नाशिकची “संस्कृती” जतन करणारे अवलिया महाराज शाहू खैरे: सांस्कृतिक नाशिकचे मानपत्र
नाशिकची “संस्कृती” जतन करणारे अवलिया महाराज
शाहू खैरे: सांस्कृतिक नाशिकचे मानपत्र
कुमार कडलग / डॉ. राहुल बागमार
—_—-
नाशिक
प्रत्येक गावाला एक परंपरा, संस्कृती असते,तशी ती नाशिकला देखील आहे.मात्र यांत्रिकीकरणाच्या प्रवाहात ही संस्कृती आणि परंपरा धूसर बनत गेली. नव्या पिढीपासून ही संस्कृती, परंपरा अंतर ठेवू लागल्याने एक दिवस सांस्कृतिक नाशिक इतिहासाच्या पानावर देखील सापडणार नाही, ही खंत सतत बोचू लागल्याने शाहू महाराज खैरे नावाच्या एका अवलिया नाशिककराने ही संस्कृती जतन करण्याचा संकल्प सोडला. आणि “संस्कृती”च्या विचार पिठावरून गेली कित्येक वर्ष नाशिक या गावाची धर्म, सांस्कृतिक आणि क्रीडा संस्कृती जतन करण्याचे काम अव्याहतपणे सुरु ठेवले आहे.
नाशिक शहराला कुंभ नगरी म्हणून धार्मिक इतिहास आहे. प्रभू रामचंद्रांचा सहवास आहे.नाशिकच्या या मातीला तात्यासाहेब तथा कवी कुसुमाग्रज, वसंत कानेटकर यांच्यासारख्या महान विभूतींच्या साहित्याचा वास आहे. ही सारी सांस्कृतिक संपत्ती काळाच्या ओघात दृष्टी आड जात असल्याचे लक्षात आल्यानंतर शाहू महाराज संस्कृतीच्या माध्यमातून पडद्याआड जाऊ पाहणारा हा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी पुढे सरसावले. आणि सन १९९७-९८ व १९९८ -९९ अशी सलग दोन वर्ष नाशिक महापालिकेच्या सहकार्याने ग्रंथ दिंडी आणि पुस्तक जत्रा असा नावीन्य उपक्रम राबवला. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारी महापालिका म्हणून नाशिक मनपा पहिली महापालिका ठरली.
शहरात सर्व प्रकारचे धर्मोत्सव साजरे करतांना शाहू महाराज यांच्या नसानसात भिनलेले पुरोगामीत्व सतत जागे राहिल्याचे प्रकर्षाने जाणवले. आणि म्हणूनच उत्सव कुठल्याही धर्माचा, जातीचा अथवा पंथाचा असेल तरी शाहू महाराजांची “संस्कृती ” सर्वात पुढे असते. या संस्कृतीच्याच पुढाकाराने नेहरु चौकात सुरु झालेली पाडवा पहाट नाशिक महानगराच्या कानकोपऱ्यात दिवाळीची पहाट संगीत सुरांनी नटू लागली.
दहिपूला नजीक असलेल्या चित्र घंटा परिसरात असलेले अति प्राचीन चित्र घंटा (यावरूनच या परिसराचे नामकरण झाले आहे.) देवीच्या मंदिराचा काळ्या पाषाणात जीर्णोद्धार शाहू महाराज यांनी केला.
अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या नेहरू चौकातील पाराचे रंगरूप बदलण्याचे काम महाराजांनी केले.संसदीय कामकाज गाजविणारे तत्कालीन खासदार गो. ह. देशपांडे याच पारावरून नाशिककरांना संबोधित करीत, तो इतिहास नाशिककारांना चिरकाल स्मरणात राहावा ही प्रामाणिक भावना तसेच जॅक्सनच्या वधाला शंभर वर्ष पूर्ण झाले ते औचित्य साधून शाहू महाराज यांनी जॅक्सनचा वध करणाऱ्या क्रांतिकारकांना अभिवादन करण्यासाठी शहरात मोठी शोभा यात्रा काढून काही स्मरण चित्रे पारावर लावले.
क्रीडा क्षेत्रात देखील शाहू महाराज यांनी नाशिकच्या पदरात मोलाचे दान टाकले आहे. महापौर चषक असो नाहीतर मुलींची कुस्ती, शाहू महाराज इथेही तन, मन धनाने सक्रिय आहेत. 20 वर्षाखालील मुलींच्या कुस्ती स्पर्धा भरविण्याचा मान महाराजांकडेच जातो.याच स्पर्धेतून भारतीय संघात प्रवेश करण्याचा मार्ग जातो.
शैक्षणिक क्षेत्रात देखील त्यांचे काम अलौकिक आहे. रोकडोबा तालीम संघाच्या जागेत एकाच छताखाली अभ्यासिका, व्यायाम शाळा आणि व्यसनमुक्ती केंद्र चालवून शाहू महाराज यांनी परिपूर्ण माणूस घडविण्याचा संकल्प तडीस नेला. या व्यसन मुक्ती केंद्रात प्रत्येक गुरुवार आणि रविवार हे दोन दिवस व्यसन मुक्तीवर समुपदेशन केले जाते. यांतून हजारो तरुण नवीन आयुष्य जगत आहेत. कोरोना काळात याच रोकडोबा तालीममध्ये सुरु केलेल्या ऑक्सिजन सेंटरमुळे कित्येक डॉक्टर्स आणि रुग्णांचे जीव वाचले.
नाशिकची ही संस्कृती जतन करीत असताना वीर परंपरा विसरतील ते शाहू महाराज कसले. स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या शहीदांचे वारस त्यांच्या पूर्वजांचे देवघरातील टाक घेऊन वीर नाचविण्याची ही प्रथा सन्मानित करण्याच्या उद्देश्याने शाहू महाराज यांनी विचारपीठ उपलब्ध करून दिले.शहिद पोलिसांना मान वंदना देण्यासाठी पोलिस मुख्यालयातून मिरवणूक काढण्यात पुढाकार घेतला.
नाशिकचा नजरे आड गेलेला शिमगा पुन्हा त्याच पारंपरिक जोमाने महानगरात साजरा व्हावा, रोकडोबाच्या भव्य प्रांगणात राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांची कीर्तन परंपरा पुन्हा सुरु व्हावी तसेच रहाड संस्कृती आणखी सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न व्हावी ही महाराजांची अपेक्षा आहे. ती पूर्णत्वास जावी म्हणून आई भवानी शाहू महाराज खैरे यांना उदंड आयुरारोग्य बहाल करो, याच जन्म दिनी शुभेच्छा!