क्राईम

शेतकऱ्याची आक्रोश कथा: कोरडे अश्रू अराजकतेला कारणीभूत ठरले तर? भागवतराव सोनवणे यांना गावोगावच्या शेत शिवारातून दिसलेले भीषण वास्तव


शेतकऱ्याची आक्रोश कथा: कोरडे अश्रू अराजकतेला कारणीभूत ठरले तर?

भागवतराव सोनवणे यांना गावोगावच्या शेत शिवारातून दिसलेले भीषण वास्तव

गावोगावी पाण्याचा महापूर आहे, पण शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू मात्र कोरडे झालेत.

हेच कोरडे अश्रू जर पेटले, तर उद्या काय होईल याची कल्पनाही करू नका.

आम्ही काय पाप केलं होतं की देव एवढा कोपला?

एक पिकाचे नुकसान झाले, तर कर्ज पाणी काढून संसाराची गाडी पुन्हा रुळावर आणता येते.

पण या वेळी गावोगावी पंचनाम्याचा फार्स सुरू आहे.

तुम्ही म्हणता ३०% पेक्षा जास्त नुकसान असेल तर गुंठ्याला ८५ रुपये मिळतील.

पण शेत खंगळून गेले, माती वाहून गेली, बांध फुटले, नाले-ओढ्यांच्या काठाची जमीन शेतीयोग्य राहिली नाही.

काही शेतं इतकी खोल खड्ड्यात गेलीत की ती बुजवणं अशक्य आहे.

अशा शेतकऱ्यांसाठी तुमच्याकडे काय योजना आहे?

मातीच नाही, तर पिकणार काय?

विहिरींमध्ये गाळ गेला, काही थेट बुजून गेल्यात. मोटार, वायरिंग, स्टार्टर चिखलात बुडाले.

त्या परत सुरू होण्याची शक्यता नाही.

८५ रुपयाच्या पंचनाम्याच्या कागदाने अन्नदात्याची थट्टा करू नका.

आज कोटमगावच्या जत्रेत चावीचा खेळण्यातला ट्रॅक्टरसुद्धा त्या पैशात मिळत नाही.

 

आमची मागणी सरळ आहे:

पिकाचे १००% नुकसानभरपाई द्या.

Advertisement

फुटलेल्या बंधाऱ्यांच्या, बंडिंगाच्या, विहिरींच्या दुरुस्तीला स्वतंत्र मदत द्या.

शेतकऱ्यांच्या कर्जदारकीचा प्रश्न तातडीने सोडवा.

 

ही थट्टा आहे की दिलासा?

आम्ही दिवाळीला दिवा कसा पेटवायचा? तुम्ही म्हणता ५ लिटर राकेल देऊ.

शेतकरी आता संपल्यात जमा आहे.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ८,००० शेतकरी थकीत कर्जदार झालेत.

त्यांच्या जमिनी आता बँकांच्या मालकीच्या झाल्यात.

बँकांना सांगा—८५ रुपये तुमच्याच जवळ ठेवा, आमचं आयुष्य त्या पुंगळीत बसणार नाही.

 

कर्ज खाती NPA झाली आहेत.

PM किसान सन्मान योजनेचा पैसा बँक लीनमध्ये गेला आहे.

तुमच्या या लीनने आम्हाला इतके दीन केले की आमच्याकडे अश्रूंचा सुद्धा शब्द उरला नाही.

 

शेतकऱ्याला आता स्वतःचीच लाज वाटते—

बायकोला, मुलांना काय उत्तर द्यायचं, हा प्रश्न छळतो.

 

आज शेतकरी पाणी पाहून रडत नाही.

कारण सर्वत्र पाणीच आहे.

त्यात आणखी अश्रूंचा पूर नको आहे.

 

मानसशास्त्र सांगतं—कोरडे अश्रू सर्वात भयानक असतात.

तेव्हा जीव जळतो, कधी शरीर जळतं.

सरकारच्या अजूनही लक्षात येत नाही. खचलेले लोकं काय पाऊलं उचलतील, तो दिवस आता दूर नाही.

नेपाळ आणि अन्य देशात तरुणाई रस्त्यावर आली. यादवी झाली. महाराष्ट्रात शेतकरी कोपला तर? 

-भागवत सोनवणे 

समन्वयक, शेतकरी संघर्ष समिती

….. दुनियादारी won’t lie……….


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *