महाराष्ट्रातील दुकाने व आस्थापना २४ तास सुरू ठेवण्यास मुभा शासन परिपत्रक जारी: व्यापारी वर्गात समाधान
महाराष्ट्रातील दुकाने व आस्थापना २४ तास सुरू ठेवण्यास मुभा
शासन परिपत्रक जारी: व्यापारी वर्गात समाधान
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने आज जारी केलेल्या परिपत्रकानुसार, मद्य विक्री किंवा मद्य पुरवठा करणाऱ्या आस्थापना वगळता राज्यातील सर्व दुकाने, हॉटेल्स, उपाहारगृहे, खाद्यगृहे, मॉल्स, व्यापारी संकुले व इतर आस्थापना २४ तास खुले ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील व्यापाऱ्यांना व नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ नुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला आठवड्यातून सलग २४ तासांची विश्रांती अनिवार्य करण्यात आली आहे. त्याचबरोबर “दिवस” या संकल्पनेची व्याख्या मध्यरात्रीपासून सुरू होणाऱ्या चोवीस तासांच्या कालावधीसारखी करण्यात आली आहे. या अधिनियमाच्या तरतुदींच्या अधीन राहून आता सर्व आस्थापना २४ तास चालू ठेवता येतील, अशी स्पष्टता शासनाने केली आहे.
तथापि, १९ डिसेंबर २०१७ रोजीच्या शासन अधिसूचनेनुसार मद्य विक्री किंवा पुरवठा करणाऱ्या परमिट रुम, बिअरबार, डान्सबार, हुक्का पार्लर, डिस्कोथेक, तसेच वाईन आणि मद्य दुकाने यांच्या सुरू व बंद करण्याच्या वेळा निश्चित करण्यात आल्या असल्याने या आस्थापनांना मात्र २४ तास खुले ठेवता येणार नाही.
अलीकडेच विविध लोकप्रतिनिधी आणि व्यावसायिक संघटनांकडून स्थानिक प्रशासन व पोलिसांकडून २४ तास व्यवसायावर घालण्यात येणाऱ्या निर्बंधांबाबत तक्रारी शासनाच्या निदर्शनास आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर हे परिपत्रक जारी करण्यात आले असून, कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.
सदर आदेश महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर (www.maharashtra.gov.in) उपलब्ध असून, तो राज्यपालांच्या आदेशानुसार कार्यासन अधिकारी घनश्याम लक्ष्मी नारायण पाऊसकर यांच्या डिजिटल स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आला आहे.
राज्यातील व्यापाऱ्यांसाठी हे पाऊल महत्त्वाचे मानले जात असून, यामुळे विशेषतः महानगरांमध्ये रात्रीची अर्थव्यवस्था (Night Economy) वाढण्यास हातभार लागेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.