जैन स्टार ग्रुपचा फॅशन शो उत्साहात
जैन स्टार ग्रुपचा फॅशन शो उत्साहात
नाशिक : प्रतिनिधी
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या जैन स्टार ग्रुप नाशिकच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ट्रेडीशनल पेंशन शो धनदाई लॉन्स येथे उत्साहात संपन्न झाला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आशा कटारिया व हेमा लुंकड प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.यावेळी बोलताना सौ. आशा कटारिया म्हणाल्या, की आजच्या महिलांनी पेंशन शोसारख्या स्पर्धामध्ये नक्कीच सहभाग घेतला पाहिजे. या शोच्या माध्यमातून महिलांनी आत्मविश्वास, आत्मसन्मान व करिअर या गोष्टी आणायला हव्यात, पूर्वीच्या पिढीला घुंगटपासून ड्रेसपर्यंत यायला ४० ते ५० वर्षे लागली. हे ड्रेसही महिलांना निवडक ठिकाणीच वापरता येत होते; मात्र आताच्या पिढीला या सर्व गोष्टी सहज उपलब्ध आहेत. मॉडलिंग, शैक्षणिक व इतर क्षेत्रांत महिलांनी पुढे जाताना गुणवत्ता राखणे तेवढेच महत्त्वाचे आहे. आपल्या आजीने, आईने ज्या पद्धतीने आपल्याला वाढविले, संस्कार दिले, ते आपण पुढच्या पिढीला दिले, तर पुढची पिढी सुसंस्कृत घडेल. आपला परिवार पती व मुले इतक्यावरच मर्यादित न ठेवता महिलांनी नातेवाईक, वडीलधारे व मित्र-मैत्रिणींचाही आदर केला, तर घरांची होणारी घरघर थांबून ते घर एक सुंदर मंदिर बनण्यात मोठा हातभार लागेल. संस्कार, विकास व करिअर या गोष्टींची सांगड घातल्यास एक सुदृढ समाज निर्माण होण्यास मदत होईल.हेमा लुंकड म्हणाल्या, की महिलांचे सशक्तीकरण करण्यासाठी जैन स्टार ग्रुपने घेतलेला आजचा उपक्रम कौतुकास्पद असून, अशा शोच्या माध्यमातून जैन महिलांना मोठे व्यासपीठ मिळण्यात मदत होऊ शकेल. महिलांना समाजात मोठे स्थान आहे. आज विविध क्षेत्रांत पुरुष मोठ्या पदांवर कार्य करीत असतात; मात्र त्यांना एका महिलेनेच जन्म दिलेला असतो.
असा झाला फॅशन शो
या स्पर्धेत एकूण ३० महिलांनी भाग घेतला होता. पहिल्या फेरीत सर्व महिलांनी विविध वेशभूषांमध्ये रॅम्प वॉक केले. त्यातून दहा जणींना अंतिम फेरीसाठी निवडण्यात आले. अंतिम फेरीत आदिनाथ सारीज्ने दिलेल्या डिझायनर्स साडी परिधान करून प्रश्नोतरे विचारण्यात आली. त्यातून तीन जणींना निवडण्यात आले. यासोबत बेस्ट स्माईल, बेस्ट रॅम्पवॉक व बेस्ट ड्रेस अशी तीन पारितोषिके देण्यात आली.
महिलांचे समाजातील स्थान जाणून घेणे हे तितकेच महत्त्वाचे ठरते, जैन स्टार ग्रुपने आयोजित केलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. या स्पर्धेत एकूण ३० महिलांनी सहभाग नोंदविला. त्यामध्ये स्नेहा धाडीवाल, नेहा समदडिया व तेजल बागमार यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक पटकावले. मिस ग्लोबल इंटरनॅशनल एशिया भैरवी युरड मेहता व ललिता पाटोळ यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धेसाठी अॅव्हेन्यू बिल्डर्स, पारख अप्लायन्सेस, पारस ट्रेडर्स, आदिनाथ सारीज, अॅवॉन ब्युटी प्रोडक्ट्स, एम. के. आर्ट ज्वेलरी, पोमल आर्ट ज्वेलरी यांनी प्रायोजकत्व स्वीकारले. सूत्रसंचालन दीपाली जैन यांनी, तर आभार वैशाली कोचर यांनी मानले. फॅशन शोच्या यशस्वितेसाठी मीना भटेवरा, वैशाली कोचर, नम्रता भंडारी, अॅड. कामिनी भटेवरा, मधुरा लुणावत यांनी परिश्रम घेतले.