क्राईम

दिंडोरीतील पेसा थकबाकी बिलासाठी ५२ हजारांची लाच; गट शिक्षणाधिकारीसह तिघांवर ACB ची कारवाई


  1. दिंडोरीतील पेसा थकबाकी बिलासाठी ५२ हजारांची लाच; गट शिक्षणाधिकारीसह तिघांवर ACB ची कारवाई

नाशिक | प्रतिनिधी

दिंडोरी पंचायत समितीतील पेसा विशेष कार्यक्षेत्रातील थकीत वेतन फरक बिल मंजुरीसाठी तब्बल ५२ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी गट शिक्षणाधिकारी, एक प्राथमिक शिक्षक आणि जिल्हा परिषद नाशिक येथील कनिष्ठ लेखा अधिकाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई केली आहे. या प्रकरणामुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब तुकाराम चव्हाण (गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती दिंडोरी), निलेश निंबा भारती (प्राथमिक शिक्षक, निगडोळ) आणि देविप्रसाद चैत्राम पाटील (कनिष्ठ लेखा अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक) यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या प्रकरणातील तक्रारदार आणि त्यांच्या पत्नी हे दोघेही शिक्षक असून, ते पेसा विशेष कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत. सन २००२ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीतील एकस्तर वेतनश्रेणीच्या थकीत फरक बिलासाठी त्यांनी पंचायत समिती दिंडोरीकडे प्रस्ताव सादर केला होता. तक्रारदारांची देय रक्कम ६,५७,८०८ रुपये, तर त्यांच्या पत्नीची ६,५५,६०० रुपये इतकी मंजूर करण्यात आली होती.

Advertisement

मात्र, हे बिल वरिष्ठ कार्यालय म्हणजेच जिल्हा परिषद नाशिक येथे सादर करून अंतिम प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आरोपींनी टक्केवारीनुसार लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.

तक्रारीनुसार, गट शिक्षणाधिकारी चव्हाण यांनी बिल जिल्हा परिषदेकडे सादर केल्याच्या मोबदल्यात १ टक्का रक्कम स्वीकारली, तर शिक्षक निलेश भारती यांनी सुरुवातीला ५ टक्के, नंतर मध्यस्थीनंतर ३ टक्के रक्कमेवर सौदा ठरवला. ही रक्कम स्वतःसाठी तसेच जिल्हा परिषद नाशिक येथील लेखा विभागातील अधिकाऱ्याला देण्यासाठी स्वीकारल्याचे ACB च्या तपासात समोर आले आहे.

याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, लाच स्वीकारताना एकूण ५२ हजार रुपये स्वीकारल्याचे निष्पन्न झाले आहे.

ही सापळा कारवाई पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस हवालदार विनोद चौधरी आणि पोलीस कॉन्स्टेबल अनिल गांगोडे यांनी पथकात सहभाग घेतला. या कारवाईस पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांचे मार्गदर्शन लाभले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *