स्वराज्याच्या वतनाला राजकीय वतनाची जळमटे:- जयंती महोत्सव बनला राजकारणाचा अड्डा ! राजकीय बांडगुळांनी छत्रपतींना धरले वेठीस !!
स्वराज्याच्या वतनाला राजकीय वतनाची जळमटे:-
जयंती महोत्सव बनला राजकारणाचा अड्डा !
राजकीय बांडगुळांनी छत्रपतींना धरले वेठीस !!
संगमनेर शहराची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा पाहता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रत्यक्ष पदस्पर्शाने पावन झालेल्या या शहरात तीथीनुसार साजरा होणारा उत्सवही दिमाखदारपणे आणि शांततेत साजरा व्हावा अशी सामान्य संगमनेरकरांची अपेक्षा खरे तर दोन्ही बाजूच्या नेतृत्वाने पूर्ण करायला काय हरकत आहे.छत्रपतींना आराध्य मानत असाल तर किमान अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काही काळ राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवला तर काय आभाळ कोसळणार आहे. राजकारण 364 दिवस करता येईल. दोन्ही गटांनी सामंजस्यातून एक-एक पाऊल मागे येवून राजांच्या या उत्सवाला गालबोट लागणार नाही यासाठी पुढाकार घेतला तर तुम्ही आणि तुमचे राजकारण मोठे होईल. एव्हढा शहाण पणा तर दाखवा. शहाजोगपणातून छत्रपतींचा वापर तुमच्या राजकारणासाठी करू नका. छत्रपती तुमच्या राजकारणाची मालमत्ता नाही.
आपली दुनियारी विशेष /नाशिक
जय भवानी जय शिवाजी,तुमचे आमचे नाते काय ,जय शिवाजी जय शिवराय अशा घोषणांच्या निनादाने हादरलेल्या आसमंतात फडफडणाऱ्या भगव्या ध्वजाची तेजोमय हवा नसानसात भिनून अवघे वातावरण स्वराज्यमय करणारी शिवजयंती आज राजकिय बांडगुळांनी हायजॕक केल्याने गावोगाव राजकारणाच्या झेंड्याखाली रयतेचे छत्रपती ओलीस ठेवल्याचे भयानक वास्तव निर्माण झाले आहे.
एक तर अलिकडच्या काळात छत्रपतींचा पराक्रमी इतिहास नष्ट करण्यासाठी शिवकालीन स्वराज्य द्रोह्यांची पिलावळ महाराष्ट्रात वेगवेगळ्या पध्दतीने हैदोस घालीत असतांना फुले शाहू आंबेडकरांचा वारसा राजकारणासाठी वापरणाऱ्या पिलावळीलाही अचानक शिवप्रेमाचा उमाळा आल्याने खरे शिव प्रेमी, जे छत्रपतींच्या अस्मितेचा विषय येतो तेंव्हा राजकारणापलिकडे राहून छत्रपती पाहतात ,ते मात्र झाकोळले गेले आहेत.आणि इथेच जातीपातीचे आणि धर्म पंथाचे राजकारण पेटविण्यास राजकीय बांडगुळांना मोकळे रान मिळते.सध्या संगमनेरमध्ये दोन राजकीय गटांत सुरू असलेल्या सुंदोपसुंदीतून छत्रपतींबद्दल प्रेम नाही तर राजकारणाचे किळसवाणे दर्शन होत आहे.
छत्रपतींचा जन्म दिवस कुठला? त्यांची जयंती तारखेवर साजरी करायची की तिथीवर? हा मुद्दा महाराष्ट्रासाठी जेव्हढा अस्मितेचा तेव्हढाच संवेदनशील बनला आहे.काही वर्षापुर्वी या मतांतरावर इतिहास संशोधकांच्या अभ्यासपुर्ण साक्षीने तोडगा काढण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासनाने केला.आणि १९ फेब्रूवारी हीच जन्म तारीख निश्चित करून याच दिवशी छत्रपतींचा जन्म दिवसाचा महोत्सव साजरा करावा अशी अधिसुचना तत्कालीन सरकारने काढली.आणि याच दिवशी शासकीय सुट्टीही जाहीर केली.संविधानात्मक राज्य कारभार करणाऱ्या सरकारी यंत्रणेने हा निर्णय राबवण्याचे धोरण स्वीकारल्यानंतर देखील एक गट जो हिंदुत्व वादी होता तो मात्र तारखे प्रमाणे शिव जयंती साजरी करण्याचा निर्णय झुगारून तिथी प्रमाणेच शिव जयंती साजरी करण्याचा आपला हट्ट आजही पूरवीत आहे. त्यानंतर १९ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणारी शासकीय जयंती म्हणून संबोधली गेली. शासन पातळीवर ही जयंती साजरी केली जात असली तरी एक गट तिथीवर आणि या ही पलीकडे जाऊन आणखी एक मतप्रवाह शिव जयंतीचे हे दोन्हीही मुहूर्त मानायला तयार नाही.तो गट आणखी एका वेगळ्या मुहूर्तावर उत्सव साजरा करीत आहेत. इथे छत्रपतींच्या जन्म सोहळ्याचे कुणाला कुठलेच सोयेरे सुतक दिसत नाही. प्रत्येकाला आपली विचार सरणी पुढे रेटायची आहे, त्यातून छत्रपतींनी उभे केलेले स्वराज्याचे वतन उध्वस्त झाले तरी चालेल, आमची सत्तेची वतनदारी सुदृढ बनली पाहिजे, एव्हढेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून या आराध्य छत्रपतींच्या जन्म दिवसाची आणि पाठोपाठ आदर्श विचारसरणीची हेटाळणी या मंडळींनी सुरु ठेवली आहे.
