सराफ बाजारातील अडचणी अग्रक्रमाने सोडवणार; ‘मध्य’ चे उमेदवार वसंत गिते यांची ग्वाही…
सराफ बाजारातील अडचणी अग्रक्रमाने सोडवणार;
‘मध्य’ चे उमेदवार वसंत गिते यांची ग्वाही…
नाशिक – प्रतिनिधी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष तसेच महाविकास आघाडीचे मध्य विधानसभा मतदार संघातील उमेदवार वसंत गिते यांनी सोमवारी (दि. ११) शहरातील आर्थिक उलाढालींचे प्रमुख केंद्र असणाऱ्या सराफ बाजारातील सुवर्णकार बांधवांची सदिच्छा भेट घेतली. सराफ बाजारातील विविध अडचणींची आपल्याला जाणीव असून या समस्यांचा अग्रक्रमाने निपटारा करण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याची ग्वाही श्री. गिते यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता रंगात आला असून महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गिते शहरातील विविध क्षेत्रातील व्यावसायिकांच्या भेटी घेत आहेत. सोमवारी सराफी व्यावसायिकांची भेट घेत ‘ड्रग्जमुक्त व भयमुक्त नाशिक’ साठी पाठीशी उभे रहाण्याचे आवाहन श्री. गिते यांनी केले. सराफ बाजारात भेडसावणाऱ्या अडचणींचा गेल्या १० वर्षात निपटारा झालेला नाही. या अडचणी आपल्याला ज्ञात असून निवडणुकीनंतर त्यांचा अग्रक्रमाने सोडवणूक केली जाईल. तसेच सराफ बाजाराला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी कार्यरत राहू, असे अभिवचन श्री. गिते यांनी दिले. याप्रसंगी शिवसेना प्रदेश संघटक विनायक पांडे, माजी महापौर यतीन वाघ, मध्य विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे, काँग्रेसचे मध्य विधानसभा प्रमुख निलेश (बबलू खैरे), शाम तांबोळी, तसेच नाशिक सराफ असोसिएशनचे गिरीश नवसे, राजू कुलथे, राजेंद्र दिंडोरकर, कृष्णा नागरे, कृष्णा खालपकर, राजेश नागरे, राजेंद्र भावसार, प्रशांत गुरव, नितीन नागरे यांच्यासह सराफी व आटणी व्यावसायिक, कारागीर उपस्थित होते.