क्राईम

सिव्हिल सर्जन शिंदे यांना पदमुक्त करा:  छावा क्रांतीवीर सेनेने वाचला भ्रष्ट मनमानी कारभाराचा पाढा ;आरोग्य मंत्र्यांना घातले साकडे 


सिव्हिल सर्जन शिंदे यांना पदमुक्त करा:

 छावा क्रांतीवीर सेनेने वाचला भ्रष्ट मनमानी कारभाराचा पाढा ;आरोग्य मंत्र्यांना घातले साकडे 

 

 

नाशिक प्रतिनिधी

नाशिक जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ.चारुदत्त शिंदे यांच्या मनमानी भ्रष्ट कारभारामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयाची कार्यक्षमता लयास गेली असून त्याचा दुष्परिणाम जिल्ह्यातील सामान्य जनेतच्या आरोग्यावर होत आहे. म्हणून त्यांना शासकीय रुग्णालयाच्या प्रभारी पदावरून तात्काळ मुक्त करावे अशी मागणी छावा क्रांतीवीर सेनेने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आरोग्य मंत्र्यांना केली आहे. याविषयी छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. नाशिक जिल्ह्याच्या या भावना आरोग्य विभागापर्यंत पोहचविण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दिले आहे.

 

या निवेदनात म्हटले आहे की,नाशिक जिल्हा रुग्णालय ही उत्तर महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाची आरोग्य सुविधा असून दररोज हजारो रुग्ण आपल्या उपचारासाठी येथे गर्दी करतात. परंतु,या रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ.चारुदत्त शिंदे यांच्या कार्यकाळात गंभीर स्वरूपाचे गैरप्रकार,भ्रष्टाचार, निष्काळजीपणा व मनमानी प्रशासन उघडपणे समोर आले आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या घटनांचा ससेमिरा जिल्ह्यातील नागरिकांना,आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि रुग्णांच्या कुटुंबियांना सहन करावा लागत आहे.अनेक वेळा रुग्ण अडचणीत असतात, त्या त्यावेळी फोन द्वारे किंवा प्रत्यक्षात संपर्क करण्याचा प्रयत्न केला जातो त्यावेळी सिविल सर्जन हे फोन उचलत नाहीत किंवा सांगितलेल्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत नाहीत असा अनुभव अनेक नागरिकांसह आम्हाला स्वतःला आलेला आहे.त्यांचे नात्यातील काही लोक राजकीय पक्षाचे मोठे पदाधिकारी असल्याने त्यांच्या नावाचा आणि पदाचा गैरवापर करून त्यांनी अनेक लोकांना वेठीस धरण्याचे काम करत आहेत. त्यामुळे त्यांची सखोल चौकशी करून यात ते दोषी असतील तर त्यांच्याबाबत गांभीर्यपूर्वक विचार करून निर्णय घ्यावा अशी मागणी या निवेदनात आहे. त्यांच्याबाबत काही गंभीर स्वरूपाच्या तक्रारी असून,त्या तक्रारीही या निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केल्या आहेत.

 

गंभीर तक्रारी व गैरकारभाराचे काही ठळक मुद्दे:

Advertisement

1.औषध खरेदीत भ्रष्टाचार:ब्लॅकलिस्टेड कंपनीकडून बाजारभावाच्या दुपटीने औषध खरेदी.

2.पोस्टमार्टममध्ये विलंब:मागासवर्गीय महिलेच्या मृतदेहाची 36 तास हेडसांड

3.मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांचा मानसिक छळ व धमक्या देणे

4.माता मृत्यू व बाळ बदलल्या जाण्याच्या घटना.

5.निकृष्ट शवपेट्या:मृतदेहावर अळ्या पडल्याची प्रकार.

6.ACB ट्रॅप असूनही संरक्षण:लाच घेताना सापडल्यावरही प्रशासन शांत.

7.सरकारी कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले रोखणे.

8.लॅब सुविधांचा अभाव:जबरदस्तीने खासगी लॅबकडे रुग्णांना पाठवणे.

9.कंत्राटी कर्मचाऱ्यांचे 6 महिन्यांपासून वेतन थकीत.

10.धुळे येथे दिव्यांग घोटाळा व गुन्हा दाखल.

11.गर्भलिंग निदान गैरव्यवहारात सहभाग.

12.डॉ.आनंद पवार यांना मारहाण.

13.शासन निर्देशांकडे दुर्लक्ष करत विना टेंडर खर्च.

14.प्रशासकीय अनुपस्थिती: नियमितपणे शुक्रवार दुपारनंतर शनिवार रविवार कामावर अनुपस्थित.

15.RTI कार्यकर्त्यांना धमकी,खोटे गुन्हे दाखल.

……..

 

छावा क्रांतिवीर सेनेच्या ठाम मागण्या:

1.डॉ.चारुदत्त शिंदे यांची तात्काळ जिल्हा रुग्णालयातून बदली करून निलंबन किंवा बडतर्फ करण्यात यावे.

 

2.त्यांच्याविरुद्ध विभागीय आणि न्यायालयीन चौकशी तात्काळ सुरू करावी.

 

3.गंभीर भ्रष्टाचार प्रकरणांची ACB,CAG व वैद्यकीय शिक्षण विभागाकडून सखोल चौकशी व्हावी.

 

 

आंदोलनाचा इशारा:

या सर्व गंभीर प्रकारांवर जर त्वरित आणि ठोस कार्यवाही करण्यात आली नाही,तर छावा क्रांतिवीर सेना,महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने नाशिकपासून मंत्रालयापर्यंत तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल.यामध्ये जिल्हा प्रशासन,आरोग्य विभाग,वैद्यकीय शिक्षण विभाग आणि शासनाची जबाबदारी असेल.रुग्णांच्या हक्कासाठी आणि आरोग्य व्यवस्थेच्या सशक्ततेसाठी आम्ही कोणतीही किंमत मोजण्यास तयार आहोत.पुढील पायऱ्या उचलण्याआधी हे निवेदन अंतिम इशारा समजावा.व लवकरात लवकर सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंधित व्यक्ती दोषी असेल तर?कठोरातील कठोर कारवाई त्यांच्यावर करावी

यावेळी नाशिक जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना संस्थापक अध्यक्ष करण गायकर नाशिक जिल्हा प्रमुख आशिष हिरे नाशिक महानगरप्रमुख योगेश गांगुर्डे मनोरमा पाटील दिनेश जाधव वैभव दळवी भारत पिंगळे किरण लवंड योगेश आहेर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *