गृह विभागाने प्राधिकरण आणि लाभार्थ्यांना दिली प्रकाश पर्वाची भेट; विभागीय पोलिस तक्रार प्राधिकरणाचा सुनील कडासने यांनी स्वीकारला पदभार
- गृह विभागाने प्राधिकरण आणि लाभार्थ्यांना दिली प्रकाश पर्वाची भेट;
विभागीय पोलिस तक्रार प्राधिकरणाचा सुनील कडासने यांनी स्वीकारला पदभार
नाशिक । प्रतिनिधी
विभागीय पोलिस तक्रार प्राधिकरण नाशिक विभागाच्या सदस्यपदी सेवानिवृत्त पोलिस अधिकारी सुनील कडासने यांची नियुक्ती शासनाच्या गृह विभागाकडून करण्यात आली आहे. त्यांना याबाबतचे नियुक्ती आदेश प्राप्त झाले होते. कडासने यांनी नुकताच समितीच्या सदस्यपदाचा पदभार स्वीकारला. नाशिक पोलिस आयुक्तालय व ग्रामीण पोलिस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण या प्राधिकरणामार्फत होणार आहे.नगर, मालेगाव, निफाड, मनमाड, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिक परिक्षेत्राचे अधीक्षक, नंतर बुलडाण्याच्या पोलिस अधीक्षकपदी राहिलेल्या व निवृत्त झालेल्या कडासने यांची सेवा व अनुभव लक्षात घेण्यात आला. प्राधिकरणात सदस्य हा पोलिस अधीक्षकाच्या दर्जापेक्षा कमी नसावा व नियत वयोमानाने निवृत्त असावा, अशी अट असल्याने कडासने यांची शासनाने या पदावर नियुक्ती केली आहे.
सुनिल कडासने यांची पोलिस दलातील ३५ वर्षाहून अधिक काळ झालेली सेवा, या काळात त्यांनी पदाला दिलेला न्याय, त्यांची कर्तव्य निष्ठा लक्षात घेता ते या जबाबदारीलाही योग्य न्याय देतील. आणि ही बाब लक्षात घेऊनच गृह विभागाने त्यांच्या खांद्यावर ही जबाबदारी टाकली असे म्हणण्यास पुरेसा वाव आहे. अलीकडच्या काळात प्राधिकरणावर झालेल्या नियुक्तीच्या तुलनेत कडासने यांची नियुक्ती सार्थच आहे. एकूणच सुनिल कडासने यांना ही जबाबदारी देऊन प्राधिकरण आणि प्राधिकरणाच्या लाभार्थ्यांना गृह विभागाने दीपावली प्रकाश पर्वाची भेट दिली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.