सत्ता–सेक्स–संपत्तीचा सडका ‘सत्संग’ कॅप्टन अशोक खरात प्रकरण आणि समाजाच्या विवेकबुद्धीची कसोटी
सत्ता–सेक्स–संपत्तीचा सडका ‘सत्संग’
कॅप्टन अशोक खरात प्रकरण आणि समाजाच्या विवेकबुद्धीची कसोटी
कुमार कडलग, नाशिक
ज्योतिष सत्संगच्या आड लपलेला सत्तेचा, पैशाचा आणि लैंगिक शोषणाचा काळा खेळ अखेर उघड झाला. कॅप्टन अशोक खरात प्रकरणाने नाशिक हादरलं असलं, तरी हा केवळ एका व्यक्तीचा गुन्हा आहे की प्रभावशाली जाळ्याचा भाग, हा मोठा प्रश्न उभा राहतोय. विश्वास, अंधश्रद्धा आणि भीती यांच्या आधारावर उभं राहिलेलं हे साम्राज्य किती खोलवर रुजलंय? आणि सर्वात महत्त्वाचं या ‘सौदाबाज सत्संगा’मागचं खरं सत्य बाहेर येईल का, की पुन्हा एकदा सत्तेच्या सावलीत दडपलं जाईल?
,……..
नाशिक शहर सध्या एका धक्कादायक प्रकरणाने हादरले आहे. कॅप्टन अशोक खरात या नावाभोवती उभ्या राहिलेल्या आरोपांच्या भोवऱ्याने केवळ एका व्यक्तीची प्रतिमा धुळीस मिळवलेली नाही, तर आपल्या समाजातील अंधश्रद्धा, सत्तेचा गैरवापर आणि नैतिक अधःपतन यांचे विदारक चित्र उघड केले आहे. हे प्रकरण केवळ गुन्हेगारी चौकटीत बसवून, त्याकडे पाहणे म्हणजे त्याचा खरा अर्थ समजूनन घेण्यासारखं होईल कारण येथे प्रश्न आहे विश्वासाचा, सत्तेच्या संरचनेचा आणि समाजाच्या सामूहिक विवेकाचा.
‘कॅप्टन’ ते ‘बाबा’ : प्रतिमेचा खेळ की समाजाची फसवणूक?
‘कॅप्टन’ ही उपाधी म्हणजे शिस्त, धैर्य आणि नेतृत्वाची ओळख. अशा पदवीचा वापर करून समाजात विश्वास निर्माण करणे सोपे जाते. त्यातच ‘ज्योतिष’, ‘आध्यात्मिक मार्गदर्शन’, ‘संकट निवारण’ यासारख्या गोष्टींचा आव आणला, की सामान्य माणूस सहजपणे त्या जाळ्यात अडकतो. कॅप्टन अशोक खरात यांनी नेमकं हेच केल्याचा आरोप आज समोर येतो आहे.
लोकांच्या अडचणी, भीती, वैयक्तिक समस्या या सर्वांवर उपाय देण्याच्या नावाखाली एक ‘सत्संग’ उभा केला जातो. पण हा ‘सत्संग’ जेव्हा सत्तेचा, पैशाचा आणि कथित लैंगिक शोषणाचा माध्यम बनतो, तेव्हा तो सर्वात घातक ठरतो. कारण इथे शोषण केवळ शारीरिक नसतं; ते मानसिक, भावनिक आणि सामाजिक पातळीवर होतं.
अंधश्रद्धेचा बाजार : भीती, लोभ आणि अज्ञानाचा व्यापार
या प्रकरणाचा सर्वात भयंकर पैलू म्हणजे अंधश्रद्धेचा बाजार.आजही समाजातील मोठा वर्ग विज्ञान, तर्क आणि विवेकापेक्षा ‘गुरु’, ‘बाबा’ आणि ‘ज्योतिषी’ यांच्यावर विश्वास ठेवतो. जीवनातील अडचणींना सामोरं जाण्याऐवजी त्यावर ‘चमत्कारिक उपाय’ शोधतो.याच मानसिकतेचा फायदा घेतला जातो.
“तुमच्यावर संकट आहे”
“ग्रह वाईट आहेत”
“विशेष पूजा केल्याशिवाय सुटका नाही”
अशा वाक्यांनी भीती निर्माण केली जाते. आणि एकदा का माणूस भीतीच्या छायेत गेला, की त्याच्याकडून काहीही करून घेणं शक्य होतं. या प्रक्रियेत पैसा वाहतो, सत्ता जोडली जाते आणि शेवटी निर्माण होतं एक अदृश्य पण प्रभावी जाळं.
सत्ता आणि प्रभाव : संरक्षण की संगनमत?
या प्रकरणात एक गंभीर प्रश्न उभा राहतो.अशा व्यक्ती इतक्या वर्षांपर्यंत कशा टिकतात?उत्तर स्पष्ट आहे,सत्ता आणि प्रभाव.जेव्हा राजकीय, प्रशासकीय किंवा आर्थिकदृष्ट्या प्रभावशाली लोक अशा ‘बाबा’च्या संपर्कात असतात, तेव्हा त्यांना एक प्रकारचं संरक्षण मिळतं.त्यामुळे तक्रारी पुढे जात नाहीत.पीडितांवर दबाव येतो.आणि सत्य बाहेर येण्याआधीच दडपलं जातं
जर या प्रकरणातही अशा कोणत्याही प्रकारचा संबंध असेल, तर तो केवळ एका व्यक्तीचा गुन्हा राहत नाही; तो संरक्षित गुन्हेगारी व्यवस्थेचा भाग ठरतो.
पुरावे आणि भीतीचं राजकारण
तपासादरम्यान आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याच्या बातम्या समोर येत आहेत.जर हे खरं असेल, तर हा प्रकार आणखी गंभीर बनतो. कारण अशा व्हिडिओंचा वापर ब्लॅकमेलिंगसाठी,दबाव टाकण्यासाठी आणि सत्तेचं नियंत्रण ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो.हे फक्त वैयक्तिक पातळीवरील गुन्हे नसतात; हे मानसिक गुलामगिरीचं शस्त्र बनतात.
कायद्याची भूमिका : कसोटीचा क्षण
सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. तपास सुरू आहे.
पण खरा प्रश्न आहे,न्याय मिळणार का?
आपल्या देशात अनेक वेळा पाहिलं आहे.
मोठी प्रकरणं सुरुवातीला गाजतात
मीडिया वॉच ठेवतो.
पण काही काळानंतर सगळं शांत होतं.
पुरावे कमकुवत होतात, साक्षीदार फिरतात आणि शेवटी प्रकरण लांबणीवर पडतं.या प्रकरणातही असंच होणार का? की यावेळी खरोखरच सत्य बाहेर येईल?
समाजाची जबाबदारी : आपणच दोषी का?
हे मान्य करायला हवं,अशा घटना घडण्यासाठी समाजही तितकाच जबाबदार आहे.
आपण प्रश्न विचारत नाही
आपण ‘गुरु’ला देव मानतो
आपण विवेकबुद्धी बाजूला ठेवतो
आणि मग जेव्हा एखादं प्रकरण उघड होतं, तेव्हा आश्चर्य व्यक्त करतो.
खरं तर आपणच अशा व्यक्तींना वाढवतो, त्यांना प्रसिद्ध करतो आणि त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवतो.
यामुळेच असे ‘सत्संग’ हळूहळू सौदाबाज केंद्रे बनतात.
मीडिया आणि पत्रकारितेची भूमिका
या प्रकरणात माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
फक्त सनसनाटी मथळे देणं पुरेसं नाही; तर सत्य शोधून काढणं गरजेचं आहे.
पीडितांचा आवाज पुढे आणणं
सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणं
आणि समाजाला जागं करणं
ही खरी पत्रकारिता आहे.
जर मीडिया फक्त TRP च्या मागे धावला, तर अशा प्रकरणांमध्ये सत्य कायमच दडपलं जाईल.
समाज जागा होणार का?
कॅप्टन अशोक खरात प्रकरण हे केवळ एक गुन्हा नाही—
तो एक आरसा आहे, ज्यात आपला समाज दिसतो आहे.
आपण अजून किती काळ ‘बाबा’च्या नावाखाली फसत राहणार?
आपण विवेकबुद्धी कधी वापरणार?
आणि सर्वात महत्त्वाचं,न्यायव्यवस्था या प्रकरणात खरोखरच निष्पक्ष राहील का?
सत्ता, सेक्स आणि संपत्ती यांच्या त्रिकोणात उभा असलेला हा ‘सत्संग’ आता उघड होऊ लागला आहे. पण ही केवळ सुरुवात आहे.
खरी लढाई आहे.
अंधश्रद्धेविरुद्ध
सत्तेच्या गैरवापराविरुद्ध
आणि समाजाच्या निष्क्रियतेविरुद्ध
कारण बुवाबाजी संपवायची असेल, तर ‘बुवा’ नव्हे… तर अंधश्रद्धाच संपवावी लागेल.
दुनियादारी won’t lie



