बंद असलेले आधारकेंद्र पूर्ववत सुरू करा: सामाजिक कार्यकर्ते डॉ.झळके यांची मागणी
बंद असलेले आधारकेंद्र पूर्ववत सुरू करा:
सामाजिक कार्यकर्ते डॉ.झळके यांची मागणी
सिन्नर (प्रतिनिधी)
सिन्नर शहरात आधारकार्ड केंद्रांची संख्या वाढवावी तसेच बंद असलेले आधार केंद्र पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी,सामाजिक कार्यकर्ते डॉ.श्यामसुंदर झळके यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.सिन्नर येथील तहसील कार्यालयात, निवासी नायब तहसीलदार सागर मुंदडा यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनाचा आशय असा, शासकीय,निमशासकीय तसेच विविध क्षेत्रात आधार कार्ड अनिवार्य केले आहे. आधार अद्ययावत (अपडेट) करण्यासाठी सध्या खासगी सायबर कॅफे मध्ये झुंबड उडाली आहे. सिन्नर मध्ये शासनाने पंचायत समिती कार्यालयात आधारकार्ड केंद्र सुरू केले होते.परंतु काही अपरिहार्य व तांत्रिक बिघाड असल्याचे कारण पुढे करून हे केंद्र दोन तीन महिन्यांपासून बंद आहे.त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयात कामासाठी,आधारकार्ड सादर करावे लागते.त्यात दुरुस्ती अथवा फेरबदल करण्यासाठी आधार केंद्रात जावे लागते.परंतु शासकीय आधार केंद्र बंद असल्यामुळे लोकांना नवीन कार्ड अथवा अपडेट करण्यासाठी खासगी सायबर कॅफे मध्ये जाऊन मागेल ती रक्कम देऊन काम करून घ्यावे लागते.सिन्नर मध्ये एकमेव बँक ऑफ बडोदा मध्ये आधार केंद्र सुरू आहे,पण तिथे गर्दी होऊन लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसते.त्यामुळे ताटकळत बसण्यापेक्षा जादा पैसे देऊन आधार कार्ड अपडेट करावे लागते.त्याशिवाय शासकीय योजनेचा शेतकरी व इतरांना लाभ घेता येत नाही.आधार अपडेट करण्यासाठी जन्मतारखेचा पुरावा म्हणून जन्माचा दाखला सादर करण्याचा नवीन नियम केल्यामुळे अनेकांची पंचायत झाली आहे, व त्यामुळे कोणत्याच शासकीय सवलतींचा त्यांना लाभ मिळत नाही.पन्नास साठ वर्षांपूर्वी ग्रामपंचायत,नगरपालिका अथवा शासकीय रुग्णालय मध्ये जन्माचा दाखला मिळत नव्हता,कारण तशी जन्म,मृत्यूची नोंद करण्याची सक्ती नव्हती,त्यामुळे जन्माच्या दाखल्याअभावी हजारो नागरिक शासकीय सवलतींपासून वंचित आहेत.पूर्वी शाळा सोडण्याचा दाखला ग्राह्य धरला जात होता, परंतु आता तो ग्राह्य धरला जात नसल्याने अनेकांची पंचायत झाली आहे. आधार अपडेट करण्यासाठी त्याचा गैरवापर केला जात असल्याच्या तक्रारी शासनाला प्राप्त झाल्यामुळे कदाचित जन्म दाखला सादर करण्याची अट घालण्यात आली.पण सरसकट सर्वांना वेठीस धरून,त्यांना लाभा पासून वंचित ठेवणे, अन्यायकारक असल्याचे मत डॉ.श्यामसुंदर झळके यांनी व्यक्त केले असून पूर्वीप्रमाणेच शहानिशा करून शाळा सोडल्याचा दाखला ग्राह्य धरून हजारो लोकांची झालेली गैरसोय दूर करावी तसेच आधार अपडेटसाठी गैरमार्गाचा वापर करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी आग्रही मागणी झळके यांनी निवेदनात केली आहे.त्याची प्रत जिल्हाधिकाऱ्यांनाही देण्यात आली आहे.