साधारण ८० च्या दशकापर्यंत संगमनेर शहर हे महाराष्ट्रातील जातीय दंगलीच्या दृष्टीने संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरात अव्वल क्रमांकावर होते.त्यानंतरच्या नेतृत्वाने घेतलेल्या भूमिकेमुळे शहरात सामाजिक सलोखा निर्माण करण्यात यश मिळाले असले तरी त्या नेतृत्वाकडून कळत न कळत म्हणा किंवा राजकीय सिद्धीच्या लोभातून म्हणा एका विशिष्ट समाज गटाला अधिकच खुली सूट दिल्याचा परिणाम दुसऱ्या विचारसरणीला पर्याय शोधणे भाग पडले. आणि गेल्या चाळीस वर्षात हळू हळू ही भावना अधिक मूळ धरून यंदा मात्र स्फोट झाला. या नेतृत्वाला ऐतिहासिक पराभवला सामोरे जावे लागणाऱ्या अनेक कारणात हे एक कारण महत्वाचे आहे. याशिवाय सत्तेत धुंद झालेल्या गाव बोक्यांनी या नेतृत्वाला अधिक अडचणीत आणले. संगमनेर शहरात हिंदू मुस्लिम समाजात वाढत असलेली दरी आणि समर्थक गाव बोक्यांनी गावा गावात घातलेला हैदोस, साखर कारखान्यात साखर पोत्याच्या गोदामाची चावी हातात दिलेले मैद्याचे पोते आणि त्याचे पन्टर्स यांनी केलेला उतमात संगमनेर शहर आणि तालुक्यात नेतृत्वाच्या विरोधात प्रचंड रोष निर्माण झाला. शहरा पेक्षा ग्रामीण भागात गाव बोक्यांनी निर्माण केलेले दूषित वातावरण, निर्माण केलेली दहशत संगमनेर विधानसभा मतदार संघांचे वातावरण बदलण्यास कारणीभूत ठरले.
या भूमिकेतून स्वराज्याच्या हित शत्रुंचे आपसूक उदात्तीकारण होते ही बाब जाणीव पूर्वक दुर्लक्षित केले जात आहे.राजकारण आणि त्यायोगे प्राप्त केल्या जाणाऱ्या सत्तेच्या मोहात अंध झालेल्या या सत्ता पिपासूंना आपण कळत न कळत छत्रपतींचे स्वराज्य पर्यायाने हे राष्ट्र उध्वस्त करीत आहोत, हे लक्षात न येण्या इतपत हा खटाटोप सुरु आहे. संगमनेर शहरात सुरु असलेला जयंती उत्सवाचा खेळ यापेक्षा वेगळा नाही. संगमनेर शहरात छत्रपतींच्या जन्मोत्सवावर जीव ओवाळून टाकण्याचा जो देखावा केला जात आहे तो केवळ राजकीय प्रभाव सिद्ध करण्यासाठीच आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
………
• संगमनेर शहराची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा पाहता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रत्यक्ष पदस्पर्शाने पावन झालेल्या या शहरात तीथीनुसार साजरा होणारा उत्सवही दिमाखदारपणे आणि शांततेत साजरा व्हावा अशी सामान्य संगमनेरकरांची अपेक्षा खरे तर दोन्ही बाजूच्या नेतृत्वाने पूर्ण करायला काय हरकत आहे.छत्रपतींना आराध्य मानत असाल तर किमान अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काही काळ राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवला तर काय आभाळ कोसळणार आहे. राजकारण 364 करता येईल. दोन्ही गटांनी सामंजस्यातून एक-एक पाऊल मागे येवून राजांच्या या उत्सवाला गालबोट लागणार नाही यासाठी पुढाकार घेतला तर तुम्ही आणि तुमचे राजकारण मोठे होईल. एव्हढा शहाणपणा तर दाखवा. शहाजोगपणातून छत्रपतींचा वापर तुमच्या राजकारणासाठी करू नका. छत्रपती तुमच्या राजकारणाची मालमत्ता नाही.