मानोरीची श्री चैतन्य टेक्नॉलॉजी स्कुल बेकायदेशीर ; आदिवासी विकास परिषदेकडून संस्थाचालकांवर गुन्हा दाखल करण्याची जिल्हाधिकाऱ्यांना मागणी
मानोरीची श्री चैतन्य टेक्नॉलॉजी स्कुल बेकायदेशीर ;
आदिवासी विकास परिषदेकडून संस्थाचालकांवर गुन्हा दाखल करण्याची जिल्हाधिकाऱ्यांना मागणी
नाशिक प्रतिनिधी :
दिंडोरी तालुक्यातील मानोरी गावात श्री चैतन्य टेक्नॉलॉजी स्कूल या संस्थेने शासनाची कोणतीही परवानगी घेतलेली नसून, या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची व पालकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. भविष्यात ही शाळा बंद झाल्यास विद्यार्थी व पालकांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे शाळेची तत्काळ चौकशी करून कारवाई करावी, अशी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा अध्यक्ष लकी जाधव यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
आदिवासी विकास परिषदेने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही शाळा आंध्र प्रदेश येथील एका संस्थेची असून,विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी तब्बल ६० हजारांच्या आसपास फी आकारली जात आहे. शाळेला मान्यता बत नसतानाही त्यांनी बेकायदेशीर स्टॅम्प बनवला आहे. शाळेची माहिती तपासली तर ही शाळा ऑनलाइनसुद्धा दिसत नाही.अशी तक्रार या निवेदनात केली आहे. शाळेला शासनाची मान्यता नसून शासनाच्या कोणत्याही नियमांचे पालन केलेले नाही. असा आदिवासी विकास परिषदेचा दावा आहे.त्यामुळे बेकायदेशीर शाळेच्या संस्थाचालकावर गुन्हा दाखल करण्यात यावा. बेकायदेशीर सुरू असलेल्या शाळेसाठी स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करावी. शाळेकडून विद्यार्थी व पालकांची फसवणूक टाळावी. प्रशासनाने याबाबत कार्यवाही न केल्यास शाळेच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी आदिवासी विकास परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.