नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांवरील अत्याचाराचा स्फोट नाशिकमध्ये ९ गुन्हे दाखल; ६ आरोपी अटकेत, पोलीस आयुक्तांच्या आदेशाने SIT स्थापन
नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांवरील अत्याचाराचा स्फोट
नाशिकमध्ये ९ गुन्हे दाखल; ६ आरोपी अटकेत, पोलीस आयुक्तांच्या आदेशाने SIT स्थापन
नाशिक | प्रतिनिधी
नाशिक शहरातील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत महिलांवर विनयभंग, लैंगिक व मानसिक अत्याचार तसेच धार्मिक भावना दुखावल्याचे गंभीर प्रकार उघडकीस आल्याने उद्योगनगरीत मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आतापर्यंत एकूण ९ गुन्हे दाखल करण्यात आले असून ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्रकरणाच्या गांभीर्यामुळे पोलीस प्रशासनाने तातडीने विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित बहुराष्ट्रीय कंपनीतील काही पुरुष कर्मचाऱ्यांकडून महिला कर्मचाऱ्यांचा सातत्याने विनयभंग, मानसिक छळ आणि लैंगिक अत्याचार होत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या. काही महिलांनी धार्मिक भावना दुखावल्याच्याही तक्रारी नोंदवल्या आहेत. पीडितांनी धाडसाने पुढे येत गुन्हे दाखल केल्यानंतर गुन्हेशाखेने तपासाची सूत्रे हाती घेतली.
या प्रकरणातील गुन्ह्यांची व्याप्ती, संवेदनशीलता आणि कंपनीचे स्वरूप लक्षात घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या अधिपत्याखाली SIT स्थापन करण्यात आली आहे. हे पथक सर्व तक्रारींचा एकत्रित तपास करून दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्व खाजगी कंपन्या आणि आस्थापनांना महिलांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कार्यस्थळी लैंगिक छळविरोधी अंतर्गत समित्या, तक्रार निवारण यंत्रणा आणि सुरक्षा प्रणाली अधिक सक्षम करण्यावर भर देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
महिलांनी अशा प्रकारच्या त्रासाविरोधात पुढे येऊन तक्रार नोंदवावी, यासाठी पोलीस प्रशासनाने CP WhatsApp क्रमांक ९९२३३२३३११ आणि नियंत्रण कक्ष ११२ हे क्रमांक जाहीर केले आहेत. तक्रारदार महिला, संस्था किंवा माहिती देणाऱ्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असे आश्वासनही देण्यात आले आहे.
| पोलिसांचे आवाहन
कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करा
लैंगिक छळ तक्रारींसाठी अंतर्गत समित्या सक्रिय ठेवा
पीडितांनी ९९२३३२३३११ किंवा ११२ वर संपर्क साधावा
तक्रारदारांची ओळख गोपनीय ठेवली जाणार



