नाशिक पोलीसांची कामगिरी: ७७ फिर्यादींना तब्बल १.६९ कोटींचा मुद्देमाल परत
नाशिक पोलीसांची कामगिरी: ७७ फिर्यादींना तब्बल १.६९ कोटींचा मुद्देमाल परत
नाशिक (प्रतिनिधी) – नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-१ अंतर्गत पोलिसांनी गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल परत देण्याच्या मोहिमेत उल्लेखनीय यश मिळवले असून, एकूण ७७ फिर्यादींना तब्बल १ कोटी ६९ लाख ५१ हजार ९ रुपयांचा मुद्देमाल सन्मानाने परत करण्यात आला.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांतील जास्तीत जास्त मुद्देमाल जप्त करून तो लवकरात लवकर फिर्यादींना परत देण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार परिमंडळ-१च्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सर्व पोलीस ठाण्यांना विशेष सूचना देत ही मोहीम राबवली.
दि. ३१ मार्च रोजी आडगाव, पंचवटी, म्हसरूळ, भद्रकाली, सरकारवाडा, गंगापूर व मुंबईनाका या पोलीस ठाण्यांमार्फत मोठ्या प्रमाणात मुद्देमाल फिर्यादींना सुपूर्द करण्यात आला. यामध्ये ४४८.७५ ग्रॅम सोन्याचे दागिने, १५२ मोबाईल फोन, ४२ दुचाकी, ११ चारचाकी वाहने, १ रिक्षा, २ लॅपटॉप, १ टॅब तसेच रोख रक्कम यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, महिलांचे स्त्रीधन तसेच रोजगारासाठी आवश्यक असलेली वाहने परत मिळाल्याने फिर्यादींनी पोलिसांचे आभार मानले. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र आहे.
पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सांगितले की, मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये जास्तीत जास्त मुद्देमाल रिकव्हर करून तो दरमहा फिर्यादींना परत देण्याचा प्रयत्न सुरू राहणार आहे. या मोहिमेत सहभागी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले.



