अपहृत बालिका सुखरूप पालकांच्या ताब्यात, एलसीबी सह वावी पोलिसांच्या तपासाला यश
अपहृत बालिका सुखरूप पालकांच्या ताब्यात, एलसीबीसह वावी पोलिसांच्या तपासाला यश
सिन्नर प्रतिनिधी
सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रक्षाबंधनाच्या दिवशी सोमवारी (दि. 20) मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली. सायंकाळी चार वाजेच्या सुमारास एका पंचवीस वर्षीय तरुणाने ओळखीतल्या चार वर्षांच्या बालिकेला खाऊ घेऊन देण्याचे आमिष दाखवत तिचे अपहरण केले. या बालिकेसह संशयीताचा संपूर्ण रात्रभर पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. मंगळवारी सकाळी अपहरण झालेल्या बालिकेसह तो पोलिसांना मिळून आला. त्याने सदर बालिकेसोबत गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले. पोस्को अंतर्गत त्याचे विरुद्ध वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरासमोरच्या अंगणात इतर बालकांसमवेत खेळणाऱ्या चार वर्षांच्या बालिकेस, तिच्या परिचित असलेल्या प्रकाश उर्फ टील्लु एकनाथ अहीरे रा. म्हरळ ता. सिन्नर याने अपहरण केले होते. सायंकाळी उशिरापर्यंत ही बालिका घराजवळच कुठेतरी खेळत असेल, म्हणून तिच्या कुटुंबियांचे दुर्लक्ष झाले होते. मात्र अंधार पडल्यानंतर ती घरी न आल्याने, तिचा शोध सुरू झाला.बालिकेच्या नातेवाईकांकडून व गावातील इतर ग्रामस्थांकडून या दोघांचाही शोध सुरू होता. संशयित तरुणाचा मोबाईल फोन बंद असल्याने व तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्यामुळे, त्याच्यावरचा संशय अधिक बळावला होता.
रात्री आठ वाजेच्या सुमारास बालिकेच्या नातेवाईकांनी ग्रामस्थांसमवेत वावी पोलीस ठाण्यात येत,घडला प्रकार सांगितला. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ निफाडचे पोलीस उपअधीक्षक डॉ. निलेश पालवे यांना कळवले. पोलिसांनी लागलीच अपहरणाचा गुन्हा दाखल करून घेतला. वावी पोलीस ठाणे, सिन्नर, एमआयडीसी व सायखेडा पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा यांची स्वतंत्र पथके बालिका व संशयित अपहरणकर्त्याच्या शोधासाठी तैनात करण्यात आली. शेजारच्या संगमनेर, राहता, लोणी, कोपरगाव, अकोले या पोलीस ठाण्यांना देखील अपहरण प्रकाराबद्दल सहाय्यक निरीक्षक संदेश पवार यांनी सुचित केले होते. वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्र पथकांमार्फत रात्रभर पोलिसांकडून सर्वत्र बालिकेचा शोध सुरू होता. पोलिसांनी समृद्धी महामार्गावरील गोंदे व शिर्डी येथील इंटरचेंज वरील कॅमेरे देखील तपासले. वावी, संगमनेर, शिंदे येथील टोलनाक्यांवर देखील तपासणीच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पहाटेच्या सहा वाजेपर्यंत पथके तपासात व्यस्त होती. मात्र बहुतेक ठिकाणी सुरू असलेला पाऊस, साचलेला गाळ यामुळे तपासाला मर्यादा येत होत्या. मंगळवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास म्हरळ गावातील निर्जन ठिकाणी असलेल्या नदी किनारच्या एका मंदिरा समोरच्या बंधाऱ्याजवळ हातपाय धुवत असताना प्रकाश आढळून आला. त्याला गावात थांबून असलेल्या पोलीस पथकाने स्थानिक तरुणांच्या मदतीने ताब्यात घेतले. त्याच मंदिरात अपहरण केलेली बालिका देखील सुखरूपरीत्या आढळून आली. तिला तात्काळ वैद्यकीय उपचार व तपासणीसाठी पोलिसांनी दोडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकाशला वावी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. जास्त प्रमाणात मद्यपान केले असल्याने, तो उलट सुलट बोलत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या घरापासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावर असलेल्या मंदिराच्या परिसरात तो रात्रभर दडून बसला होता. बालिकेच्या वैद्यकीय तपासणी अहवालानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोस्को) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अपहरण झालेल्या बालिकेस तिच्या आई व वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. ज्या बालिकेचे सोमवारी अपहरण करण्यात आले होते. तिच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. मोल मजुरी करूनच हे कुटुंब आपल्या मुलांचा सांभाळ करत आहे. अपहरणाची घटना घडल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली हेमंत गिलबिले, विनोद टीळे, प्रदीप बहिरम हे देखील तपास मोहिमेत सहभागी झाले होते. या बालिकेच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती बघता तिचे दहावीपर्यंत शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्याची इच्छा टिळे यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांना विनंती करून त्यांची परवानगी घेणार असल्याचे, त्यांनी सांगितले. तीन दिवसांपूर्वीच संशयित प्रकाशने,त्याचा मोबाईल फोन दारू प्यायला पैसे नव्हते,म्हणून कुठेतरी विकला होता. त्यामुळे गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर लक्ष केंद्रित करूनही मोबाईल फोन जवळ नसल्याने तो सापडत नव्हता. प्रकाश विरूद्ध यापूर्वी एका वाहन चोरीच्या प्रकारात गुन्हा देखील दाखल आहे. नात्यातली व ओळखणारी असल्याने त्याने खाऊचे आमिष दाखवून त्याने बालिकेचे अपहरण केले व तिच्यासोबत गैरकृत्य करण्याच्या प्रयत्न केला.