क्राईम

खड्डे: – नाशिकच्या कपाळी “कर्म करंट्या कर्तृत्वाची” जखम


खड्डे: – नाशिकच्या कपाळी “कर्म करंट्या कर्तृत्वाची” जखम

नाशिककरांना खड्ड्यांची सवय झाली आहे, असं महापालिकेला वाटतं का? दर पावसाळ्यात शहराचे रस्ते उद्ध्वस्त होतात, जीवघेणे खड्डे तयार होतात, आणि मग सुरू होतो “दुरुस्ती”चा नाट्यप्रयोग. पॅचवर्कच्या नावाखाली लाखो रुपयांची उधळपट्टी, निकृष्ट दर्जाच्या कामांवर शिक्कामोर्तब, आणि काही दिवसांनी पुन्हा तीच कहाणी!

छावा क्रांतिवीर सेनेने महापालिकेत डांबर-सिमेंट घेऊन केलेला प्रतीकात्मक निषेध हा फक्त नाट्यप्रयोग नाही; तो नाशिककरांच्या असह्यतेचा आवाज आहे. सात दिवसांत खड्डे बुजवण्याचा अल्टिमेटम म्हणजे प्रशासनाच्या टेबलवर ठेवलेली “शेवटची नोटीस” आहे.

अपघातात गेलेले जीव, मोडलेली हाडं, रुग्णवाहिकेत थांबलेले रुग्ण, ट्रॅफिकमध्ये अडकलेली अम्ब्युलन्स, हे केवळ आकडे नाहीत, तर रोजच्या जीवनात भोगावे लागणारे दुःख आहेत. हे सर्व प्रशासनाच्या निष्क्रियतेची, जबाबदारी टाळण्याच्या सवयीची, आणि भ्रष्ट कारभाराची साक्ष देतात.

Advertisement

रस्ते बांधणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई होत नाही, निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यावर नियंत्रण नाही, आणि “संपलेलं काम” दाखवणाऱ्या फाइल्सवर सही करणं सुरूच आहे. जनतेचे कराचे पैसे हे अशा भ्रष्ट चक्रात गिळले जात आहेत.

नाशिकचे रस्ते हे नाशिकची प्रतिष्ठा आहेत. शहराचा विकास हा फक्त इमारती, दिवे आणि शोभेपुरता नसतो, तो रस्त्यांवर चालणाऱ्या प्रत्येक पावलात असतो. हे पाऊल जर रोज खड्ड्यांत अडकत असेल, तर आपण शहर नाही तर संकटाचे जाळे विणत आहोत.

🔴”खड्डे बुजवणं हा उपकार नाही, तो नाशिककरांचा हक्क आहे.  रस्ते सपाट करा, नाहीतर रस्तेच तुम्हाला सपाट करतील..

🔴 “खड्डे बुजवायला प्रभू रामचंद्रांनीच यावं का?  पुढच्या वेळी करू निमंत्रित 

-कुमार कडलग

दुनियादारी won’t lie

पुढील संपादकीय :हे प्रभू रामचंद्र!नाशिकला या आणि खड्डे बुजवा..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *