क्राईम

अखेरचा प्रवास….जो सर्वांसाठी धावला…. संकटात मदतही हतबल ठरली….!!


अखेरचा प्रवास….जो सर्वांसाठी धावला….

संकटात मदतही हतबल ठरली….!!

…….

महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात काही चेहरे केवळ राजकारणापुरते मर्यादित राहत नाहीत; ते संकटसमयी धावून जाण्याचं “प्रतीक” बनतात. दुष्काळ, पूर, शेतकरी आंदोलन, आर्थिक ताण,राज्य अडचणीत असताना निर्णयक्षमता, वेग आणि जबाबदारी यांचा जो संगम दिसायचा, तो अनेकांना एका नेत्याच्या कार्यशैलीत जाणवला. विकास हा घोष नव्हता; तो कामातून प्रत्यक्ष जमिनीवर उतरलेला होता,पाणी, वीज, सिंचन, रस्ते, अर्थकारण आणि प्रशासनाला चालना देणाऱ्या निर्णयांतून.

 

विकासातील योगदान हे आकड्यांत मोजता येत नाही. संकटात घेतलेले निर्णय, प्रशासनाला दिलेला वेग, आणि “वेळेवर मदत” ही संस्कृती,यामुळे राज्याला अनेकदा सावरण्याची संधी मिळाली. महाराष्ट्रावर आलेल्या प्रत्येक संकटात मदतीसाठी धावून जाण्याची सवय ज्या नेतृत्वाने निर्माण केली, त्या सवयीचा फायदा राज्याने वारंवार घेतला.

आणि तरीही,जेव्हा त्या नेत्यावरच विमान अपघाताचं संकट आलं, तेव्हा हाच महाराष्ट्र त्यांना मदत करू शकला नाही. कारण मदत करायची इच्छा नव्हती म्हणून नव्हे; तर नियतीने तेवढा वेळच दिला नाही. सेकंदांची कमतरता, क्षणांची दरी आणि व्यवस्था असहाय्य ठरली.

हे केवळ एका व्यक्तीचं नुकसान नाही. हा राज्याच्या अनुभवाचा, निर्णयक्षमतेचा तोटा आहे. विकासाच्या प्रवासात ज्या हातांनी दिशा दिली, त्या हातांचा अचानक थांबलेला वेग राज्याला काही दशक मागे नेतो. राजकारण पुढे चालत राहिलं , या नेतृत्वाच्या अनुपस्थितीने शून्य तिथेच राहतो,जिथे अनुभव आणि धाडस हरतं.

मग प्रश्न उरतो—

What is destiny?

नियती म्हणजे कर्तृत्वाचा हिशोब नसतो.

नियती म्हणजे कृतज्ञतेची हमी नसते.

कधी कधी नियती म्हणजे वेळ न देणारी कठोर परीक्षा.

हा एक थांबा आहे,विचार करण्यासाठी. संकटात धावून जाणाऱ्यांसाठी, संकट आल्यावर आपण काय करू शकतो? व्यवस्था किती सज्ज आहे? आणि आपण कृतज्ञता कशी जपतो?

एक नेता गेला, पण प्रश्न राहतो.

आपण नियतीला दोष देऊन मोकळे होणार, की पुढच्या क्षणासाठी अधिक सज्ज होणार?

……

वर वर शांत तरीही काही मृत्यू शांत नसतात.

ते आरडाओरड करत नाहीत,

पण प्रश्नांचा ढीग मागे ठेवून जातात.

हा मृत्यूही तसाच आहे.

हा केवळ एका नेत्याचा अंत नाही.

हा महाराष्ट्राच्या संवेदनशीलतेचा,

तयारीचा,

आणि कृतज्ञतेच्या स्मरणशक्तीचा

खुल्या मैदानात झालेला अपघात आहे.

हा नेता कोण होता,

हे सांगण्याची गरज नाही.

कारण त्याची ओळख नावात नव्हती..

ती संकटात धावण्याच्या नित्य सवयीमध्ये होती.

दुष्काळाने राज्य भाजून काढलं,

तेव्हा तो हेलिकॉप्टरमध्ये बसून

फाईल वाचणारा नेता नव्हता.

तो जमिनीवर उतरून निर्णय घेणारा होता.

पूर आला,

तेव्हा केवळ भेटी देणारा नव्हता—

तो यंत्रणा हलवणारा होता.

