वडिलांच्या स्वप्नांसाठी तरुणांनी संघर्ष केलाच पाहिजे- आरटीओ श्रीकांत मंडलिक
वडिलांच्या स्वप्नांसाठी तरुणांनी संघर्ष केलाच पाहिजे- आरटीओ श्रीकांत मंडलिक
अकोले :-प्रतिनिधी
तरुणांनी हताश न होता संघर्ष करण्याची तयारी ठेवली पाहिजे, यश अपयश हे आयुष्यात सुरूच असतात. मात्र, त्यावर देखील मात करुन यशस्वी होता येते. मी आर्मीतून निवृत्ती घेऊन जिद्दीने एमपीएसीचा अभ्यास केला त्यात मला वेगवेगळ्या नोकर्या लागल्या होत्या. मात्र, सहायक आरटीओ म्हणून माझी नियुक्ती झाली आणि मी ते प्रशिक्षण पुर्ण करुन आता रुजू झालो आहे. निवृत्तीनंतर देखील मी मोठे स्वप्न पाहिले, संघर्ष करण्याची तयारी ठेवली म्हणून मी यशस्वी झालो, आई वडिलांचे स्वप्न साकार करु शकलो,असे प्रतिपादन आरटीओ इंस्पेक्टर श्रीकांत मंडलिक यांनी व्यक्त केले. ते उंचखडक बु येथे नागरी सत्कार स्विकारताना बोलत होते.
मंडलिक म्हणाले की, ग्रामीण भागात शेतीची विभागणी झाल्यामुळे घरातील प्रत्येकाला शेती करणे शक्य नाही. म्हणून घरातील तरुणांनी व्यावसाय आणि चांगल्या नोकरीच्या शोधात बाहेर पडले पाहीजे. संघर्ष करण्याची तयारी ठेवली पाहिजे. विशेषत: ज्या विद्यार्थ्यांना सरळसेवा आणि एमपीएसी, युपीएससी सारख्या स्पर्धा परिक्षांमध्ये स्वत:ला सिद्ध करायचे आहे, त्यांनी मागे हटू नये. स्पर्धेत उतरताना अपयश आले तरी खचायचे नाही, लढा सोडून द्यायचा नाही. कधीकधी यश जवळ असते आणि विद्यार्थी खचून जातात त्यामुळे बुद्धमत्ता आणि पात्रता असून सुद्धा त्यांना काबाड कष्टाची कामे करावी लागतात. त्यामुळे, अपयश आले तरी लढा सोडायचा नाही. मी प्राथमिक शिक्षणापासून ते अगदी उच्चशिक्षित होईपर्यंत शिक्षणासाठी संघर्ष केला आहे, अर्थात त्याचे श्रेय्य माझ्या आई वडिलांना जाते. कारण, त्यांनी आमच्या पंखात बळ भरले म्हणून आम्ही आकाशात भरारी मारु शकलो. प्रत्येक आई वडिलांना वाटते की माझ्या लेकरांनी शिकावं, मोठं व्हावं, समाजात मानाचं स्थान मिळवावं म्हणून त्यांचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी मी वयाच्या आठराव्या वर्षी आर्मीत भरती झाली आणि अठरा वर्षे देशाची सेवा केली. मला तेथे गोल्ड मेडल मिळाले, देशसेवेत असताना मी शिक्षण घेतले आणि उच्च पदावर पोहचलो. प्रत्येकाने आपल्या आई वडिलांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे मंडलिक म्हणाले. हा कार्यक्राम संतोष मंडलिक, ऍड. सागर शिंदे, नवनाथ मंडलिक, दिनेश मंडलिक, प्रतिक मंडलिक यांनी आयोजित केला होता.
यावेळी, कार्यक्रामाला अकोले नगरपंचायतीचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, अगस्ति कारखान्याचे संचालक अशोक देशमुख, माजी संचालक बाळासाहेब ताजणे, ज्येष्ठ पत्रकार भाऊसाहेब मंडलिक, भास्कर मंडलिक, राजेंद्र भडके, सुलोचना शिंदे, बबन वाळुंज, प्रमोद मंडलिक, नानासाहेब त्रिभान, रवि ताजणे, सुनिता ताजणे, हौशिराम त्रिभान, पोपट नाना त्रिभान, स्वप्नील आगरकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
छावा पाहून अश्रू अनावर.!
स्वराज्याला प्रेरणादायी असणारे संघर्षयोद्धा तरुण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आहेत. त्यामुळे, श्रीकांत मंडलिक यांनी त्यांच्या सत्कारानंतर छावा चित्रपट ठेवला होता. ग्रामीण भागात महिला, विद्यार्थी आणि वयोवृद्ध व्यक्तीना थेटरमध्ये जाऊन हे चित्रपट पहाणे शक्य नाही. त्यामुळे, शंभुराज्यांचा स्वराज्यासाठी काय संघर्ष होता हे समजले पाहिजे. चित्रपट सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत अनेकांनी हुंदके देत चित्रपट पाहिला.