजय चावला यांनी सांगितले की, गेल्या १२ वर्षांत रुग्णालयाने कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, नेफ्रोलॉजी, ऑर्थोपेडिक्स, क्रिटिकल केअर, पल्मोनोलॉजी, लॅप्रोस्कोपिक सर्जरी आणि डायबेटीस-एंडोक्रिनोलॉजी अशा विविध विभागांत लाखो रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि ठाणे येथील रुग्णही येथे उपचारासाठी येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या नव्या कॅन्सर विभागात डॉ. रोशन कुमार पाटील आणि डॉ. प्रशांत पाटील यांसारखे अनुभवी तज्ज्ञ कार्यरत आहेत. विभागात AI-आधारित निदान, TrueBeam LINAC with SGRT आणि Generation 2 PET-CT मशीन यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे कॅन्सरचे लवकर निदान, अचूक स्टेजिंग आणि प्रभावी उपचार शक्य होणार आहेत.
डॉ. प्रशांत पाटील यांनी सांगितले की, भारतातील आरोग्य क्षेत्रातील प्रगतीमुळे न्यूक्लिअर मेडिसिन कॅन्सरच्या निदान आणि उपचारात अत्यंत प्रभावी ठरत आहे. रेडिओॲक्टिव्ह ट्रेसर्सच्या मदतीने अंतर्गत अवयवांची अचूक तपासणी होऊन आजाराचे लवकर निदान शक्य होते.
तर डॉ. रोशन कुमार पाटील यांनी सांगितले की, रुग्णालयात FDG PET-CT, DOTA PET-CT आणि PSMA PET-CT या प्रगत सुविधा उपलब्ध आहेत. यामध्ये PSMA PET-CT प्रोस्टेट कॅन्सरसाठी, DOTA PET-CT न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरसाठी, तर FDG PET-CT इतर विविध कॅन्सर प्रकारांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
अनुभवी डॉक्टर, प्रशिक्षित सहाय्यक कर्मचारी, आधुनिक पायाभूत सुविधा आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध प्रगत उपचार यामुळे हा कॅन्सर विभाग उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. आता प्रगत कॅन्सर उपचारांसाठी मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज कमी होणार असल्याने रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.