शेतकरी रडत होता,

तेव्हा तो भाषण देणारा नव्हता;

तो निधी, पाणी, योजना

वेगाने सोडणारा होता.

विकास म्हणजे जाहिरात नाही,

हे त्याच्या कामातून दिसायचं.

पाणी, सिंचन, ऊर्जा, अर्थकारण,

प्रशासनाचा वेग

यात मतभेद असतील,

वाद असतील,

Advertisement

पण एक सत्य कोणी नाकारू शकत नाही

महाराष्ट्र संकटात असेल,

तर “कोणी तरी येईल”

ही भावना लोकांच्या मनात रुजली होती.

कारण कुणीतरी म्हणून हा नेता यायचाच.

वेळेवर.

निर्णयासह.

पण नियती उपरोधिक असते.

ज्या माणसाने

हजारो संकटांमध्ये वेळे सोबत शर्यत जिंकली,

त्याच्यावर संकट आलं

आणि त्या वेळी

वेळच संपून गेली.

विमान आकाशात असतं तेव्हा

ते फक्त यंत्र नसतं

ते विश्वासाचं प्रतीक असतं.

पण जेव्हा ते कोसळतं,

तेव्हा फक्त लोखंड नाही पडत

व्यवस्था, तयारी आणि अहंकार

एकत्र जमिनीवर आपटतात.

त्या क्षणी मदत हवी होती.

तातडीची.

निर्णायक.

पण महाराष्ट्र मदत करू शकला नाही.

 इच्छा नव्हती म्हणून नाही.

माणसं नव्हती म्हणून नाही.

 साधनं नव्हती म्हणून नाही.

 नियतीने वेळच दिला नाही.

आणि हा मुद्दा सर्वात भयावह आहे.

कारण आपण लगेच हात वर करतो—

“नियती होती.”

पण खरंच?

नियती म्हणजे काय?

वेळ न देणारी अज्ञात शक्ती?

की आपण वेळेची किंमत

नेहमी उशिरा ओळखतो

ही आपली सवय?

आज आपण भावनिक होतो,

श्रद्धांजली वाहतो,

डोळे पुसतो,

आणि म्हणतो—

“काय करणार?”

पण उद्या?

उद्या पुन्हा तीच व्यवस्था,

तीच ढिसाळ तयारी,

तोच ‘काहीतरी होईल’

हा घातक आत्मविश्वास.

हा मृत्यू फक्त एका नेत्याचा नाही.

हा अनुभवाचा मृत्यू आहे.

हा निर्णयक्षमतेचा मृत्यू आहे.

हा त्या राजकीय संस्कृतीचा मृत्यू आहे

जिथे संकट आलं

की एक फोन, एक आदेश

चित्र बदलायचा.

आज महाराष्ट्राचं नुकसान

आकड्यांत मोजता येणार नाही.

कारण आकडे फक्त योजना सांगतात,

अनुभव नाही.

वेग नाही.

धाडस नाही.

राजकारण पुढे चालेल.

नवी नावं येतील.

नवे चेहरे, नवी समीकरणं.

पण काही रिकाम्या जागा

कोणी भरू शकत नाही.

त्या जाणवतात—

संकटाच्या क्षणी.

मग पुन्हा तोच प्रश्न उभा राहतो—

What is destiny?

 

जर नियती इतकीच अटळ असेल,

तर आपली तयारी इतकी तोकडी

का असते?

जर वेळ इतका निर्दयी असेल,

तर आपण वेळेच्या पुढे

का धावत नाही?

आज हा लेख कठोर आहे,

कारण वास्तव तितकंच कठोर आहे.

हा लेख दोष शोधण्यासाठी नाही,

तर झोपेतून जागं करण्यासाठी आहे.

कारण पुढचं संकट

नाव, पद, पक्ष पाहत नाही.

ते अचानक येतं.

आणि तेव्हा पुन्हा

आपण नियतीकडे बोट दाखवणार का?

एका नेत्याची अखेर झाली.

पण महाराष्ट्राने आज

स्वतःलाच विचारायला हवं.

आपण कृतज्ञ आहोत की विस्मरणशील?

आपण सज्ज आहोत की नशिबावर जगणारे?

आणि खरंच—

What is destiny,

आपण रोज घडवत असलेली

आपलीच अपयशकथा?

– कुमार कडलग, नाशिक

दुनियादारी won’t lie 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *