धार्मिक मिरवणुकी दरम्यान दोंडाईचा शहरात दगडफेक; परिस्थिती नियंत्रणात
*धार्मिक मिरवणुकी दरम्यान दोंडाईचा शहरात दगडफेक; परिस्थिती नियंत्रणात
धुळे प्रतिनिधी
धार्मिक मिरवणुकी दरम्यान दोन गटात वाद झाल्याने दोंडाईचा येथील शिवाजी चौकात प्रचंड दगडफेक करण्यात आली. या घटनेमुळे पोलीस तातडीने ॲक्शन मोडमध्ये आल्याने परिस्थिती आटोक्यात आली आहे. दोंडाईच्या येथे शांतता असून कुणीही कायदा हातात घेतल्यास त्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिला आहे. तर जनतेने शांतता ठेवावी ,तसेच या घटनेचे कुणीही राजकारण करू नये, असे आवाहन आमदार जयकुमार रावल यांनी केले आहे.
दोंडाईचा येथे आज धार्मिक रॅली सुरू करण्यात आली होती. शहरातील वेगवेगळ्या मार्गांवरून निघालेली ही रॅली शिवाजी चौकात आली. यावेळी या ठिकाणी उभ्या असलेल्या एका गटाबरोबर काही तरुणांची बाचाबाची सुरू झाली. या बाचाबाची चे स्वरूप अचानक चिघळल्याने दगडफेक सुरू झाली. त्यामुळे परिसरात एकच धावपळ सुरू झाली. ही बाब निदर्शनास येतात बंदोबस्तास असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी जमावाला पांगवण्याचे प्रयत्न सुरू केले. तसेच घटनेची माहिती कळाल्याने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान पोलिसांनी बळाचा वापर करीत जमावाला पांगवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे .यानंतर पोलीस ठाण्यात दगडफेक करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले असून संशयितांची ओळख पटवण्याचे काम देखील सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान या संदर्भात पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे .दगडफेकीच्या घटनेनंतर दोंडाईचा शहरात आता शांतता असून परिस्थिती नियंत्रणात आहे. या संदर्भात कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये, तसा प्रयत्न केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही. कठोर स्वरूपाची कारवाई केली जाईल, असा इशारा धिवरे यांनी दिला आहे.
दरम्यान याच संदर्भात आमदार जयकुमार रावल यांनी देखील जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. दोंडाईच्या शहरातील जनता शांतताप्रिय आहे. त्यामुळे दगडफेकीच्या या घटनेचे कुणीही राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये. येणाऱ्या काळात निवडणुका आहे. त्यात राजकारण करण्याची संधी आहे. मात्र अशा प्रकारे दगडफेकीच्या घटनेचे कुणी राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये, अशा आवाहन देखील त्यांनी केले आहे.
तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप बेडसे यांनी देखील शांततेचे आवाहन करीत असताना दोंडाईचा शहरातील जनतेने समाजकंटकांच्या प्रयत्नांना थारा देऊन तणाव करण्याचे वातावरण हाणून पाडावे .शांततेचे वातावरण कायम ठेवून एकोपा निर्माण करावा. तसेच पोलीस प्रशासनाने देखील सामाजिक शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर स्वरूपाची कारवाई करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.