अनधिकृत पत्रकावर विश्वास ठेवू नका; क्रेडाई नाशिक मेट्रोचे स्पष्टीकरण म्हाडा संदर्भात मुख्यमंत्र्यांना कोणतेही पत्र पाठविले नसल्याचा दावा; सोशल मीडियावरील संदेश दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट
अनधिकृत पत्रकावर विश्वास ठेवू नका; क्रेडाई नाशिक मेट्रोचे स्पष्टीकरण
म्हाडा संदर्भात मुख्यमंत्र्यांना कोणतेही पत्र पाठविले नसल्याचा दावा; सोशल मीडियावरील संदेश दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट
नाशिक | प्रतिनिधी
म्हाडा संदर्भातील बाबींवर क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे राज्याचे मुख्यमंत्री यांना पत्र पाठविण्यात आल्याचा एक संदेश सध्या विविध व्हॉट्सअॅप गटांवर आणि इतर अनौपचारिक माध्यमांतून प्रसारित होत असून, तो पूर्णपणे अनधिकृत आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्टीकरण क्रेडाई नाशिक मेट्रोने सोमवारी दिले.
संस्थेचे अध्यक्ष गौरव ठक्कर आणि मानद सचिव तुषार संकलेचा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री यांना अशा प्रकारचे कोणतेही पत्र पाठविण्यात आलेले नाही. त्यामुळे सोशल मीडियावर फिरत असलेल्या पत्रकावर किंवा संदेशावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
क्रेडाईच्या निदर्शनास आलेल्या माहितीनुसार, म्हाडा संदर्भातील काही मुद्द्यांवर संस्थेने शासनाला अधिकृत निवेदन दिल्याचा आभास निर्माण करणारा संदेश व्हायरल करण्यात आला. या पार्श्वभूमीवर संस्थेने तातडीने भूमिका स्पष्ट करत, संबंधित संदेशाशी आपला कसलाही संबंध नसल्याचे नमूद केले आहे.
यासोबतच प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडिया प्रतिनिधींनाही क्रेडाईने विशेष विनंती केली आहे की, अधिकृत स्त्रोतांकडून पुष्टी न झालेल्या माहितीचे प्रकाशन किंवा प्रसारण टाळावे. अप्रमाणित माहितीमुळे समाजात संभ्रम निर्माण होऊ शकतो आणि संस्थेच्या भूमिकेबाबत चुकीचा संदेश जाऊ शकतो, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
“अचूक आणि विश्वसनीय माहितीचा प्रसार होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. माध्यमांनी आजवर दिलेल्या सहकार्याबद्दल आम्ही आभारी आहोत,” असेही क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, या स्पष्टीकरणानंतर सोशल मीडियावर फिरत असलेल्या पत्रकाच्या सत्यतेबाबत चर्चा सुरू झाली असून, संस्थेच्या नावाने अनधिकृत माहिती प्रसारित करणाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे बांधकाम क्षेत्रासह नागरिकांचे लक्ष लागले आहे.



