ताज्या घडामोडी

*द्वारका सर्कल अंडरपास कामासाठी वाहतूक मार्गात मोठा बदल* *अवजड वाहने व बसेसना ३ महिने प्रवेश बंद; पर्यायी मार्ग जाहीर*


*द्वारका सर्कल अंडरपास कामासाठी वाहतूक मार्गात मोठा बदल*

*अवजड वाहने व बसेसना ३ महिने प्रवेश बंद; पर्यायी मार्ग जाहीर*

नाशिक | प्रतिनिधी

आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील वाहतुकीचा महत्त्वाचा केंद्रबिंदू असलेल्या द्वारका सर्कल येथे अंडरपासचे बांधकाम सुरू करण्यात येणार असून, या कामामुळे शहरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहावी यासाठी सर्व अवजड वाहने, खाजगी प्रवासी बसेस, एस.टी. बसेस व सिटीलिंक बसेसना द्वारका चौकात प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही अधिसूचना ३० जानेवारी २०२६ ते २९ एप्रिल २०२६ या कालावधीत प्रायोगिक तत्वावर तीन महिन्यांसाठी लागू राहणार आहे.

द्वारका सर्कल येथे चार प्रमुख व सात उपरस्ते एकत्र येत असल्याने अंडरपासच्या कामकाजादरम्यान वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सामान्य नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सर्व संबंधित वाहनांसाठी पर्यायी वाहतूक मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.

 

*अवजड वाहनांना प्रवेश बंद*

द्वारका चौक परिसरात येण्या-जाण्यास सर्व अवजड वाहने, खाजगी प्रवासी बसेस, एस.टी. बसेस व सिटीलिंक बसेस यांना पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे.

*अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग*

नाशिककडून मुंबईकडे जाणारी अवजड वाहने फक्त रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत सिन्नर फाटा–रविशंकर मार्ग–वडाळागाव–पाथर्डी फाटा–गरवारे पॉईंट मार्गे एनएच-३ वरून मुंबईकडे वळविण्यात येणार आहेत.

Advertisement

सिन्नरकडे जाणारी वाहने याच मार्गाचा उलट क्रमाने वापर करतील.

*एस.टी. बसेससाठी स्वतंत्र मार्ग*

नाशिकरोड–मुंबई, सिन्नर–पुणे तसेच पुणे–नाशिक–त्र्यंबकेश्वर या मार्गांवरील एस.टी. बसेससाठी स्वतंत्र पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले असून ठक्कर बाजार, महामार्ग बस स्थानक व निमाणी बस स्थानक या ठिकाणांहून बसेस नियोजित मार्गाने धावणार आहेत.

*सिटीलिंक बसेस तपोवनातून*

निमाणी बस स्थानकातून सुटणाऱ्या सर्व सिटीलिंक बसेस आता तपोवन सिटीलिंक बस टर्मिनल्स येथून सुटतील. शालिमार–नाशिकरोड व नाशिकरोड–शालिमार या मार्गांवरही बदल करण्यात आला आहे.

*हलक्या वाहनांच्या मार्गतही बदल*

पुणे–मुंबई, पुणे–त्र्यंबकेश्वर, मुंबईनाका–नाशिकरोड आणि नाशिकरोड–पंचवटी या मार्गांवरील हलक्या वाहनांसाठी स्वतंत्र पर्यायी मार्ग जाहीर करण्यात आले आहेत.

*हाइट बॅरिअर पॉइंट निश्चित*

काठे गल्ली, वडाळा नाका, सारडा सर्कल, फेम सिग्नल, ट्रॅक्टर हाउस तसेच मुंबई व धुळे बाजूकडील डाउन रॅम्प येथे हाइट बॅरिअर पॉइंट कार्यरत राहणार आहेत.

ही अधिसूचना सहा. पोलिस आयुक्त संदीप मिटके यांनी मोटार वाहन कायदा १९८८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून जारी केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील कलम ११९/१७७, १२२/१७७, २०७ तसेच अन्य लागू कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

नाशिककर नागरिकांनी व वाहनचालकांनी या वाहतूक बदलांची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस आयुक्तालयातर्फे करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *