कामगार जाणिवेतून साकार झालेला कविता संग्रह “”घामाचे संदर्भ ” यास साहित्याचा पद्मश्री नारायण सुर्वे पुरस्कार जाहीर
कामगार जाणिवेतून साकार झालेला कविता संग्रह “”घामाचे संदर्भ ” यास साहित्याचा पद्मश्री नारायण सुर्वे पुरस्कार जाहीर
सिन्नरच्या गौरवात भर
मानकरी कवी किरण भावसार यांचे सर्व स्तरातून कौतुक
सिन्नर:
येथील साहित्यिक किरण भावसार यांच्या घामाचे संदर्भ या कविता संग्रहाचा पुणे येथील पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने देण्यात येणारा ‘पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. अकादमीचे कार्यकारी अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी पाठविलेल्या पत्राद्वारे ही माहिती दिली आहे. पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी हे पुरस्कार देण्यात येतात. राज्यभरातून आलेल्या ६७ कविता संग्रहांतून तीन कविता संग्रहांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, गौरव ग्रंथ, शाल आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे
घामाचे संदर्भ हा संपूर्णपणे कामगार जाणीवांच्या कविता असलेला संग्रह असून त्याला नारायण सुर्वे यांच्या नावाचा पुरस्कार लाभल्याने मराठी साहित्य जगतात वाचक त्याची आवर्जून दखल घेतील अशी भावना भावसार यांनी पुरस्काराबद्दल बोलताना व्यक्त केली.
किरण भावसार यांचे आजवर तीन कवितासंग्रह, तीन बालकविता संग्रह, एक किशोर कादंबरी आणि एक चरीत्र ग्रंथ अशी आठ पुस्तके प्रकाशित झाली असून राज्यभरातील अनेक नामवंत राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना लाभले आहेत. इयत्ता दुसरी व पाचवीच्या अभ्यासक्रमातील खेळू करू शिकू या बालभारतीच्या पुस्तकात त्यांच्या तीन कवितांचा समावेश आहे.