संगमनेरच्या होलमराजा काठीचा जेजुरीत शिखरी सोहळा आमदार अमोल खताळ यांची स पत्नीक पूजा
संगमनेरच्या होलमराजा काठीचा जेजुरीत शिखरी सोहळा
आमदार अमोल खताळ यांची स पत्नीक पूजा
संगमनेर/प्रतिनिधी:
“बोल सदानंदाच येळकोट… येळकोट येळकोट जय मल्हार, मल्हार मार्तंड की जय, कडे पठार महाराज की जय” अशा जयघोषांमध्ये भंडार खोबऱ्याची मुक्त उधळण करत संगमनेरच्या मानाच्या होलमराजा काठीचा शिखरी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पाडला.
सालाबादप्रमाणे याही वर्षी माघ पौर्णिमेनिमित्त संगमनेर शहर आणि तालुक्यातील असंख्य खंडोबा भक्त जेजुरीत दाखल झाले. संगमनेर तालुक्याच्या वतीने निघालेल्या होलमराजाच्या काठीची मिरवणूक दुपारी एका वाजण्याच्या सुमारास सुरू झाली. आमदार अमोल खताळ आणि नीलम खताळ तसेच मल्हार मार्तंड देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मंगेश घोणे, विश्वस्त पांडुरंग थोरवे, विश्वास पानसे, गणेश आगलावे यांच्या हस्ते महाआरती पार पडली. यानंतर आमदार खताळ यांनी सपत्नीक मल्हारगडावर जाऊन खंडोबा महाराजांची विधिवत पूजा केली, अभिषेक केला आणि तळी भंडार केले.
मिरवणूक दुपारी तीन ते सव्वातीन वाजण्याच्या सुमारास मल्हारगडावर पोहोचली. त्यानंतर संगमनेरच्या असंख्य खंडोबा भक्तांनी भंडार खोबऱ्याची मुक्त उधळण केली आणि “येळकोट येळकोट जय मल्हार”चा जयजयकार करत मानाच्या काठीचा शिखरी सोहळा पार पडला.
या सोहळ्यास मल्हार मार्तंड होलम राजा मित्र मंडळ, सांगमनेर सार्वजनिक काटकर मंडळ आणि खंडोबा भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.



