ताज्या घडामोडी

वैफल्यातून भुजबळांचे बैताल वक्तव्य :करण गायकर ; मराठे मोजण्याऐवजी आपली उंची व पात्रता मोजावी


वैफल्यातून भुजबळांचे बैताल वक्तव्य :करण गायकर ;

 

मराठे मोजण्याऐवजी आपली उंची व पात्रता मोजावी

 

नाशिक प्रतिनिधी 

मराठा समाजाने ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मागण्यास सुरुवात केल्यानंतर, त्यातही मनोज जरांगे यांनी एक एक मराठा गोळा करून त्याच मागणीसाठी रान पेटवल्यानंतर ओबीसी समाजाचे नेते म्हणविणारे नेते अस्वस्थ झाले असून या मराठा कुणबी, कुणबी मराठा ऐक्य चळवळीच्या विरोधात नेत्यांची मोट बांधणारे छगन भुजबळ हे सकल मराठा समाजाच्या निशाण्यावर आहेत. छगन भुजबळ यांची राजकीय कर्मभूमी नाशिक असल्याने स्वतः जरांगे यांनी देखील नाशिकवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

भुजबळ यांचे राजकीय पुनर्वसन केलेल्या येवला विधानसभा मतदार संघावर मनोज जरांगे यांच्यासह सकल मराठा चळवळ खास नजर ठेवून आहे.

छगन भुजबळ यांना, त्यांनी मराठा समाज विशेष करून जरांगे यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या संघर्षावर केलेल्या प्रत्येक भाष्याला मराठा समाजातील समन्वयक सडेतोड उत्तर देत आहेत. नाशिकच्या शांतता रॅलीसाठी उपस्थित असलेल्या संख्येवर भुजबळ यांनी केलेले वक्तव्यावर देखील घणाघाती टीका होत आहे.

छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष तसेच मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर यांनीही भुजबळ यांच्या “त्या”वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे.

  आपली दुनियादारीकडे सकल मराठा समाजाच्या भावना व्यक्त करताना करण गायकर म्हणाले की,

“मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नाशिक मध्ये शांतता समारोप रॅली संपन्न झाली. या रॅलीमध्ये लाखो समाज बांधव स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. कुठल्याही समाज बांधवांना,गाडी, पैसे किंवा येण्या जाण्याची व्यवस्था केलेली नसताना,फक्त मराठा समाजाला हक्काचे 50% च्या आत ओबीसीतून आरक्षण मिळावे,त्याचबरोबर सगेसोयरे हा कायदा,पारित होऊन सरकारने,त्यावर तात्काळ निर्णय घ्यावा, यासाठी नाशिक जिल्ह्यातील लाखो समाज बांधव रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

Advertisement

शांतता समारोप रॅली अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने शहरातून निघाली. सर्व शहरवासीयांनी सुद्धा या रॅलीचे कौतुक केले. एवढा मोठा समाज एकत्र आला असताना सुद्धा,कुठेही गालबोट लागले नाही. कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडली नाही. किंवा पोलीस प्रशासनाला कुठल्याही सूचना किंवा अतिरिक्त बंदोबस्त लावायची वेळ आली नाही. इतक्या शांतप्रिय निघालेल्या रॅलीवर छगन भुजबळ सारख्या नेत्याने वक्तव्य करावे, इतकी त्यांची उंची नाही किंवा त्यांची तेवढी पात्रता सुद्धा नाही.तरीही छगन भुजबळ हे नेहमी मराठा समाजाचा द्वेष करत आलेले आहेत.मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळू नयेत, यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. आणि तोच केविलवाणा प्रयत्न, त्यांनी काल एका वक्तव्यातून केला.ते म्हणतात, शांतता समारोप रॅलीमध्ये आठ हजार फक्त समाज बांधव होते.आम्ही छगन भुजबळ यांना आव्हान करतो की, त्यांना मराठा समाजाची संख्या जर बघायची असेल तर त्यांनी तारीख,वेळ मराठा समाजाला सांगावी आणि किती मराठा समाज त्यांना बघायचा आहे तेवढा आकडा त्यांनी सांगावा.तो त्यांचा असलेला आकस बुद्धीचा मानस व द्वेष मराठा समाज शंभर टक्के पूर्ण करेल. भुजबळांनी मराठा समाजाचे हे आव्हान स्वीकारावे.

छगन भुजबळ हे विसरलेले आहेत की त्यांना आतापर्यंतच्या राजकारणात मराठा समाजाने निवडून देत मोठे केलेल आहे.परंतु तेच भुजबळ मराठा समाजावर आता अन्याय करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. येणाऱ्या निवडणुकीत भुजबळांना येवला- लासलगाव मतदार संघात पराभव दिसू लागल्याने,छगन भुजबळ असे वैफल्यग्रस्त झालेले आहेत.त्यांच्याकडून जे काही वक्तव्य होत आहे, ते पराभवाच्या भीतीने होत असून मराठा समाज त्यांना निश्चित येणाऱ्या निवडणुकीत मराठ्यांची संख्या किती आहे मतदानातून दाखवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही.भुजबळांनी संविधानिक पद स्वतःकडे असताना, दुसऱ्या समाजाचा इतका द्वेष करणे, त्यांच्यासारख्या नेत्याला शोभत नाही.मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करण्यापेक्षा, आपण ओबीसी समाजाला किती न्याय देऊ शकलो, याचे आत्मपरीक्षण केले तर, भुजबळांना त्यांचे उत्तर मिळून जाईल.एक विशिष्ट समाज म्हणजे ओबीसी नाही तर शेकडो जाती ओबीसीत असताना किती जातींचे पुनर्वसन भुजबळ करू शकले,किती ओबीसी समाज बांधवांना स्वतःच्या पायावर उभे करून त्यांचे जीवनमान सुधारू शकले, याचे उत्तर भुजबळांनी ओबीसी समाजाला दिले तर त्यांच्यासाठी ते फायद्याचे ठरेल. मराठा समाजाला विरोध करण्यापेक्षा भुजबळांनी स्वतःच राजकीय अस्तित्व सांभाळावं एवढीच माफक अपेक्षा त्यांच्याकडून आहे.पुन्हा जर छगन भुजबळांनी मराठा समाजाबाबत जर चुकीचे वक्तव्य केले तर मराठा समाज सुद्धा यापुढे त्यांना जशास तसे उत्तर देईल. याची त्यांनी खबरदारी घ्यावी.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *