“खाकीतली माणुसकी: उपायुक्तांच्या तत्परतेने जखमी वृद्धाला दिलासा”
“खाकीतली माणुसकी: उपायुक्तांच्या तत्परतेने
जखमी वृद्धाला दिलासा”
……
कुमार कडलग /नाशिक
परिमंडळ 2,पोलिस उपायुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरचा तो क्षण… काही सेकंदांत सगळं बदलून गेलं.
रस्त्यावरून शांतपणे निघालेल्या एका बाईकला अचानक पाठीमागून आलेल्या चारचाकी वाहनाचा जोरदार धक्का बसतो… ब्रेकचा करकचून आवाज, आणि त्यानंतर बाईक फरफटत जाण्याचा हृदय पिळवटून टाकणारा आवाज परिसरात घुमतो. काही क्षणांसाठी वेळ जणू थांबून गेल्याची जाणीव करून देणारी भावना.
याच वेळी परिमंडळ दोनचे उपायुक्त किशोर काळे प्रवेशद्वारावरील कमानीची कामाची पाहणी करत उभे असतात. आवाज कानावर पडताच ते क्षणाचाही विलंब न करता आवाजाच्या दिशेने धाव घेतात. त्यांच्या सोबत सचिन पवार आणि कार्यालयातील कर्मचारीही तत्परतेने पुढे सरसावतात.
रस्त्यावर पडलेले, घाबरलेले आणि वेदनेने व्याकुळ झालेले ६५ वर्षीय कलीम चाचा… त्या क्षणी त्यांना फक्त मदतीचा हात हवा होता. उपायुक्त काळे स्वतः त्यांच्याजवळ जातात, त्यांना शांत करतात, “काही होत नाही, आम्ही आहोत…” असा दिलासा देत कार्यालयात घेऊन येण्यास सांगतात.. त्या शब्दांत केवळ आश्वासन नव्हतं, तर एक जिव्हाळा होता… माणुसकीची ऊब होती.
त्यांना अलगद आधार देत कार्यालयात आणलं जातं. प्राथमिक उपचार करून तात्काळ पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची व्यवस्था केली जाते. प्रत्येक क्षणी ‘कर्तव्य’ आणि ‘करुणा’ यांचा सुंदर संगम दिसत होता.
अपघात कदाचित किरकोळ होता… पण त्या क्षणी उमटलेली भावना मात्र अतिशय मोठी होती.
खाकी वर्दीला दया-माया नसते, असं अनेकदा सहजपणे म्हटलं जातं… पण अशा प्रसंगांतून हीच खाकी आपलं माणूसपण किती जपते, हे पुन्हा एकदा अधोरेखित होतं. कर्तव्याच्या कठोर चौकटीतही संवेदनशीलतेचा झरा अखंड वाहत असतो, याची जाणीव करून देणारा हा प्रसंग…
कारण शेवटी, वर्दीच्या आतही एक हृदय धडधडत असतं… आणि तेही तितकंच हळवं, तितकंच माणुसकीने ओथंबलेलं.
दुनियादारी won’t lie



