सिन्नर शिर्डी महामार्गावर थांबलेल्या ट्रकमधून डिझेल चोरी करणारी टोळी गजाआड करण्यात पोलिसांना यश . नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची चोख कामगिरी
सिन्नर शिर्डी महामार्गावर थांबलेल्या ट्रकमधून डिझेल चोरी करणारी टोळी गजाआड करण्यात पोलिसांना यश
नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची चोख कामगिरी
सिन्नर प्रतिनिधी
सिन्नर शिर्डी महामार्ग सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. त्याच अनुषंगाने दिनांक १७ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीचे सुमारास अज्ञात आरोपींनी सिन्नर शिर्डी महामार्गावर असलेल्या शंकरनगर परिसरातील एच.पी. पेट्रोल पंपावर उभे असलेल्या १२ टायर ट्रकचे डिझेल टैंक मधून २०० लिटर डिझेल व कॅबीनमध्ये ठेवलेले ३५ हजार रूपये रक्कम रोख असे एकूण रू. ४९ हजार रूपये किमत्तीची चोरी केली होती. या बाबत सिन्नर पोलीस स्टेशन येथे गुरनं ६८५/२०२४ भा. न्या.सं. कलम ३०३(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, व अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी महामार्गावरील या चोरीची उकल उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास सुचना दिलेल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांनी वरील गुन्हयातील आरोपीची गुन्हा करण्याची पध्दत व अभिलेखावरील आरोपीची माहिती घेवून पथकास तपास करणेबाबत मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे वरील गुन्हयाचे समांतर तपासात स्थागुशाचे पोलीस अंमलदार विनोद टिळे यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार अहमदनगर जिल्हयातील डिझेल चोरी करणारे गुन्हेगार हे शिर्डी-सिन्नर रोडवर एका कारमध्ये येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यानुसार स्थागुशाचे पथकाने पाथरे फाटा परिसरात सापळा रचुन सिन्नर बाजुकडे येणारी लाल रंगाची महिंद्रा केयुव्ही १०० कार ताब्यात घेऊन, कारसोबत असलेली आणखी एक सफेद रंगाची मारूती इर्टिगा कार देखील ताब्यात घेण्यात यश मिळवले. यातील संशयीत रोहन अनिल अभंग, वय २८, रा. देवाचा मळा, संगमनेर, ता. संगमनेर, जि. अहमदनगर, वैभव बाबासाहेब सुरवडे, वय २५, रा. जामखेड, ता. जामखेड, जि. अहमदनगर, दादासाहेब दिलीप बावचे, वय २७, रा. बोधेगाव, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर यांना ताब्यात घेवुन वरील गुन्हयाबाबत चौकशी केली असता, त्यांनी त्यांचे साथीदार समाधान देविदास राठोड, रा. कोपरगाव, जि. अहमदनगर, व सचिन देविदास डाने, रा. येवला, ता. येवला, जि. नाशिक हल्ली रा. शिर्डी यांचेसोबत मिळुन सिन्नर, डुबेरेनाका व मुसळगाव एम.आय.डी.सी. परिसरात रात्रीचे सुमारास रोडच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकांचे डिझेल टँकमधुन डिझेल व रोख रक्कम चोरी केल्याची कबुली दिली आहे.
ताब्यात घेतलेले वरील आरोपी क्र. १ ते ३ यांचे कब्जातुन महिंद्रा केयुव्ही १०० कार क. एम.एच.०४ जीएन. ५७७७ व मारूती एर्टीगा कार क्र. एम.एच.०१.सी.एच. ३४८६, तसेच १० हजार ५०० रू. रोख मोबाईल फोन तसेच बनावट नंबर प्लेट असा एकुण १२,५८,५०० रू. किं.चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर आरोपींना गुन्हयाचे पुढील तपासकामी सिन्नर पोलीस ठाणेस हजर करण्यात आले असून त्यांचे इतर साथीदारांचा पोलीस पथक शोध घेत आहेत. सदर आरोपींकडुन डिझेल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, सपोनि संदेश पवार, सपोउनि नवनाथ सानप, पोना विनोद टिळे, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांचे पथकाने सदरची कामगिरी केली आहे.