कांद्याचा पुन्हा बट्ट्याबोळ
कांद्याचा पुन्हा बट्ट्याबोळ
हरिभाऊ सोनवणे /नाशिक
नाशिक जिल्ह्यातील कांद्याची चवच अविट,म्हणूनच नाशिकला कांद्याची राष्ट्रीय राजधानी म्हटले जाते.नगदी पीक म्हणून कांद्याने अग्रस्थान पटकावले.असले तरीदेखील इथल्या शेतकऱ्यांसाठी कांदा हे पीक वर्षानुवर्षे जुगार ठरत आले आहे. “या वेळेस तरी कांदा दर देईल” या आशेवर शेतकरी मोठ्या प्रमाणावर लागवड करत आहे . मात्र कांद्याच्या दरांचा खेळ नेहमीच उलटाच ठरत आहे.
उन्हाळी कांदा गेला सडून:-
चाळीत साठवलेला गत वर्षीचा कांदा अती उष्णतेने सडत आहे.शिल्लक राहिलेल्या कांद्याला अजूनही बाजारात तेजी आलेली नाही. उलट शेतकऱ्यांच्या चाळीत ठेवलेला अर्ध्याहून अधिक कांदा सडून गेला. त्यामुळे झालेल्या तोट्याची भरपाई होण्यासाठी आताच्या कांद्याला किमान ४ ते ५ हजार रुपयांचा दर मिळावा अशी अपेक्षा आहे. मात्र बाजारपेठेचे संकेत वेगळेच आहेत*.
रब्बी कांद्याची आवक:-
सद्यस्थितीत दक्षिण भारतातील रब्बी कांद्याची आवक सुरू झाली असून त्यामुळे दर बेताचेच राहतील, असे जाणकार सांगत आहेत. झालेला खर्च कसाबसा निघतोय; स्वतःचे कष्ट विसरून नफा तर दूरच, तोटाच शेतकऱ्यांच्या पदरात पडतो आहे.
वाढता खर्च:-
शेतकऱ्याचा खर्च बियाणे, खते, कीटकनाशके व मजुरी दिवसेंदिवस वाढवत आहे.त्यात लागवडीपासून विक्रीपर्यंत कांद्याच्या दराची कुठलीही हमी नाही.
शेतकरी मात्र अधिक किंमत मिळेल या अपेक्षेने पुन्हा पुन्हा कांदा लागवड करतो; पण आवक वाढताच दर कोसळतात.*
जिल्ह्यात कांद्याचे तीन हंगाम:-
नाशिक जिल्ह्यात खरीप, रब्बी आणि उन्हाळा असे तीन हंगाम कांद्याचे घेतले जातात. त्यात पोळ कांदा, रांगडा (उन्हाळ) कांदा यांच्याही लागवडी मोठ्या प्रमाणावर होतात. मात्र सर्व हंगामांमध्ये शेतकरी “जुगार”च खेळतो.
शेतकऱ्यांचे जिवंत अनुभव:-
“गेल्या वर्षी उन्हाळी कांदा चाळीतच सडून गेला. यावेळी तरी भाव मिळेल या आशेने लागवड केली; पण आतापर्यंत काहीच खात्री वाटत नाही.”
— दिनेश खैरनार,गोकुळ पवार
शेतकरी, गारखेडा,येवला
“खर्च दुप्पट झाला आहे, दर हमखास मिळेल याची खात्री नाही. शेवटी आम्ही कांदा लावतो, पण जिंकतो की हरतो हे बाजार ठरवतो.”
— ज्ञानेश्वर भालेराव शेतकरी,
सायगाव येवला
शेतकऱ्यांची अपेक्षा :-
यंदाही कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर होणार आहे. पण हा खेळ पुन्हा बट्ट्याचा ठरू नये एवढीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. स्थिर दर व किमान हमीभाव मिळाल्यासच शेतकऱ्यांचा विश्वास परत मिळू शकेल