समजावून सांगण्यापेक्षा समजून घेत उपचार करणारा डॉक्टर पोलिस उप आयुक्त; मितभाषी चेहरा :जास्त काही बोलेना कर्तव्य मात्र भुलेना!
समजावून सांगण्यापेक्षा समजून घेत उपचार करणारा डॉक्टर पोलिस उप आयुक्त;
मितभाषी चेहरा :जास्त काही बोलेना कर्तव्य मात्र भुलेना!
कुमार कडलग /नाशिक
जगाच्या पाठीवरील सर्वात प्रभावी शस्र कुठले असेल तर ते शब्द. या शब्दांनी घायाळ झालेल्या माणसाच्या मनावर झालेल्या जखमा कधीच भरून निघत नाहीत. एखाद्याला समजावून सांगण्याच्या भानगडीत वेळ आणि ऊर्जा खर्ची घालण्याऐवजी त्याला समजून घेत त्याच्या समस्येवर उपचार करणे अधिक प्रभावी ठरते, ही शिकवण आपल्या पोलिस असलेल्या जन्म दात्याकडून घेतलेले पोलिस उप आयुक्त डॉ. किरणकुमार चव्हाण यांनी नाशिक पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेचा पदभार स्वीकारला. ही बाब गुन्हेगार नव्हे तर गुन्हेगारी प्रवृत्ती नष्ट करण्याची सुरुवात ठरेल.
…….
आडात असेल तर पोहऱ्यात येते. त्याचप्रमाणे बालपणी किंबहुना मातेच्या उदरात पालन पोषण होत असतांना कुटुंबाकडुन अजाणतेपणे मिळालेले संस्कार आयुष्याच्या वाटेवर क्षणोक्षणी मदतीला येतात. याचे साक्षात उदाहरण म्हणजे नाशिकचे पोलिस उपायुक्त डॉ. किरणकुमार चव्हाण. सतरा अठरा वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत असलेला हा मितभाषी चेहरा “जास्त काही बोलेना, कर्तृत्वाची वाट काही भुलेना.”प्रथमदर्शनी, पहिल्यांदा भेटणाऱ्या व्यक्तीला हा चेहरा पोलिस दलासाठी बनला आहे का? अशी शंका येते.मात्र त्याच चेहऱ्याचे कर्तृत्व आणि काम करण्याची शैली जेंव्हा अनुभवास येते,तेंव्हा मात्र होमिओपॅथीची आठवण होते. माणूस वाचल्याशिवाय कळत नाही, असंच काहीसं.
होमिओपॅथीवरून आठवण झाली.वडील पोलिस खात्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक असल्याने लहानपणापासून वर्दी विषयी असलेले आकर्षण, आदर आणि वडिलांची इच्छा त्यांना स्टेथो स्कोप पासून खाकी कडे आकर्षित करण्यास निमित्त ठरली.शालेय जीवनापासून अभ्यासात हुशार.. दहावी बारावीला उत्तम गुण प्राप्त झाल्याने भगवान होमिओपॅथिक कॉलेज, संभाजीनगर या महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून होमियोपॅथिक डॉक्टर झाले.डॉक्टर म्हणून काही काळ नोकरी आणि काही काळ स्वतःचा दवाखाना सुरु करून समाजाचे उतराई होण्याचा प्रयत्न केला. तथापी मुलाने पोलिस खात्यात यावे ही वडिलांची इच्छा. त्या इच्छेला मान देऊन डॉ. किरणकुमार चव्हाण यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात यश प्राप्त केले. पोलिस उपधीक्षक (Dysp) म्हणून नाशिकच्या पोलिस अकादमीत प्रशिक्षण पूर्ण केले. आणि महाराष्ट्र पोलिस दलात सेवारत झाले. होमिओपॅथीची प्रॅक्टिस करणारा डॉक्टर पोलिस दलात दाखल झाला. आणि तीच ट्रीटमेंट कायम ठेवली. किरणकुमार चव्हाण यांची कार्य शैली होमिओपॅथी सारखी काम करीत आहे. परिणाम उशिरा दिसेल पण औषधांचे डोस नियमित दिले जात असल्याने रोगाचे मूळ मात्र नष्ट झाल्याशिवाय उपचार थांबवायचे नाहीत, ही त्यांची काम करण्याची पद्धत त्यांना जवळून ओळखणाऱ्या प्रत्येकाच्या अंगवळणी पडली आहे. हे सारं कुठून आलं? या प्रश्नाचे उत्तर अर्थातच कुटुंबकबीला.
किरणकुमार चव्हाण, परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील नवहाती तांडाचे सुपुत्र.१ ते ४थी – सरस्वती विद्या मंदिर, हिंगोली,५ ते ८वी – जिल्हा परिषद विद्यालय, नर्सी नामदेव, हिंगोली,९ ते १२वी – मानवत, परभणी बीएचएमएस – भगवान होमिओपॅथिक कॉलेज, संभाजीनगरअसा शैक्षणिक प्रवास पूर्ण करून वैद्यकीय व्यवसायानंतर नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत २००७ ते २००८ – प्रशिक्षण,२००८ ते २०११ – कोल्हापूर,२०११ ते २०१४ – बिलोली, नांदेड,२०१४ ते २०१५ – नाशिक पोलिस अकादमी,२०१५ ते २०१६ – पोलिस उपायुक्त, पोर्ट, मुंबई.२,०१६ ते २०१८ – परिमंडळ – १२, मुंबई२,०१९ ते २०२२ – पोलिस अधीक्षक, फोर्सवन, मुंबई,आणि आता २०२२ पासून नाशिक मध्ये पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत.
पोलिस अधिकारी व्हावं, ही वडिलांची इच्छा पूर्ण करणारे डॉ. किरण कुमार हे फणसा सारखे आहेत. फणसाची चव आणि रूप खाणाऱ्यालाच कळते. याचा अनुभव नाशिक शहराची गुन्हेगारी आता खऱ्या अर्थाने घेईल.खरी कमाई काय असते, खाकी फक्त मालमत्ता कमवण्याचे साधन नाही, खऱ्याचे खोटे, खोटे करणारा काळा रंग नाही, तर ही खाकी आहे, याची जाण असलेला पोलिस उपायुक्त दोन वर्षाच्या प्रतीक्षे नंतर का होईना लाभला. रत्नाची पारख करणाऱ्या जवाहीर पोलिस आयुक्तांनाही सलाम.