ताज्या घडामोडीसामाजिक

पत्रकारांच्या मुलांसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा पुढाकार  राज्यातील सर्व जिल्ह्यांत राबविला अनोखा उपक्रम   मागणी केलेल्या प्रत्येकाला शैक्षणिक मदत  महाराष्ट्रानंतर सर्व राज्यांत राबवणार उपक्रम


पत्रकारांच्या मुलांसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा पुढाकार

 

 राज्यातील सर्व जिल्ह्यांत राबविला अनोखा उपक्रम 

 मागणी केलेल्या प्रत्येकाला शैक्षणिक मदत

 महाराष्ट्रानंतर सर्व राज्यांत राबवणार उपक्रम

मुंबई (प्रतिनिधी) :

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही. ओ. एम. इंटरनॅशनल फोरम’ने राज्यभरातील पत्रकारांच्या मुलांच्या शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी मोठा पुढाकार घेतला आहे. राज्यातील मागणी असणाऱ्या सर्व जिल्ह्यांत शैक्षणिक किट, समुपदेशन, प्रवेश प्रक्रियेविषयी मार्गदर्शन, शैक्षणिक साहित्य आदीसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. अगोदर महाराष्ट्र आणि मग भारतातील सर्व राज्य अशा टप्प्याटप्प्याने या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

 

एका खास कार्यक्रमाचे आयोजन करून ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शैक्षणिक किट वाटपाचा शुभारंभ मुंबईतील रेडिओ क्लब येथे करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही. ओ. एम. इंटरनॅशनल फोरम’चे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्यासह संस्थेचे प्रमुख चंद्रमोहन पुप्पाला, शंतनू डोईफोडे, दिव्या भोसले, चेतन बंडेवार, परवेज खान, गोरक्षनाथ मदने, शिवाजी गावंडे, किशोर कारंजेकर, नरेंद्र देशमुख, गगन महोत्रा, व्यंकटेश जोशी उपस्थित होते.

 

जगभर पत्रकार आणि पत्रकारितेसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही. ओ. एम. इंटरनॅशनल फोरम’ने ‘क्रांती’ घडवली आहे. आज या संस्था जगातील तब्बल ५६ देशांपर्यंत पोहोचल्या असून ५ लाख ७० हजार पत्रकार या संस्थेमध्ये पूर्ण वेळ काम करतात. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही. ओ. एम. इंटरनॅशनल फोरम’ हे केवळ पत्रकारांसाठी सामाजिक आंदोलन नसून एक भव्य व्यासपीठ बनले आहे. पत्रकारांचे अनेक प्रश्न सोडवण्यासोबतच पत्रकारितेला सुधारण्याचे, सामाजिक ढाच्यात बसवण्याचे कामही सातत्याने करण्यात आले आहे.

 

संस्थेच्या वतीने जी पंचसूत्री हाती घेतली आहे त्यामध्ये पत्रकारांच्या मुलांचे शिक्षण हा एक महत्त्वाची पंचसूत्री आहे. या पंचसूत्रीप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये असलेल्या आणि शिक्षणासाठी मागणी केलेल्या पत्रकारांच्या पाल्यांसाठी एज्युकेशन किट वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. या किट्स अन्नामृत फाउंडेशन मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गंभीरे व रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पिअरच्या अध्यक्षा श्रीमती नूपूर देसाई यांच्या सहकार्याने दिल्या गेल्या.

Advertisement

 

वेळी बोलताना गोरक्षनाथ गंभीरे म्हणाले,“पत्रकार समाजाच्या असंख्य समस्या समाजासमोर आणतो. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आपण किमान एवढा हातभार लावू शकतो याचा आम्हाला अभिमान आहे. शिक्षण हीच खरी गुंतवणूक असून ‘व्हॉईस ऑफ मीडिया’सारख्या संस्थांनी हा उपक्रम राबवून देशात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. अन्नामृत फाउंडेशन नेहमीच अशा उपक्रमांसोबत खांद्याला खांदा लावून उभे राहील.”

 

श्रीमती नूपूर देसाई म्हणाल्या,“पत्रकारांच्या मुलांसाठी हा उपक्रम म्हणजे केवळ शैक्षणिक किट नव्हे तर त्यांच्या भविष्याचा आधार आहे. रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पिअरला अशा उपक्रमाचा भाग होण्याचा सन्मान मिळतो आहे. शिक्षणाद्वारे समाज परिवर्तन घडते आणि पत्रकारांच्या मुलांना हाच बदल घडवून आणण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असा आमचा विश्वास आहे.”

 

व्हॉईस ऑफ मीडिया’चे महासचिव चंद्रमोहन पुप्पाला म्हणाले,“व्हॉईस ऑफ मीडिया ही केवळ पत्रकारांसाठी आवाज देणारी संस्था नसून त्यांच्या कुटुंबासाठीही एक सुरक्षा कवच आहे. महाराष्ट्रात सुरू झालेला हा उपक्रम लवकरच देशभर राबविण्यात येईल. ‘पत्रकारांच्या मुलांना शिक्षणाची आणि संधीची हमी’ हा आमचा नवा संकल्प आहे आणि तो पूर्ण होईपर्यंत ही मोहीम थांबणार नाही.”

 

महाराष्ट्रानंतर देशातील सर्व राज्यात किट वाटपाचा उपक्रम हाती घेतला जाणार आहे, अशी माहिती यावेळी संदीप काळे यांनी दिली. कार्यक्रमास सर्व पदाधिकारी उपास्थित होते.

फोटो ओळ:

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही. ओ. एम. इंटरनॅशनल फोरम’ च्या वतीने राज्यभरातील पत्रकारांच्या मुलांना एज्युकेशन किट वाटपाचा शुभारंभ मुंबईच्या रेडिओ क्लबमध्ये करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्यासह संस्थेचे प्रमुख चंद्रमोहन पुप्पाला, शंतनू डोईफोडे, दिव्या भोसले, चेतन बंडेवार, परवेज खान, गोरक्षनाथ मदने, शिवाजी गावंडे, किशोर कारंजेकर, नरेंद्र देशमुख, गगन महोत्रा, व्यंकटेश जोशी, तसेच अन्नामृत फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गंभीरे उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *