मांजरे येथील जावली धरणाच्या निकृष्ट कामाबाबत चौकशीची मागणी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
मांजरे येथील जावली धरणाच्या निकृष्ट कामाबाबत चौकशीची मागणी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
मालेगाव (जि. नाशिक) | प्रतिनिधी
मालेगाव तालुक्यातील मांजरे गाव परिसरातील जावली (लाल माती) धरणाच्या दुरुस्ती कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप करत संबंधित कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. संघर्ष विधायक कार्य समितीचे अध्यक्ष तथा व्हाईस ऑफ मिडिया पत्रकार संघटनेचे जिल्हा संघटक गोकुळ बाबुलाल निकम यांनी जिल्हा परिषद नाशिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे यासंदर्भात लेखी तक्रार सादर केली आहे.
तक्रारीनुसार, लघु पाटबंधारे विभागांतर्गत लेखाशीर्ष २७०२/५६३४ जिल्हा योजना (सन २०२२-२३) अंतर्गत जावली धरणाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र, हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून आराखड्यानुसार न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यापूर्वी संबंधित बाब उपविभाग जलसंधारण, जिल्हा परिषद मालेगाव यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ११ डिसेंबर २०२४ रोजी पाहणी करण्यात आली होती. त्यानंतर १३ डिसेंबर २०२४ रोजी लेखी पत्राद्वारे धरणातील पाणी गळतीवर उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
तथापि, प्रत्यक्षात अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसून काम जैसे थे अवस्थेत असल्याचे तक्रारदारांनी नमूद केले आहे. याशिवाय १२ जानेवारी २०२६ रोजी पंचायत समिती मालेगावचे गट विकास अधिकारी यांच्याकडेही तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, त्या पातळीवरही कोणतीही चौकशी किंवा कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषी अधिकारी व संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच मार्च अखेरपर्यंत कारवाई न झाल्यास आमरण उपोषण किंवा आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, या गंभीर आरोपांमुळे लघु पाटबंधारे विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.



