ताज्या घडामोडीसामाजिक

रामकथा म्हणजे संस्कारांची शिदोरी ; बंधुप्रेमातूनच देशाची अखंडता अबाधित राहील : रामराव ढोक महाराज  { रामायणाचार्यांच्या रसाळ वाणीतून जीवनमूल्यांवर अमृतवर्षाव }


रामकथा म्हणजे संस्कारांची शिदोरी ; बंधुप्रेमातूनच देशाची अखंडता अबाधित राहील : रामराव ढोक महाराज

 { रामायणाचार्यांच्या रसाळ वाणीतून जीवनमूल्यांवर अमृतवर्षाव }

 

संगमनेर (प्रतिनिधी)

अखंड भारतवर्षात रामायण माहीत नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही. रामकथा ही केवळ ऐतिहासिक घटना नसून प्रत्येक कुटुंबाच्या जीवनाचा आरसा आहे. जीवनात पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर रामायणात दडलेले आहे. देशाची अखंडता टिकवायची असेल तर प्रथम घरात, कुटुंबात, गावात, तालुक्यात आणि समाजात एकी निर्माण झाली पाहिजे असे मौलिक प्रतिपादन रामायणाचार्य ह.भ.प. रामराव ढोक महाराज यांनी केले.

अधिक मासानिमित्त

प.पू. स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहात सुरू असलेल्या आठव्या पर्वातील राम कथेतील पहिल्या कथेच्या भागाचे निरूपण करताना ढोक महाराज यांनी रामायणातील जीवनमूल्यांचा उलगडा केला.

 

गोवर्धन पर्वत उचलताना श्रीकृष्णाला जशी प्रत्येक गोप सवंगड्याच्या काठीची साथ लाभली, त्याचप्रमाणे सप्ताह सोहळ्याच्या यशात योगदान देणारा प्रत्येक भाविक हा गोपाळच आहे, असे सांगत भाविकांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.

रामायणातील बंधुप्रेमाचा आदर्श उपस्थितांसमोर ठेवताना त्यांनी सांगितले की, आज समाजाला सर्वाधिक गरज आहे ती भावा भावांमधील प्रेमाची. ज्या घरात भावांमध्ये प्रेम, आपुलकी आणि एकोप्याचे वातावरण असते, त्या घरातील आई वडिलांना कोणत्याही औषधाची गरज भासत नाही. त्यांच्या विचारांनी उपस्थितांच्या मनाला स्पर्श केला.

Advertisement

 

 

रामचरितमानसाचे महत्त्व विशद करताना त्यांनी सांगितले की, गोस्वामी तुळशीदासांनी लिहिले म्हणून ते तुलसीरामायण झाले आणि रामाचे चरित्र असल्याने ते रामचरितमानस बनले. मानसरोवरात एकदा डुबकी मारल्यानंतर त्याचा आनंद जसा मनात साठवून ठेवला जातो, तसेच सप्ताहातील संतवाणीमधून भक्ती, संस्कार आणि जीवनमूल्ये आत्मसात केली पाहिजेत.

यावेळी त्यांनी शिव पार्वती विवाहाची कथा रसाळ शैलीत उलगडली. पद वाईट नसते, पण पदाचा अहंकार वाईट असतो असे सांगत दक्ष प्रजापतीच्या कथेद्वारे त्यांनी आजच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. त्याग, समर्पण, कौटुंबिक नाती आणि कुटुंबव्यवस्थेतील स्त्रीचे महत्त्व यावरही त्यांनी प्रभावी विवेचन केले.

करपात्रे महाराज आणि डोंगरे महाराज यांच्या साधेपणाचा उल्लेख करताना संतांचे खरे वैभव त्यांच्या नम्रतेत आणि आचरणात असते असा संदेश त्यांनी दिला. तसेच पती पत्नींनी एकत्र बसून कथा श्रवण केल्यास कुटुंबातील नाती अधिक दृढ होतात असेही त्यांनी सांगितले.

कथेच्या दरम्यान वीरभद्र, कार्तिकस्वामी आणि श्रीगणेश जन्मकथांचा उल्लेख करताना शिव पार्वती विवाह प्रसंगाचे त्यांनी आपल्या अमोघ वाणीने जिवंत चित्र उभे केले.

रामकथेच्या माध्यमातून धार्मिकते बरोबरच सामाजिक ऐक्य, बंधुभाव, कुटुंब वत्सलता आणि संस्कारांचा संदेश देणारा हा सोहळा भाविकांसाठी आत्मपरीक्षणाचा प्रेरणादायी अनुभव ठरला. संगमनेर व पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी रामकथेचा रसास्वाद घेत आध्यात्मिक आनंदाची अनुभूती घेतली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *